Home संपादकीय अग्रलेख भंपक पर्रिकर!

भंपक पर्रिकर!

0

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे डोके ठिकाणावर आहे का? देशाचा संरक्षणमंत्री एका संघटनेच्या प्रेरणेतून ‘सर्जिकल स्ट्राईक’ची प्रेरणा मिळाल्याचे सांगतो. एवढा भंपक संरक्षणमंत्री या देशाला मिळालेला नव्हता. आपण काय बोलतो आहोत. अतिरेकी तळांवरील हल्ला हा केवढा गंभीर विषय आहे आणि त्या हल्ल्याची प्रेरणा संघाकडून मिळाली, असे सांगणारा संरक्षणमंत्री हा किती विकृत मनोवृत्तीचा असेल याचा प्रत्यय देशाला आलेला आहे.

संरक्षणमंत्री झाल्यापासून पर्रिकरांचे कर्तृत्व काय? दोन वर्षात त्यांचा गोव्यात मुक्काम किती आणि संरक्षण मंत्रालयात मुक्काम किती? संरक्षण आघाडय़ांवर किती ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. नेफा बॉर्डरपासून बाबाडेरा नानकच्या पश्चिमेकडील भारताच्या हद्दीपर्यंत किती ठिकाणी पर्रिकर फिरले? दोन वर्षात संरक्षणाच्या दृष्टीने अतिरेक्यांचा काही पहिलाच हल्ला नाही. गेल्या दोन वर्षात अतिरेक्यांनी आठ वेळा हल्ले केले. या हल्यांच्या वेळी त्या हल्ल्यांचा बिमोड करावा, अशी प्रेरणा या संघवाल्यांना कधीही झाली नाही. उरीच्या लष्करी तळावरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर सारा देश संतप्त झालेला होता. मोदी असो किंवा भाजपा असो या दोघांबद्दल अति संतापाची तीव्र भावना या देशात निर्माण झाली होती. कोणती तरी कृती केल्याशिवाय लोकांचे समाधान होणार नाही, याची सरकारला खात्री पटली होती. मोदींच्या भाषणाने संताप वाढत होता. ‘किं मत चुकानी पडेगी,’ ‘बलिदान व्यर्थ न होगा’ ही मोदींची वाक्ये ऐकून लोक कंटाळले होते. पर्रिकरांना तर संरक्षणमंत्री म्हणून फारसा वाव कुठेच नाही. जसे परराष्ट्रमंत्री कोण आहेत हे देशाला सगळय़ांना माहिती होत नाही, त्याचप्रमाणे संरक्षणमंत्र्यांची भूमिका गेल्या दोन वर्षात कधीही स्पष्ट झालेली नाही आणि अचानक पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवरील हल्ला संघाच्या प्रेरणेतून झाला, असा साक्षात्कार पर्रिकरांना होतोय. काय या पर्रिकरांची कीव करावी की, असा संरक्षणमंत्री या देशाला मिळाला म्हणून संताप व्यक्त करावा. संरक्षणमंत्री काय बोलत आहेत. ज्या जवानांनी आणि लष्कराच्या प्रमुख रणवीर सिंग यांनी अतिरेकी तळांवर हल्ला करण्याची योजना आखली त्या सर्वाना मोदी आणि पर्रिकर यांनी चार दिवस नागपूरच्या रेशिम बागेत बहुधा प्रशिक्षणासाठी पाठवलेले असावे. संघाची प्रेरणा मिळाल्याशिवाय आणि शिकवणी लागल्याशिवाय हल्ला करता येणार नाही, असा लिखित अहवाल बहुधा भारतीय लष्कराने पर्रिकरांकडे दिला असावा. त्याच्यावर विचारमंथन होऊन मोदींनी हा प्रस्ताव भागवतांकडे पाठवला. मग भागवत आणि भय्याजी जोशी यांनी या सैनिकांची आणि रणवीर सिंग यांची कवायत घेतली. भागवतांनी बौद्धिकही दिले. संघाच्या प्रेरणेतूनच तुम्हाला हल्ला करावा लागेल, असा मंत्रही दिला. बाजूला पर्रिकर उभे होतेच. अगदी ‘दक्ष’ मध्ये उभे होते. भागवतांनी संघाचे दोन मोहरे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना फूल पॅण्टमध्ये हजर राहायला सांगितले होते. तीन दिवस कवायत करून संघाच्या शिबिरात स्वयंसेवक जसा तयार होतो, तसा अतिरेक्यांच्या तळावर हल्ला करण्यासाठी हा भारतीय जत्था अखेर रेशीम बागेतील संघ ध्वजाला प्रणाम करून ‘परिभ्रम’ करून निघाला आणि थेट अतिरेक्यांच्या तळांवर दाखल झाला. त्या तळांवरील अतिरेक्यांना यमसदनाला पाठवून भारतीय लष्कराचे जवान परत आले तेव्हा त्यांना आता महिना होऊन गेला. दरम्यान भागवत यांनी पर्रिकरांना फोन केला आणि विचारले की, अहो, आमच्या प्रेरणेने आणि शिकवणीतून हल्ला झाला हे कुठे तरी बोला की.. श्रेय संघालाच मिळाले पाहिजे. लष्कराचे रणगाडे चालतात, सीमेवर रोज कवायत होत आहे, याचे सगळे श्रेय भारतीय लष्कराला नसून, संघाला आहे. परवाच्या दस-याच्या दिवशी नागपुरात अध्र्या चड्डय़ा फेकून देत फूल पॅण्टी घातलेल्या संघ स्वयंसेवकांचे ते संचलन बघून भारतीय लष्कराला प्रेरणा मिळालेली आहे. १९२५ पासून संचलन होत आहे. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघवाल्यांचे राज्य यायला संधीच मिळाली नव्हती. आता ते राज्य आल्यावर मग संघाची शिकवणी आणि संघाची प्रेरणा अशा दोन्ही गोष्टी घाऊक प्रमाणात भारतीय लष्कराला लीजवर दिल्या गेल्यावर मग भारतीय लष्कर तयार झाले आणि संघाच्या शिकवणीतून हा हल्ला झाला. तेव्हा या विशेष मोहिमेचे सगळे श्रेय हे मोदींना नाही, पर्रिकरांना नाही, भारतीय जवानांना नाही तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आहे.

