Home देश भोंदूबाबांची नावे जाहीर करणारे महंत बेपत्ता

भोंदूबाबांची नावे जाहीर करणारे महंत बेपत्ता

0

महंत मोहनदास यांच्याजवळ असलेल्या रोकडमुळे काही दगाफटका झाला आहे, की काही दिवस अगोदर आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या भोंदूबाबांच्या यादीने दुखावलेल्या एखाद्या भोंदूबाबाच्या समर्थकाने घातपात केला, याबद्दल संशय व्यक्त होत आहे.

मुंबई- महंत मोहनदास हे आखाडा परिषदेचे प्रवक्ता आहेत आणि बडा उदासीन आखाड्याचे कनखल येथे कोठारी महंत आहेत. १५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री त्यांनी हरिद्वार येथून मुंबईकडे येण्यासाठी लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. दुस-या दिवशी सकाळी भोपाळ स्टेशनवर त्यांचा एक शिष्य त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेला असता, ते त्यांच्या राखीव सीटवर आढळले नाहीत.

दरम्यान, रात्री मेरठ येथपर्यंत ते प्रवासात होते असे सहप्रवाशांची माहिती घेतली असता समजते. त्यानंतर झोप लागल्याने महंत मोहनदास उतरून गेले, की त्यांचे काही बरेवाईट झाले हे कोणीही सांगू शकलेले नाही. त्यांच्या सीटजवळ त्यांचे कपडे आदी साहित्य आढळून आले. मात्र, साधूंजवळ बटवा असतो, तो मात्र नव्हता. या बटव्यात रोख रक्कम आणि त्यांच्या अंगावर काही दागिनेदेखील आहेत.

अर्थात महंत मोहनदास यांच्याजवळ असलेल्या रोकडमुळे काही दगाफटका झाला आहे, की काही दिवस अगोदर आखाडा परिषदेने जाहीर केलेल्या भोंदूबाबांच्या यादीने दुखावलेल्या एखाद्या भोंदूबाबाच्या समर्थकाने घातपात केला, याबद्दल संशय व्यक्त होत आहे. महंत मोहनदास यांचे अपहरण झाले, की ते स्वत:च निघून गेले आहेत, याबाबत संभ्रमावस्था आहे. रेल्वे प्रशासनाने देखील याबाबत दखल घेण्याची गरज आहे. केंद्र सरकारने याबाबत सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी आखाडा परिषदेने केली आहे.

दरम्यान, साधूंना त्रास देणा-या भोंदूबाबांच्या समर्थकांपासून संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील आखाडा परिषदेने केली आहे. आखाडा परिषदेच्या बैठकीस स्वामी सागरानंद सरस्वती महाराज, महामंत्री महंत हरिगिरी महाराज, षडदर्शन आखाडा परिषद प्रवक्ता डॉ. बिंदुजी महाराज, महंत शंकरानंद महाराज, अभयानंद ब्रह्मचारी, राजेंद्रसिंह महाराज, विचारदास महाराज, बालकमुनी महाराज, आनंदपुरी महाराज आदींसह विविध आखाडय़ांचे साधू, महंत, पदाधिकारी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version