Home संपादकीय तात्पर्य लोकहो, भोंदू बाबांपासून सावधान!

लोकहो, भोंदू बाबांपासून सावधान!

0

देशभरात बुवा-बाबांचे पीक आले आहे. अचडणीत सापडलेल्या सर्वसामान्यांना आणि शहाण्यांनाही ते सापळ्यात गुंतवत आहेत. त्यांच्या लीला बाहेर समजल्या की त्यांना कायद्याचा बडगा दाखविण्यात येतो.

‘चमत्कार तेथे नमस्कार’ अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. तुम्ही जर का एखादा चमत्कार करून लोकांना दाखवलात तर लोक तुमच्या पाठीमागे धावतील, तुमची पूजा करतील, सेवा करतील. कारण तुमच्यामध्ये त्यांना त्यावेळी देव दिसतो, तुमच्यामध्ये दैवीशक्ती आहे, असा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होऊन ते लोक तुमचे भक्त होतात. बाबा, बुवा, महाराज, बापू यांनी भक्तांतील ही कमजोरी (अंधश्रद्धा) ओळखून त्यांना आपल्या नादी लावले आणि त्यांच्या आयुष्याचे वाटोळे केले. असेच भक्तांना नादी लावणारे बाबा, बुवा आज आपल्या देशात आसेतू हिमाचल धुमाकूळ घालत आहेत.

या बुवा-बाबांपैकी एक बाबा म्हणजे हरियाणातील डेरासच्चा सौदाचा प्रमुख गुरमित राम रहीम सिंग. नुकतेच याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोन साध्वींवर केलेल्या बलात्कार प्रकरणी दोषी ठरवत २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे लोकांचा न्यायालयावरील विश्वास दृढ होईल. अजूनही या बाबावर खुनासारखे गंभीर आरोप आहेत. याही खटल्यात न्यायालय योग्य तो निर्णय देईल, असा विश्वास आहे. या राम रहीम बाबासारखे अजूनही बाबा तुरुंगात खितपत पडले आहेत.

एक हरियाणातीलच बाबा रामपाल व दुसरा गुजरातमधील तुरुंगात असलेला आसारामबापू व त्याचा सुपुत्र नारायण साई. बाबा रामपालवर खून, नरबळी, देशद्रोह, हिंसाचार, कटकारस्थान व पोलिसांच्या कारवाईत अडथळा निर्माण करणे असे गंभीर गुन्हे आहेत. आसाराम बापू व त्याच्या पुत्रावर बलात्काराचे आरोप आहेत. या बाबांनाही राम रहीम बाबाबरोबर तुरुंगात खडी फोडायला कधी पाठवणार, असे आता जनता विचारत आहे. या बाबांचा पूर्वेतिहास तपासला तर गुन्हेगारी वृत्तीचा दिसून येतो. कोण भ्रष्टाचारी, कोण स्त्रीलंपट, कोण ऐय्याशी, गर्विष्ठ, कोपिष्ठ असे हे भोंदूबाबा खरे तर ऐदीच असतात. कामधंदा न करता बसल्या जागेवर सर्व काही मिळविण्याच्या विचाराने ते भोळ्याभाबडय़ा, अंधश्रद्धाळू लोकांना उल्लू बनवून आपल्या नादी लावतात.

गडगंज संपत्ती कमवून ऐषोरामाचे जीवन जगत असल्याची त्यांची वानगीदाखल उदाहरणे काही कमी नाहीत. कष्ट न करता सर्वच गोष्टी त्यांच्याकडे चालून आल्यामुळे ते पुढे मुजोर बनतात. त्यात त्यांना राजाश्रय मिळाला की ते मदमस्त होतात. याचीच ही वरील ज्वलंत उदाहरणे होय! या बुवाबाबांचा पूर्वेतिहास, त्यांचे कर्तृव आपणा सर्वास ज्ञात असूनसुद्धा लोक अशा बाबांच्या मागे का धावतात? हे त्यांचे धावणे खरे तर प्रत्येकाच्या मेंदूला झिणझिण्या आणण्यासारखे आहे. हे बाबा तसे हुशार. आपल्या भक्तांच्या समस्या काय आहेत व काय असायला पाहिजे ते बाबा बरोबर ओळखतात आणि तशा प्रकारची त्यांना सढळ हस्ते मदत करतात. कोणाला भांडीकुंडी, कोणाची राहण्याची, खाण्याची सोय, तर कोणाचे सामूहिक विवाह करून ते भक्तांना वश करतात. त्यांच्या तथाकथित आश्रमामध्ये हे सर्व होत असते. हे आश्रम म्हणजे त्यांची ही शक्तिस्थळे असतात. भक्तांना अशाप्रकारची मदत मिळू लागली की भक्त डोळे मिटून त्यांच्या भक्तीत लीन होतात.

आता सर्वाना प्रश्न पडाला असेल की, या बाबांजवळ एवढा पैसा येतो कोठून? तर त्याचे उत्तर म्हणजे बाबासमोर नतमस्तक होणारे, त्यांच्या समोर नाक घासणारे राजकीय पुढारी या बाबांचे भक्त. त्यांचे प्रश्न राजकीय. बाबा देखील त्यांच्या राजकीय भविष्याबद्दल थातुरमातूर उत्तरे देऊन त्यांचे मानसिक समाधान करतात. मग पुढारी मंडळी खूष होऊन बाबासाठी ‘वाट्टेल ते’ करण्याची तयारी दाखवतात. तसेच मोठेमोठे उद्योगपतीही बाबांचे भक्त आहेत. बाबांची आपल्यावर कृपा व्हावी म्हणून वाटेल तेवढे पैसे बाबांच्या झोळीत टाकतात आणि तोच पैसा बाबा आपल्या भक्तांना मदतीच्या रूपाने देतात. खरे तर बाबांच्या आतल्या गोष्टी भक्तांना ज्ञात नसतात.

या बाबांजवळ कोणी जायचे, कोणी नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण या कुप्रसिद्ध बाबांना वाचविण्यासाठी भक्त रस्त्यांवर उतरून हिंसक होतो तेव्हा मात्र मती कुंठीत होते. याला काय म्हणायचे! हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे. खरे तर महान परंपरा लाभलेला आपला भारत देश महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्या विचारी घडलेला, तसेच बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, आगरकर, रानडे या समाजसुधारकांचा वारसा लाभलेला सुसंस्कृत असा देश आहे. अशा देशात या तथाकथित बाबांची काळीकृत्ये वाढीस लागणे म्हणजे समाजसुधारकांच्या विचारांना हरताळ फासण्यासारखे आहे. हे खेर तर भारतीयांचे दुर्दैव म्हणावे लागेल. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते, की यापुढे तरी या भोळ्याभाबडय़ा भक्तांनी ‘बगल मे छरी, मूँह मे राम’ अशा भोंदूबाबापासून सावध राहावे. एक सुसंस्कृत माणूस म्हणून जगावे. यातच त्याचे व समाजाचे कत्याण आहे.

[EPSB]

गाव करी तेथे कोण काय करी..!

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल यापूर्वीच वाजले आहे. ऑक्टोबर महिन्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडत आहेत. कोकणातील राजकीय वातावरण यानिमित्ताने पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version