Home महामुंबई बदलापूरमध्ये १६७ निविदांना मंजुरी मिळूनही ५० निविदा रद्द

बदलापूरमध्ये १६७ निविदांना मंजुरी मिळूनही ५० निविदा रद्द

0

कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या निविदांचा गोंधळ

बदलापूर-  कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेच्या वतीने १६७ निविदांच्या प्रक्रियांना मंजुरी दिली तर काहींचे कामाचे आदेश दिले होते. पण त्यातील ५० निविदांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी मिळाली, पण वर्कऑर्डर न मिळाल्याने रद्द कराव्या लागल्या याची चौकशी व्हावी, याला कोण जबाबदार आहेत, असा प्रश्न भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक संभाजी शिंदे यांनी सभागृहात केला. त्यानंतर नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी, या पूर्वीचे मुख्याधिकारी देविदास पवार हेच त्याला जबाबदार आहेत. आपल्याला शहानिशा करायची असेल तर मी आपल्यासोबत यायला तयार आहे. नवीन मुख्याधिकारी प्रकाश बोरसे आल्यानंतर ही पहिलीच सर्वसाधरण बैठक असल्याने जास्तीत जास्त नगरसेवक सभेला हजर होते.

भुयारी गटार योजनेचे तीनतेरा, तरीही देयके अदा का केली?
कोटय़वधी रुपये खर्च करून भुयारी गटार योजना केली, पण अनेक ठिकाणी मेनहोलमध्ये माती, रेती, रिकाम्या गोण्या, चिखल त्यातच राहिला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारे तुंबत आहेत. तर बदलापूर (प.) रमेशवाडीतील समर्थनगरातील के. बी. एल. शाळेजवळ असलेल्या आई योगेश्वरी सोसायटी, बदलापूर गाव व इतर अनेक सोसायटय़ांमध्ये भुयारी गटार लाईन जोडणीचे कामे अजून अपूर्ण आहेत. तरीही कंत्राटदारांची देयके कशी अदा केली असा प्रश्न राष्ट्रवादीचे नगरसेवक आशीष दामले यांनी करीत त्याच कंत्राटदाराकडून भरपाई घ्यावी, अशी मागणी केली. यावर मुख्याधिकारी प्रकाश बोरसे म्हणाले की, संबंधित कंत्राटदाराची सुरक्षा रक्कम व चार्जेस आपल्याकडे असून गरज पडल्यास कॅमेरा टाकून कुठे माती अडकली आहे किंवा नेमका काय चुका झाल्यात हे तपासले जाईल व त्याचा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल केला जाईल असे सांगितले.

स्कायवॉकवर नगरसेविकेचाही पाय फ्रॅक्चर
मागील वर्षभरापासून स्कायवॉकवरील लाद्या निखळल्या आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगर परिषद प्रशासनाला अखेर स्कायवॉक दुरुस्तीचा मुहूर्त सापडला नव्हता. नागरिकांची होत असलेली गैरसोय व अपघातांची शक्यता लक्षात घेता लवकरच स्कायवॉकची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच स्कायवॉकच्या लाद्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या अधिका-यांनी केलेल्या पाहणीत रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे उतरणा-या स्कायवॉकच्या ३३९, कर्जतकडे जाणा-या स्कायवॉकच्या २१० लाद्या तर बदलापूर पश्चिमेकडील बदलापूर गाव दिशेकडील ३६० व एसटीस्टँडकडे जाणा-या स्कायवॉकच्या ५४० लाद्या निखळलेल्या असल्याचे आढळून आले आहे. तसेच त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अपघात होण्याची शक्यता असल्याने त्वरित या स्कायवॉकची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचेही नगर परिषद प्रशासनाने मान्य केले आहे. स्कायवॉक दुरुस्तीच्या या कामाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. या कामासाठी सुमारे २ लाख ३० हजार रुपये खर्च अपेक्षित असल्याचेही नगर परिषद प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यावर भाजपचे संभाजी शिंदे यांनी फक्त तुटलेल्या लाद्यांची डागडुजी न करता तेथे कचराकुंडय़ा ठेवणे, रंगरंगोटी आदी कामेही करण्याची मागणी केली. तर शिवसेनेच्या नेहा आपटे यांनी स्कायवॉकवर लाद्यांऐवजी कोबा करण्याची व भाजपच्या संजय भोईर यांनी कोबा वा कडप्पा लाद्या बसवण्याची मागणी व दलित वस्ती सुधारणा योजनेत केवळ एकच गार्डन आहे व त्याचे कामही पेंडिंग असून सुरू करण्याची मागणी केली. स्कायवॉकवरील तुटलेल्या लाद्यांवर पडल्याने पाय फ्रॅक्चर झाला होता, असे नगरसेविका नेहा आपटे यांनी सभागृहात सांगितले.

डॉक्टर वैद्यकीय रजेवर : रुग्णालय बंद
नगरपरिषदेच्या दुबे रुग्णालयातील डॉक्टर अंकुश हे १० दिवसाच्या वैद्यकीय रजेवर आहेत. अजून १५ दिवस रजा वाढवून घेणार असल्याचे सांगण्यात येते. गोरगरीब जनतेला याच रुग्णालयात उपचार घ्यावे लागतात. जोपर्यंत डॉक्टर हजर होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या डॉक्टरची नेमणूक करावी. जेणेकरून ऐन साथीच्या काळात गरजूंना वेळीच उपचार मिळतील अशी अपेक्षा प्रशांत (अण्णा ) कुलकर्णी यांनी केली.

[EPSB]

ठाण्यातून बेपत्ता महिलेचा मृतदेह कळवा खाडीत सापडला

मुंबई-ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर साचलेल्या पाण्यातून चालताना बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह सापडला आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version