Home टॉप स्टोरी सर्व स्थानके फेरीवालेमुक्त करा

सर्व स्थानके फेरीवालेमुक्त करा

0

पंधरा दिवसात मध्य व पश्चिम रेल्वेची सर्व स्थानके फेरीवालेमुक्त करा अन्यथा सोळाव्या दिवशी मनसे आपल्या स्टाईलने हटवेल, त्यानंतर जो संघर्ष होईल त्याला रेल्वे जबाबदार असेल, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इशारा दिला आहे.
मुंबई- पंधरा दिवसात मध्य व पश्चिम रेल्वेची सर्व स्थानके फेरीवालेमुक्त करा, तसेच मार्गावरील फेरीवाले उठवले पाहिजे अन्यथा सोळाव्या दिवशी माझी माणसे ते काम करतील. त्यानंतर जो संघर्ष होईल त्याला रेल्वे जबाबदार असेल, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एल्फिन्स्टन स्थानकातील दुर्घटनेच्या निषेधार्थ गुरूवारी पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला, यावेळी राज ठाकरे बोलत होते.

एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या विरोधात मुंबईकरांच्या मनात खदखदणा-या संतापाला मनसेच्या ‘संताप’ मोर्चाने आज वाट मोकळी करून दिली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात हजारो मनसैनिकांसह सर्वसामान्य मुंबईकरही सहभागी झाले होते. पोलिसांची परवानगी नसतानाही लोकांनी या मोर्चाला उत्स्फूर्त गर्दी केली होती.

आधीच्या सरकारमध्ये जी परिस्थिती होती, तीच आजच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे हा संताप आहे. ज्याच्यावर कधी विश्वास टाकला नाही त्यांनी घात केला तर वाईट वाटत नाही. पण ज्यावर विश्वास टाकला तेच घात करतायत. म्हणून माझा मोदींवर राग आहे. मोदी आधी वेगळे बोलत होते आणि आता वेगळे बोलत आहेत. इतका खोटे बोलणारा पंतप्रधान मी पाहिला नाही. उद्योगपती रतन टाटा यांच्या सांगण्यामुळे मी गुजरातला गेलो. परंतू तेथे जे मला दाखवलं तो सर्व खोटा देखावा होता, असा आरोपही राज यांनी यावेळी केला.

भाषणादरम्यान राज ठाकरे यांनी नितीन गडकरींवरही टीका केली. त्यासाठी त्यांनी अच्छे दिन म्हणजे गळ्यात अडकलेले हाडूकचा दिला संदर्भ दिला.

सुरेश प्रभूंनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणूनच त्यांचे खाते बदलले. त्यांच्या जागी आपला माणूस म्हणून पियुष गोयलांना आणले. या गोयलांना काय कळते रेल्वेचे. या गोयलांच्या पियूषपेक्षा आमच्या दादरच्या आस्वाद, प्रकाशचा पियूष बरा.

मुठभरांसाठी बुलेट ट्रेन आणणार, त्यांच्यासाठी लाख कोटीचे कर्ज काढणार आणि अख्खा देश हे कर्ज फेडत बसणार, हे चालणार नाही. विकास वेडा झालाय ही स्लोगन भाजपामधूनच आलीय. माझा व्यक्ती म्हणून मोदींना विरोध नाही, पण त्यांच्या भूमिकांना विरोध आहे, आधी वेगळे बोलत होते आता मोदींची भाषा बदलली आहे. तुमच्याशी वैयक्तिक माझे काही घेणेदेणे नाही. तुमच्या चुकीच्या भूमिकांना माझा विरोध आहे.

आज राज्यात वीज घालवली आहे, काही ठिकाणी केबल बंद करण्यात आली आहे. वीज घालवून काही होणार नाही, विरोधाचा सूर्य हा उगवणारच, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सरकारच्या नादी लागून निर्णय घेऊ नका, अशी विनंती सर्व न्यायालयांच्या न्यायाधीशांना त्यांनी यावेळी केली. तसेच सर्व संपादक आणि पत्रकारांनाही सरकारला वठणीवर आणण्यासाठी आता पेटून उठण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.

तसेच यानंतरही सरकार जागे होणार नसेल, आमच्या मागण्या केवळ लिहून घेऊन त्यांना केराची टोपली दाखवली जात असेल तर आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. आमच्या मागण्यांचा दखल घेतली नाही तर माझा पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही, असा रोखठोख इशाराही राज ठाकरे यांनी शेवटी दिला.

[EPSB]

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या ‘संताप मोर्चा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version