Home टॉप स्टोरी मोदीजी, निर्दोष आहात तर चौकशीला का घाबरता?

मोदीजी, निर्दोष आहात तर चौकशीला का घाबरता?

0

आपली लढाई भ्रष्टाचार व काळय़ा पैशाविरोधात असल्याची वारंवार भाषणे ठोकणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा फैलावर घेतले आहे.

नवी दिल्ली- आपली लढाई भ्रष्टाचार व काळय़ा पैशाविरोधात असल्याची वारंवार भाषणे ठोकणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा फैलावर घेतले आहे. सहारा आणि बिर्ला समूहाकडून कोटय़वधी रुपये घेणारे मोदी या भ्रष्टाचारावर का नाही बोलत, असा वर्मावर घाव घालत सहारा व बिर्ला डायरी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी आग्रही मागणी राहुल यांनी
केली आहे.

आपण निर्दोष आहात, मग चौकशीला का घाबरता, असा सवालही राहुल यांनी ट्विटरद्वारे उपस्थित केला आहे. सहारा डायरी चौकशीला तुम्ही घाबरत नसाल तर तुम्ही चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असा चिमटाही राहुल यांनी काढला आहे. नोव्हेंबर २०१४ मध्ये प्राप्तिकर विभागाने सहारा समूहाच्या कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात काही नोंदवह्या (डाय-या) सापडल्या होत्या. या डायरीत कोणत्या पक्षाला किती पैसे दिले होते याच्या नोंदी होत्या, असा राहुल यांचा आरोप आहे.

प्रसिद्धीमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार प्राप्तिकर विभागाने आता हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालवला असून यासंबंधी सबळ पुरावे उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. मात्र नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सहारा आणि बिर्ला उद्योग समूहाकडून पैसे घेतल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आहे. याप्रकरणी निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. भारतीय जनता पार्टीने राहुल यांचे हे आरोप फेटाळले आहेत.

कर निवारण आयोगाने (आयटीएससी) सहारा समूहाविषयी घेतलेल्या मवाळ भूमिकेवर राहुल गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही दिवसांपूर्वी यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आरोप केले होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सहारा समूहाकडून ४० कोटी घेतले होते.

राहुल यांच्या या आरोपांनंतर कर निवारण आयोगाने आपली भूमिका बदलत या डाय-यांतील माहिती सबळ पुरावा नसल्याचे म्हटले होते. छाप्यात सापडलेल्या डाय-यांतील पुरावे ग्राह्य धरून नयेत अशी कंपनीची विनंती यापूर्वी कर निवारण आयोगाने फेटाळली होती. त्यानंतर ‘सहारा’कडून ५ सप्टेंबर २०१६ रोजी पुन्हा याचिका दाखल करण्यात आली होती.

मोदी सरकारचे धोरण गरीबविरोधी

नोटाबंदीचा मुद्दा पाच राज्यांतील निवडणुकांत महत्त्वाचा बनला आहे. या मुद्दय़ावर काँग्रेसनेही कंबर कसली असून मोदी सरकारचे धोरण गरीबविरोधी असल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर ११ जानेवारी रोजी काँग्रेसने पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशनही बोलावले आहे.

गुरुवारी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांच्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तलकटोरा, इंदूर येथील स्टेडियमवर राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version