Home महामुंबई ठाणे यंदाच्या पर्यटन हिवाळी हंगामात माथेरानची राणी धावणार का?

यंदाच्या पर्यटन हिवाळी हंगामात माथेरानची राणी धावणार का?

0

नेरळ-माथेरान ही नॅरोगेज मिनीट्रेन ९ मे २०१६ पासून अपघात आणि दुरुस्तीच्या कारणावरून बंद आहे. 

माथेरान- नेरळ-माथेरान ही नॅरोगेज मिनीट्रेन ९ मे २०१६ पासून अपघात आणि दुरुस्तीच्या कारणावरून बंद आहे. या ‘माथेरानची राणी’चा पर्यटन हंगाम १६ ऑक्टोबरपासून सुरू होतो. 

मात्र, यंदा ही गाडी पुन्हा पर्यटन हंगामात माथेरानच्या द-याखो-यांतून धावणार का, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आणि रेल्वे यंत्रणेची उदासीनता यामुळे माथेरानची राणी रुळावर येण्याची शक्यता कमीच असल्याची चर्चा आहे.

पावसाळ्यानंतर ही गाडी पुन्हा ऑक्टोबर महिन्यापासून सुरू केली जाते. मात्र, गाडीचे डब्बे नॅरोगेज रुळावरून खाली कोसळल्यानंतर हा मार्ग पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला होता.

२९ सप्टेंबर रोजी माथेरान मिनी ट्रेन शटल सेवा गाडीचा ‘वाढदिवस’ ही पुरेशा जल्लोषात साजरा केला गेला नाही. मागील पाच महिन्यांपासून ही ब्रिटिशकालीन गाडी बंद आहे. माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू झाल्यानंतर ही गाडी बंद करण्याच्या हालचाली वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिक व प्रवाशांनी केला आहे.

पावसाळ्यातील चार महिने मिनी ट्रेनच्या नॅरोगेज मार्गावर मालवाहू गाडी रेल्वेकडून चालविली जात होती. ही मालवाहू गाडी नेरळ-माथेरान दरम्यान विविध प्रकारच्या दुरुस्तीची कामे करण्याचे आवश्यक उपकरणे व साहित्य घेऊन जात होती.

त्यामुळे घाट सेक्शनमध्ये कितीही पाऊस असला तरी मिनी ट्रेनचा मार्ग बंद होत नसे. कारण मालवाहू गाडीत नॅरोगेज ट्रॅकची देखभाल करणा-या कामगारांकडून मार्गाची दुरुस्ती वेळच्या वेळी होत असे.

९ मेपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन मार्गावरील सर्व प्रवासी वाहतूक रेल्वे प्रशासनाने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी पर्यटक प्रवासी यांचा सर्वाधिक प्रतिसाद लाभलेल्या माथेरान-अमन लॉज ही शटल सेवा देखील बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय रेल्वेने त्यावेळी घेतला. त्याचा परिणाम रेल्वेकडून सर्व पातळीवर झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा मार्ग बंद करण्याचा घाट घातला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घाटातील पावसाळ्यात कोसळलेल्या दरडी पुरेशा हटवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही गाडी कधी सुरू होणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

सेंट्रल रेल्वे मजदूर युनियनचे मुंबई युनिटचे काम करीत असलो तरी नेरळचा स्थानिक रहिवासी असल्याने मला याविषयी माहिती आहे. दरवर्षी १६ ऑक्टोबरला मिनी ट्रेनचा हंगाम सुरू होतो.

नॅरोगेज रुळावर येण्यासाठी लागणारी रुटीन कामे वेळेवर करण्यात आली नसल्याने नेरळ-माथेरान मिनी ट्रेन ट्रॅक पर्यटन हंगाम सुरू करण्यासाठी तयार झालेला नाही. रेल्वेने एका वेळी शंभर कामगार लावून दुरुस्तीची कामे करावीत.

– प्रवीण तांडेल, अध्यक्ष, मुंबई सीआरएमएस संघटना

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन रेल्वेकडून अचानक बंद करणे पटत नाही. गाडीचे डब्बे रुळावरून उतरले हे कारण पुरेसे नाही.

– जितेंद्र पाटील, सरचिटणीस, मनसे रेल्वे युनियन

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version