Home महाराष्ट्र कोकण मेवा स्मशानकार्यातून लग्नविधीकडे

स्मशानकार्यातून लग्नविधीकडे

0

सध्या लग्नसराई सुरू आहे. मंगलाष्टकांच्या चढाओढी, जेवणक-यांची सरबराई आणि नवदाम्पत्याचे कोडकौतुक.. लग्न मुहूर्तासाठी वधू-वरांकडून सुरू असणारी धावपळ, हे दिवस त्या-त्या मंडळींसाठी संस्मरणीय.. त्या-त्या उभयतांच्या आयुष्याचा एक टर्निग पॉईंटच असतो. गावागावात लग्नाच्या पारंपरिक प्रथांमध्येही काही ना काही भिन्नता असतेच. काही वधू-वरांच्या मंडपात तलवारीला लिंबू लावले जाते. तर काहींच्या मंगलकार्यात चक्क बंदुकीचे बार उडविले जातात.

देवक ठेवण्याची परंपराही वेगवेगळी आहे. सुपारी सु-याला बांधून मंडपात घेऊन येण्याची प्रथाही लक्षवेधी असते. या लग्न सोहळयात यजमानांची धावपळ असली तरी उपस्थितांची एक धमाल असते. कट्टा (ता. मालवण) येथे नवरा मुलगा नवरीच्या मंडपात जाण्यापूर्वी मुहूर्तमणी ओवण्यासाठी विशिष्ट स्थळावर जातो. तेथे स्मशानविधी केल्या जातात. पिंडदानाचा उपाहार केला जातो. काकडयाची वात पेटविली जाते आणि प्रतिस्मशानातून वाजत-गाजत मिरवणूक निघते.

विवाह सोहळयात स्मशानविधी असे म्हटल्यावर ऐकणा-याचे डोळे विस्फारतात, हे कसं शक्य आहे. असे कुणीही म्हणेल. पण मसणे-परब मात्र या प्रथांबाबत ठाम असतात. नव्हे या परंपरा पूर्ण झाल्याच पाहिजेत असा त्यांचा आग्रह असतो. याच आग्रहातून ज्येष्ठ मंडळींच्या पुढाकारातून ग्रामदेवतेच्या मंदिराशेजारी परब वंशजाच्या स्थानावर पिंडदानाचा प्रतिसोपस्कार केला जातो. भात, डाळ, तीळ एकाच टोपात शिजवण्याचा उपहार होतो. शेंडी काढलेल्या नारळात काकडयाची वात पेटविली जाते आणि मुहूर्तमणी ओवला जातो.
मसणे-परब यांच्या नावावरूनच स्मशानाच्या गुढाबाबत जिज्ञासा जागृत होते.

काही पिढय़ांपूर्वी परब घराण्यात लग्नविधीच्या सोहळयात सगळे व्यस्त असताना अचानक परब घराण्यात विघ्न आले. कसल्याशा कारणामुळे नव-या मुलाची शुद्ध हरपली. तत्कालिन वैद्यकीय तज्ज्ञांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. शोकाकूल वातावरणात अंत्यविधीची तयारी करण्यात आली. इकडे वधूला दुषणे देण्यात येऊ लागली. ज्येष्ठांच्या या बोलण्याने कोणतीही चूक नसताना, वधूला मात्र जिवंतपणी मेल्यासारखे झाले. ती देवाचा धावा करू लागली. मी तुझी खरी भक्त असेन तर माझ्या पतीला जीवंत कर, माझ्यावर लागलेला कलंक दूर कर, मी तुझे उपकार पिढयान्पिढया विसरणार नाही, तिने असा धावा करतानाच देवाने आपले म्हणणे ऐकले नाही तर आत्मसमर्पण करणार असल्याचेही सांगितले. तिचा धावा सुरू असताना दुसरीकडे ग्रामस्थ मंडळी स्मशान विधीची तयारी करत होती.

कट्टयावरच विशिष्ट ठिकाणी सरण डाळण्यात आले. त्याचे शव त्यावर ठेऊन अंतिम दर्शन घेऊन शेवटचा विधी करणार तेवढयातच सरणावर ठेवलेल्या शवाचे पाय हलत असल्याचे कुणाच्या तरी लक्षात आले. त्यांनी इतरांना सांगितले, पण कुणाचाही विश्वास बसत नव्हता. तरीही आग्रहामुळे लाकडे बाजूला करण्यात आली. काही वेळाने हातही हलू लागले. हा प्रकार बघून काहीजण स्मशानातूनच त्वरेने मागे फिरले. काहींनी भूतबाधा म्हणून पळ काढला. एव्हाना सरणावर तो माणूस उठूनही बसला. ही ईश्वराचीच कृपा यामुळे स्मशानातून माणूस परत फिरला अशी प्रत्येकाची धारणा झाली.

