Home क्रीडा भारताला नमवून इंग्लंड अंतिम फेरीत

भारताला नमवून इंग्लंड अंतिम फेरीत

0

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीची रंगीत तालिम असलेल्या ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने सपशेल निराशा केली आहे. 

पर्थ – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीची रंगीत तालिम असलेल्या ऑस्ट्रेलियातील तिरंगी मालिकेत भारतीय क्रिकेट संघाने सपशेल निराशा केली आहे. कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यांच्या तिरंगी मालिकेत भारताला एकही विजय मिळवता आला नाही.

शुक्रवारी शेवटच्या साखळी सामन्यात इंग्लंडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने विजयासाठी दिलेले २०१ धावांचे लक्ष्य इंग्लंडने सात गडी गमावून पार केले.

संपूर्ण तिरंगी मालिकेत सुमार कामगिरी करुनही नशिबाने भारतीय संघाला अंतिम फेरी गाठण्याची संधी दिली होती. भारताला फक्त शुक्रवारचा एक सामना जिंकायचा होता. मात्र भारतीय संघाला तो ही जिंकता आला नाही. फलंदाजांच्या सुमार कामगिरीनंतर गोलंदाजांनी विजयाची आशा निर्माण केली होती. मात्र टेलर आणि बटलर या जोडीने सहाव्या विकेटसाठी १२५ धावांची अमूल्य भागीदारी करुन, भारताची विजयाची संधी हिरावून घेतली.

इंग्लंडकडून टेलरने सर्वाधिक (८२) तर, बटलरने (६७) धावा केल्या. इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरल्यानंतर मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी आणि मोहोम्मद शामी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन, इंग्लंडला प्रारंभी धक्के दिले. ६६ धावात इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. भारता हा सामना जिंकेल असे त्यावेळी चित्र होते.

मात्र त्यानंतर टेलर आणि बटलरची जोडी जमली. या दोघांनी भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करीत इंग्लंडचा विजय निश्चित केला. टेलरला ८२ धावांवर मोहित शर्माने बिन्नीकरवी झेलबाद केले. मात्र तो पर्यंत खूप उशीर झाला होता. इंग्लंडला विजयासाठी फक्त दहा धावांची गरज होती. अखेर वोक्स आणि ब्रॉड या जोडीने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, सामन्यात प्रथम फलंदाजी स्वीकारणा-या भारताने ४८.१ षटकात सर्वबाद २०० धावा केल्या. आगामी विश्नचषकाची पूर्वतयारी म्हणून पाहिल्या जाणा-या तिरंगी मालिकेतील इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या साखळी सामन्यात भारतीय फलंदाजांनी साफ निराशा केली.

भारताचा सलामीवीर अजिंक्य रहाणे वगळता एकाही फलंदाजांला योग्य कामगिरी करता आली नाही. रहाणेने एकाकी किल्ला लढवत भारताची धावसंख्या वाढवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ लाभली नाही आणि भारताचा संपूर्ण संघ २०० धावांत बाद झाला.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपयशी ठरत असलेल्या शिखर धवनने आश्वासक सुरवात केली खरी मात्र तोही पुन्हा एकदा अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खो-याने धावा कऱणा-या विराटला अद्याप सूर गवसलेला दिसत नाही. संपूर्ण डावात भारताच्या तब्बल सहा फलंदाजांना केवळ एकेरी धावसंख्या करता आली.

तिरंगी मालिकेतील अंतिम फेरीत पोहोचण्यासाठीच्या या अटीतटीच्या लढतीत इंग्लडने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीस बोलवले. भारताची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांनी सावध सुरुवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर धवन ३८ धावांवर असताना त्याला वोक्सने बाद केले.

त्यानंतर तिस-या क्रमांकावर आलेल्या विराट कोहलीला केवळ आठ धावा करता आल्या. मोईन अलीने त्याला रुटकडे झेल देण्यास भाग पाडले. भारताच्या दोन बाद १०३ धावा झाल्या असताना सुरेश रैना मैदानावर उतरला. त्यानेही साफ निराशा केली. केवळ एक धावा करत तो वोक्सकडे झेल देत तंबूत परतला. त्यानंतर रायडूही १२ धावा करुन परतला. एकीकडे भारताची फलंदाजी ढेपाळत असताना दुस-या बाजूने रहाणेने एकाकी किल्ला लढवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

मात्र त्याचा अडसर फिनने दूर केला. त्याने १०१ चेंडूत ७३ धावा केल्या. तर ऑलराऊंडर स्टुअर्ट बिन्नी केवळ सात धावा करुन बाद झाला. बिन्नीनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला मात्र तो सफल ठरला नाही. त्याने १७ धावा केल्या. त्यानंतर तळाचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद होत गेले. भारत नऊ बाद १६५ धावसंख्येवर असताना मोहम्मद शामीने अखेरच्या विकेटसाठी ३५ धावांची भागीदारी रचली आणि त्यानंतर भारताचा डाव २०० धावांवर आटोपला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version