Home महामुंबई आधी झालेले हल्ले सर्जिकल नव्हते

आधी झालेले हल्ले सर्जिकल नव्हते

0

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात २०११ मध्ये सर्जिकल हल्ले झाल्याचे वृत्त पुराव्यांनिशी प्रसिद्ध झाल्यानंतर मौन धारण करणा-या केंद्र सरकारने आता सारवासारव सुरू केली आहे.

मुंबई- संयुक्त पुरोगामी आघाडीच्या काळात २०११ मध्ये सर्जिकल हल्ले झाल्याचे वृत्त पुराव्यांनिशी प्रसिद्ध झाल्यानंतर मौन धारण करणा-या केंद्र सरकारने आता सारवासारव सुरू केली आहे.

२९ सप्टेंबर २०१६चा हल्ला ‘सर्जिकल’ होता, याआधी तसे हल्ले झाले असले तरी त्याला ‘सर्जिकल’ म्हणता येणार नाही, असा पवित्रा संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी घेतला. असा हल्ला प्रथमच केल्याचे सांगत मोदी सरकारने आणि भाजपाने गेले काही दिवस स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. मात्र २०११च्या सर्जिकल हल्ल्याच्या वृत्तानंतर आता भाजपाने बचावासाठी दयनीय सबबी पुढे केल्या आहेत.

आधी श्रेयासाठी पोस्टरबाजी केल्यानंतर, या हल्ल्याचे श्रेय लष्कर व १२७ कोटी जनतेचे असल्याचे सांगत पर्रिकर यांनी सरकारवरील टीकेची धार बोथट करण्याचा प्रयत्न केला. संपुआ सरकारच्या काळात पाकिस्तानला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यावेळीही लष्कराने पाकव्याप्त काश्मिरात धडक कारवाई करून पाकिस्तानच्या सैनिकांना कंठस्नान घातले होते, याचा संपूर्ण अहवाल ‘द हिंदू’ने प्रसिद्ध केला.

यामुळे खोटेपणा उघड होत चालल्याचे दिसल्यावर आता केंद्र सरकारने यापूर्वी सर्जिकल हल्ले झाले नसल्याचे जाहीर केले. येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना पर्रिकर म्हणाले की, यापूर्वी झालेले सर्जिकल हल्ले हे सीमेवर तैनात कृती दलांनी केले होते. ही कारवाई करताना सरकारला कल्पना देण्यात येत नाही. तिथला वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊन मोहीम पार पाडतो. नंतर त्याचा अहवाल पाठवण्यात येतो.

भारतीय लष्करासह जगभरात सर्वच देशांची सीमा कृती दले अशा कारवाया करत असतात. मात्र, उरी हल्ल्यानंतर केलेली कारवाई ही ‘सर्जिकल’ हल्ला होती. कारण त्याचा संपूर्ण निर्णय राजकीय नेतृत्वाने घेऊन लष्कराला अंमलबजावणीची मोकळीक दिली होती. त्यानंतर लष्कराने त्याची अंमलबजावणी केली, असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्रिकरांनी लष्कराचा अपमान केला-कॉँग्रेसचा आरोप

संपुआच्या काळात सर्जिकल हल्ले झाले नाहीत, असे सांगून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी लष्कराचा अपमान केला आहे, अशी टीका कॉँग्रेसने केली. पर्रिकर हे जनतेची दिशाभूल करून ते याप्रश्नी राजकारण खेळत असल्याचा आरोप कॉँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

पर्रिकर यांनी हल्ल्याचे संपूर्ण श्रेय लष्कराला दिले. मात्र, यापूर्वी सर्जिकल हल्ले झाले नाहीत, असे सांगून ते जनतेची दिशाभूल का करत आहेत. २०११ मधील ‘ऑपरेशन जिंजर’ हा मोठा सर्जिकल हल्लाच होता.

लष्कराच्या कामगिरीवर पर्रिकर गप्प का? ते या विषयाचे राजकारण करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी तुम्ही लष्कराला पूर्ण श्रेय देता, मग निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये उरी हल्ल्याचा बदला घेतल्याची पोस्टर्स का लागली आहेत? मोदींना रामाच्या रूपात सादर का केले जात आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version