Home संपादकीय अग्रलेख दोन भाषणे-राष्ट्रपतींचे, मोदींचे

दोन भाषणे-राष्ट्रपतींचे, मोदींचे

0

देशाचा ७०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. स्वातंत्र्याची ७० वर्षे हा कमी काळ नाही. आता भारतीय स्वातंत्र्य अनुभव संपन्न झाले आहे. जागतिक स्पर्धेत नवे नवे शोध लागत असून, त्या सर्व वैज्ञानिक आघाडीवरील फायदा जगातील सर्व देशांना मिळतो तसा तो भारतालाही मिळाला आहे. त्याची सुरुवात राजीव गांधी यांच्या आग्रहातून आणि संकल्पनेतून झाली. हे कुणी मान्य करो किंवा न करो, पण इतिहासाला ते मान्य करावे लागले. या संगणकीय क्रांतीने जगात भारत पुढे चालला आहे.

या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देशभर जल्लोष आहे. परंतु ठिकठिकाणी झालेल्या ध्वजावंदन कार्यक्रमात तरुणांचा मोठया प्रमाणात अभाव दिसत होता. छोटया छोटया वसाहतींमध्ये होणा-या ध्वजावंदन कार्यक्रमात तरुण नव्हते ही चिंतेची गोष्ट आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे राष्ट्रीय आहेत. या दिनाचे महत्त्व तरुणांना का वाटत नाही आणि का पटत नाही? हा मोठा चिंतेचा विषय आहे.

लालकिल्ल्यावरसुद्धा पंतप्रधानांच्या भाषणाला शाळकरी मुले आणून बसवली होती. ज्या ३३ टक्के तरुणाईचा उल्लेख पंतप्रधानांनी केला, तो तरुण आजच्या राष्ट्रीय सणापासून अलिप्त का आहे, याचे गांभीर्याने चिंतन होणे गरजेचे आहे.

लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांनी जनतेला संबोधित केले आणि राष्ट्रध्वज फडकवला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी पंडितजींनी याची सुरुवात केली होती. या नवीन सरकारने ती परंपरा आणि तो सोहळा रद्द केला नाही, हेच नशीब! नाही तर काँग्रेस सरकारने जे जे केले ते ते मोडीत काढण्याची स्पर्धा लागलेली आहे.

लालकिल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९४ मिनिटांचे भाषण केले. या ९४ मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान धादांत खोटे बोलले. मोदी सरकारवर सगळयात मोठा आक्षेप काय असेल तर महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधानांनी लालकिल्ल्याच्या प्राचीवरून मागच्या सरकारचा महागाईचा दर दहा टक्क्यांवर होता आणि आम्ही तो ६ टक्क्यांवर आणला हे धादांत खोटे विधान केले.

पंतप्रधानांना न शोभणारे हे विधान होते. डाळींच्या किमती नियंत्रणात आणल्या असेही खोटे विधान त्यांनी केले. डाळींची मागणी वाढली म्हणून अधिक उत्पादनावर भर दिला, असाही एक अत्यंत चुकीचा उल्लेख केला. महागाईबद्दल पंतप्रधानांनी दिशाभूल करण्याकरिता लालकिल्ल्याचा वापर केला आणि तो स्वातंत्र्यदिनी केला हा सगळयात मोठा आक्षेप आहे.

या सरकारने गेल्या दोन वर्षात ४० ते ६० टक्के महागाई वाढवली आणि आज ज्या डाळींच्या भडकलेल्या किमतीची चर्चा देशभर आहे आणि २०० रुपये किलो झालेल्या डाळींच्या बातम्या स्वातंत्र्य दिनादिवशी झळकलेल्या आहेत. त्याच पंतप्रधानांनी हातवारे करीत आम्ही डाळींच्या किमती नियंत्रित केल्या असे धादांत खोटे विधान रेटून केले. देशाच्या पंतप्रधानांना न शोभणारे ते भाषण आहे.

वास्तविक त्यांनी देशाची माफी मागायला पाहिजे होती. किमतीवर नियंत्रण आणण्याचे वचन देऊन आम्ही सत्तेत आलो. पण ते शक्य झालेले नाही. हे सांगण्याचे धाडस पंतप्रधान दाखवू शकले नाहीत. ज्या मागच्या सरकारचा पंचनामा ते करत होते त्या मागच्या सरकारच्या सत्तेच्या काळात तूरडाळ, उडीदडाळ, याचा प्रत्येक किलोचा दर ६० रुपयांच्या वर कधीही गेलेला नव्हता.

आता म्हणजे पंतप्रधान ज्या दिवशी बोलत आहेत त्या दिवशी २०० रुपये किलो डाळ झाली असताना देशाचा पंतप्रधान धडधडीत खोटे बोलतो, याचा तीव्र असा निषेध व्हायला पाहिजे. ‘पक्ष मोठा नाही, देश मोठा आहे’ हे सांगायला पंतप्रधानांची गरज नाही. पण आम्ही जी आश्वासने दिली होती त्या आश्वासनातील कोणते आश्वासन तुम्ही पाळलेत? आम्ही एवढे गॅस कनेक्शन दिले आणि आम्ही एवढी शौचालये बांधली. एका मिनिटात आता रेल्वेची १५००० तिकिटे दिली जातात.