पुन्हा परब मंडळींनी त्याला वाजत-गाजत स्वयंवर स्थळी आणले. काही वेळापूर्वी असणारे शोकाकूल वातावरण कुठल्या कुठे विरून गेले. ही ईश्वराची कृपा असे मत परब मंडळींचे झाले. या दाम्पत्याचा संसार सुखी आणि समृद्ध झाला. परंतु या परिवाराची ही घटना म्हणजे इतरांपेक्षाही संस्मरणीय आणि अतक्र्य अशी होती. परिणामी या परिवाराच्या पिढया वाढत गेल्या असल्या तरी पिढयान्पिढया आपल्या वंशजांची आठवण ही परब मंडळी ठेवत आहेत. कालांतराने स्मशानातून परत आलेले म्हणजे मृत्यूवर विजय मिळविलेले वंशज म्हणून परब मंडळींना ‘मसणे-परब’ असे म्हटले जाऊ लागले. आता या मसणे-परबांच्या अनेक पिढया झाल्या तरीही त्यांनी स्मशानातील आपले स्मरण कमी केलेले नाही.

कट्टा गावच्या लिंगेश्वर ग्रामदेवतेच्या मंदिराशेजारीच या मृत्यूवर विजय मिळविलेल्या वंशजाचे स्मृतिस्थान आहे. येथेच सध्या या लग्नापूर्वीच्या विधी केल्या जातात. भात, डाळ एकाच भांडयात शिजविली जाते. किशी काढलेल्या नारळात तेल घालून कापडाची वात (काकडा) पेटविला जातो. हे सर्व विधी परब घराण्यातीलच काही मंडळी करतात. यानंतर मुहूर्तमणी ओवला जातो आणि पेटविलेल्या वातीसह वाजत-गाजत विवाहस्थळावर नवरा-मुलगा पोहोचतो. असे म्हणतात, यदा कदाचित पेटविलेल्या काकडयाची वात विझलीच तर मंगलकार्यात विघ्न अटळ आहे. यामुळे कुठचीही परब मंडळी ही विधी पूर्ण केल्यानंतर लग्न मंडपात येईपर्यंत कशाही परिस्थितीत काकडयाची वात विझू नये यासाठी दक्ष असतात. चारही बाजूने विशेष संरक्षण दिले जाते.

भले विवाह सातासमुद्रापार असला तरीही ही परंपरा पाळली जातेच. सध्या हे मंगलकार्य हॉलमध्ये लावण्याचा कल वाढला आहे. अशा वेळीही ही परंपरा टाळली जाऊ नये यासाठी मसणे-परब दक्ष असतात. कट्टयावरील वंशज स्थानावरील मातीची पुरचुंडी यासाठी मंगलकार्य स्थळी आणली जाते. सातासमुद्रापार विवाह करणा-या मंडळींसाठी अशी माती आवर्जून गावकरी पाठवितात आणि ती मंडळी मागवूनही घेतात. ही परंपरा टाळण्याचा कुणी प्रयत्न केला का? अथवा असे न करणा-याचे काही बरे-वाईट झाले आहे का? या प्रश्नावर परब मंडळी विषाची परीक्षा का घ्या? असा प्रतिप्रश्न करतात. लग्न हा आयुष्यातला संस्मरणीय क्षण! असा सोहळा आयुष्यात पुन्हा-पुन्हा कुणी करत नाही. लग्न तर एकदाच करायचे आहे त्यासाठी आपण लाखोंनी रूपये खर्च करत आहोत. लग्नानंतरही संसार सुखाचा व्हावा असे प्रत्येकालाच वाटते. यामुळे अशी प्रथा कुणी टाळत नाही, असे करून आपल्याला सुख-संपदा मिळत असेल तर ते नाकारण्याचा प्रश्न तरी येतोच कुठे?.. अशी माहिती जयसिंग परब यांनी दिली.

लग्नानंतर मात्र कट्टा ग्रामदेवतेच्या चरणावर लोटांगण घालताना ही परब मंडळी आपल्या वंशजाच्या स्थळावर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाहीत. असे लग्न अनुभवायचे तर या लग्नसराईत तुम्हाला कट्टयावर पोहोचावे लागेल आणि मसणे-परबांची ख्याती जाणून घ्यावीच लागेल..

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version