Home महाराष्ट्र पवार, पाटील आणि माथाडी चळवळ

पवार, पाटील आणि माथाडी चळवळ

0

माथाडी कामगार चळवळीचे जनक आणि कष्टक-यांसाठी महान त्यागाने केलेल्या कार्याची जनतेला ओळख करून देणारे लढाऊ व्यक्तिमत्त्व म्हणजेच आमदार अण्णासाहेब पाटील.

माथाडींचे आशास्थान आणि देशाचे मोठे नेते शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीस ५० वर्षे पूर्ण होत असल्याने, त्यांचा माथाडी कामगारांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य सत्कार सोहळा, माथाडी कामगारांचे आराध्यदैवत माजी आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्ताने नवी मुंबईत होत आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या या चळवळीला शरद पवार यांनी पूर्वीपासून पाठिंबा देत मोलाच सहकार्य केले. हे द्वैत मांडणारा हा लेख

लाखो कष्टकरी, मालवाहू माथाडी कामगारांना ताठ मानेने जगायला शिकविणा-या अण्णासाहेबांचा जीवनपट म्हणजे कष्टाने, संघर्षाने उभा केलेला, सुवर्ण अक्षराने लिहिला जाणारा इतिहासच! पाटण तालुक्यातील मंद्रुळ-कोळे या छोटय़ाशा खेडय़ात कै. अण्णासाहेब  यांचा कै. सखुबाई या माऊलीच्या पोटी जन्म झाला. घरातील दारिद्रय़ात वाढत चाललेला हा सुपुत्र तुटपुंजे शिक्षण घेऊन स्वत:ची आणि कुटुंबीयांच्या पोटाची खळगी भरण्याचे स्वप्न उराशी धरून मुंबईला आला.

 अण्णासाहेब यांनी मुंबईला आल्यानंतर सुरुवातीला उसाच्या चरकावर आपल्या कष्टकरी जीवनाला प्रारंभ केला. तेथून त्यांनी दारुखाना परिसरात अनेक ठिकाणी ओझे वाहण्याची कामे केली, त्यावेळी ही कामे करीत असताना कामगारांना मिळणारा मोबदला, त्याची मालकांकडून होणारी पिळवणूक पाहून त्यांचे मन तळमळायचे, या तळमळीतूनच त्यांनी माथाडी कामगारांच्या चळवळीचा लढा सुरू केला. त्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, लोकनेते बाळासाहेब देसाई, नरेंद्रजी तिडके, राष्ट्रीय नेते शरद पवार आदी नेत्यांकडे पाठपुरावा करून माथाडी कायदा अंमलात आणला, त्यानंतर त्यांची माथाडी संघटना एक बलाढय़ संघटना म्हणून अस्तित्वात आली.

अण्णासाहेबांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ख-या अर्थाने या चळवळीला मोठा धीर दिला.  आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पश्चात त्यांचे स्वर्गीय सुपुत्र शिवाजीराव पाटील यांनी तर पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून माथाडी कामगारांच्या हितासाठी अनेक सोयी-सुविधा शासनाकडे मागून पदरी पाडून घेतल्या. कोपरखैरणे येथील हॉस्पिटल, नवी मुंबईतील सिडकोची घरे, माथाडी भवन आदी प्रकल्प राबविण्यासाठी त्यांनी अक्षरश: रात्रं-दिवस कष्ट उपसले. शिवाजीराव पाटील यांच्या अकाली निधनानंतर संभाजीराव पाटील यांनी संघटनेते नेतृत्व केले, त्यांचेही आकस्मित निधन झाले. त्यानंतरही अण्णासाहेबांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी या चळवळीला दिशा दिली. पण मार्गदर्शकाच्या भूमिकेत शरद पवार कायमच होते.

महाराष्ट्राची राजधानी असलेल्या आणि देशाला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणा-या मुंबईमध्ये विविध व्यवसायात माथाडी कामगार कष्टाची कामे करतात, या कामगारांना स्वत:चे घर असावे हे अण्णासाहेबांचे स्वप्न होते. बृहन्मुंबईतील घाऊक बाजारपेठा नवी मुंबईत स्थलांतरीत झाल्यानंतर अण्णासाहेबांच्या मूळ संघटनेने सिडकोमार्फत तुर्भे, नेरुळ, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली याठिकाणी हजारो घरे कामगारांना मिळवून दिली.

माथाडी कामगारांना प्रत्येक सुख-दु:खाची जवळून जाण असणारे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी माथाडी कामगार चळवळ उभी करण्यास आणि ही चळवळ पुढे चालविण्यास आमदार अण्णासाहेब पाटील यांना मोलाची साथ दिली. माथाडी कामगार चळवळीत पवार यांच्या संबंधाची क्षणचित्रं पाहिल्यानंतर त्यांचे या चळवळीवरील अतूट प्रेम दिसून येते. माथाडी कामगारांना सिडकोमार्फत नवी मुंबई परिसरात घरे मिळणे, माथाडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेला मुंबईत जमीन मिळणे, माथाडी बोर्डाकडून कामगारांना मिळणा-या फायद्याच्या रकमेवर केंद्र सरकारने आकारलेल्या कर माफ होणे, अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक पवार यांनी केली आहे.

अण्णासाहेब पाटील यांनी माथाडींची अभेद्य अशी चळवळ उभी केली, त्यांनी घालून दिलेल्या ध्येय-धोरण व शिकवणीनुसार जोमाने व उत्साहाने संघटनेचे कार्य चालू आहे. माथाडी संघटना, माथाडी पतपेढी, ग्राहक सोसायटी, माथाडी हॉस्पिटल या संस्था अत्यंत कार्यक्षमपणे यशस्वीरित्या कामगारांना न्याय व फायदे मिळवून देत आहेत. अण्णासाहेबांना शरद पवार यांनी मदत केली नसती तर हे शक्यच झाले नसते.

[EPSB]

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी शनिवारी सकाळी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. 

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version