पूर्वीच्या सरकारच्या काळात २००० तिकिटे दिली जायची. अशी अत्यंत विसंगत तुलना मोदींनी केली. पुढच्या २० वर्षानी एका मिनिटांत १५०००० तिकिटे देण्याची व्यवस्था होईल. संगणकीय क्रांती जसजशी होत जाईल, तसतशी सगळया सुविधांमध्ये कमालीचा फरक पडेल. जेव्हा रेल्वे सुरू झाली तेव्हा हाताने तिकिटावर सर्व गोष्टी लिहाव्या लागत होत्या. ज्यावेळी देशात काही नव्हते त्यावेळची तुलना आजच्या काळाशी पंतप्रधान करतात. हा त्यांचा अहंमन्यपणा आहे.

डाळींच्या विषयात तर त्यांनी देशाची पूर्ण दिशाभूल केलेली आहे. अदानी नावाचा जो निवडणुकीत आर्थिक मदत करणारा उद्योगपती आहे त्याच्यासाठी हे डाळीचे षडयंत्र आहे. इथे कृत्रिम टंचाई निर्माण करून तो उद्योगपती जगातून डाळी आतात करतो आणि नफा कमावतो, हे सांगायचे धैर्य पंतप्रधानांकडे आहे का? स्वातंत्र्यदिनाच्या सुंदर सकाळी शौचालये किती बांधली हे सांगणारे पंतप्रधान यांच्या बुद्धिमत्तेची किती कीव करावी? कोणतेही सरकार मागच्या सरकारपेक्षा दोन पाऊले पुढे असते. हे विकासाचे सूत्र आहे.

‘आम्ही हे केले आणि आम्ही ते केले’ हे सांगण्याचे ठिकाण लालकिल्ला नव्हे. तुम्ही नवाझ शरीफला वाढदिवसाला मिठी मारायला गेलात आणि त्या काश्मीर खो-यात आज दिल्लीत बसलेला पाकिस्तानचा राजदूत उद्दामपणे भाष्य करतो. ‘पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आहे’ यावर भाष्य करण्याची हिंमत पंतप्रधानांना झाली नाही. आणि शौचालये किती बांधली हे सांगत सुटलेत. घरात महिन्याच्या सामानांची यादी बनते तशी दोन वर्षात आम्ही हे केले आणि ते केले हे सांगणारी यादीच त्यांनी वाचून दाखवली.

१५ ऑगस्टला सकाळी पंतप्रधानांचे भाषण झाले. १४ ऑगस्टला संध्याकाळी देशाच्या राष्ट्रपतींनी जनतेला संबोधित केले. राष्ट्रपतींनी जे विषय मांडले त्या विषयाच्या कुठल्याही संदर्भात पंतप्रधानांनी भाष्य केलेले नाही. त्यांच्याच गुजरात राज्यातील दलितांवरील अत्याचार यावर बोलताना राष्ट्रपतींनी पंतप्रधानांच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीची चंपी केलेली आहे. देशातील वाढत्या असहिष्णुतेबद्दल राष्ट्रपतींना चिंता वाटते.

पंतप्रधानांच्या ९४ मिनिटांच्या भाषणात ‘असहिष्णुता’ हा शब्दसुद्धा उच्चारला जात नाही. दलित आणि अल्पसंख्याकांवर गेल्या दोन वर्षात देशात जे हल्ले होत आहेत, त्याबद्दल लालकिल्ल्यावरून पंतप्रधानांना बोलावेसे वाटत नाही. केवळ शाब्दिक कोटया करून ‘पहली सरकार आक्षेपोंसे घेरी हुई थी. मेरी सरकार अपेक्षाओंसे घेरी हुई है। भीम से भीमराव तक..’ अशी टाळया घेणारी वाक्ये पंतप्रधानांनी पेरून ठेवली आणि लालकिल्ल्याच्या प्राचीत समोरच्या विद्यार्थ्यांकडून टाळया वाजवून घेतल्या गेल्या.

राष्ट्रपती भाषण कुठे आणि पंतप्रधानांचे आम्ही हे केले आणि आम्ही ते केले सांगणारी यादी कुठे? महागाईबद्दलचे निवेदन तर तद्दन खोटे होते. सरकारला महागाई रोखता आलेली नाही. आश्वासने पूर्ण करता आलेली नाहीत. अच्छे दिन येऊ शकलेले नाहीत. पण भाषणात मिजास केवढी.. तीन वेळा जयहिंद घोषणा देणा-या इंदिरा गांधींची भाजपावाली मंडळी टिंगल करत होती. त्याच मोदींना तीन वेळा ‘जयहिंद’ ही घोषणा द्यावी लागली. आणि गांधी, नेहरू, पटेल यांच्या नावांचा जयघोष करावा लागला. इतिहासाने यांना अजून बरेच काही शिकवायचे आहे..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version