भारताचे राष्ट्रपती प्रणवबाबू मुखर्जी यांना पर्रिकरांनी ही बातमी सांगितल्यानंतर त्यांचाही ऊर भरून आला. पर्रिकरांना ते म्हणाले की, ‘जर अतिरेकी तळावरील हल्ल्याची प्रेरणा आणि शिकवणी संघाची असेल तर १९६५ साली भारतीय लष्कराने पाकविरुद्ध युद्ध जिंकले, त्याची प्रेरणा कोणापासून असावी हो..? १९७१च्या बांगलादेशच्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या नियाझीला शरण आणले ती प्रेरणा कुणापासूनची होती हो?.. ते जाऊ द्या.. अगदी भाजपाचे पंतप्रधान असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगीलचे युद्ध जिंकले तेव्हा वाजपेयींनासुद्धा हे संघाचे श्रेय आहे हे काही आठवले नाही.’ वाजपेयींपेक्षा पर्रिकर अधिक इनामदार आहेत. त्यामुळे अतिरेकी तळांवरील हल्ल्याचे श्रेय त्यांनी संघाला दिले. नशीब एवढेच की, मागच्या सर्व युद्धांचे श्रेय त्यांनी संघाला दिले नाही. पर्रिकर महाशय एक गोष्ट विसरतात. अतिरेकी तळांवर हल्ला करून सैन्यांनी पराक्रम केलेला आहे. पण ज्या अतिरेक्यांनी उरीच्या लष्करी तळावर हल्ला केला आणि झोपेत असलेल्या भारतीय जवानांना अतिरेक्यांनी हल्ला करून मारले. भारतीय लष्कराचे कुंपण तोडून हे अतिरेकी नुसतेच घुसले नाहीत तर २०० यार्ड चालत जाऊन त्यांनी भारतीय लष्करी तळावर हल्ला केला. या अपयशाचे धनी कोण आहे? पर्रिकरांनी ती जबाबदारी स्वीकारली काय? संघाचा उल्लेख तेव्हा झाला काय? जिंकलो तर संघ, जिंकलो तर भाजपा, जिंकलो तर मोदींमुळे.. आणि मार खाल्ला ते कुणामुळे? १९ जवान शहीद झाले त्याची खंत या पर्रिकरांनी व्यक्त तरी केली का? भारतीय लष्कराच्या पराक्रमावर हात मारून श्रेय घेणारे पर्रिकर जेवढे छोटय़ा मनाचे आहेत तेवढेच या हल्ल्याचे श्रेय संघाला देणारे संरक्षणमंत्री कोत्या मनाचे आहेत. भारताला असा तीनपाट संरक्षणमंत्री लाभला हे या देशाचे दुर्दैव आहे. कोणत्या लोकांना आपण सत्तेवर बसवले आहे, याचा या देशाला आता पश्चाताप होत असेल. एखादा लष्करी अधिकारी निश्चितपणे पर्रिकरांची खिल्ली उडवल्याशिवाय राहणार नाही. लढले कोण, झुंजले कोण, श्रेय कोण घेत आहे?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version