Home Uncategorized शेतक-यांनी कृषी प्रदर्शनाला भेट द्यायलाच हवी!

शेतक-यांनी कृषी प्रदर्शनाला भेट द्यायलाच हवी!

0

कोकणात भात कापणी झाली की उत्सुकता असते ती आंबा-काजू मोहराची. कारण या पिकांवरच इथले अर्थकारण अवलंबून असते. आंब्याला पालवी आली की मोहोर, थंडी कशी काय पडते, मळभट आले तर पाऊस तर पडणार नाही ना, अशा अनेक गोष्टींची चर्चा या दरम्यान शेतक-यांमध्ये असते. कारण या दरम्यान कणी, फका पडली तर चांगल्या हंगामाची अपेक्षा करता येते.याच नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान वेगळयावेगळया ठिकाणी कृषी प्रदर्शनही सुरू होतात. नुकतीच नाशिक, कराड, पुणे येथे काही प्रदर्शने झाली. सध्या शेतीविषयक चर्चासत्र, कार्यशाळा, शिबिरे आणि प्रदर्शने यातून शेतक-यांचा शेतीविषयक माहिती गोळा करण्याचा कल वाढत आहे.

प्रदर्शनात शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान प्रत्यक्ष अनुभवता येते. विक्रेत्यांशी, तज्ज्ञांशी चर्चा करता येते. त्यामुळे या विषयी शेतक-यांत उत्सुकता असते. हीच उत्सुकता गेली दोन वष्रे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणा-या सिंधू कृषी, औद्योगिक, पशु-पक्षी, मत्स्य व्यवसाय व पर्यटन प्रदर्शन व मेळाबद्दल आहे. यावर्षी हा कार्यक्रम दि. ९ ते १२ डिसेंबपर्यंत एस. टी. डेपो मैदान, मुंबई-गोवा महामार्ग, कु डाळ येथे आहे.

गेल्या दोन वर्षाप्रमाणे यावर्षीही खते, कीटकनाशके, बी-बियाणे, शेतीविषयक अवजारे, पुस्तके, जलसिंचन, फवारणी यंत्र, पॉवर टिलर, गवत कापणी यंत्र यांचे स्टॉल आहेतच, तसेच सदृढ गाय, वासरू, बैल, म्हैस स्पर्धा, डॉग शो आणि विक्रीसाठी दुभती जनावरे यांची दिवसेंदिवस वाढणारी संख्येसह आहेतच. या वर्षीच्या प्रदर्शनात विशेष म्हणजे डॉ. नितीन मरकडेय सरांचे मार्गदर्शन. डॉ. मार्कंडेय हे पशुवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे प्राध्यापक आहेत.

शैक्षणिक आणि पशुसंवर्धनाचा त्यांना वीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे. शेतीविषयक दैनिके, मासिके, यात त्यांनी दुग्धव्यवसायसंदर्भात विपुल लेखन केले आहे. सोप्या भाषेत ते पशुपालकांना दुग्ध व्यवसायातील गुपित सांगतात. ते प्रत्यक्ष अनुभवण्यासारखे आहे. आपल्याकडे आता कुठे दुग्धव्यवसाय बाळसे घेतोय. या अवस्थेत दुग्ध व्यवसायिकांसाठी त्यांचे तांत्रिक मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रा. मार्कंडेय हे दुग्धव्यवसायातील अधिकारी व्यक्ती आहेत. त्यामुळे परिसंवादानेच शेतक-यांच्या शंकांचे निरसन होईल. या प्रदर्शनाच्या निमित्ताने ही एक सुवर्णसंधी आहे.

प्रदर्शनाच्या तिस-या दिवशी म्हणजे रविवारी ११ डिसेंबरला सकाळी १० वा. दुग्धव्यवसायातील शेतक-यांनी अवश्य उपस्थित राहावे. यानंतरचा आणखी एक विषय म्हणजे सगुणा भात लागवड तंत्र. कृषिपर्यटनाचे प्रणेते श्री. चंद्रशेखर मडसावळे यांनी पारंपरिक चिखलणी व लावणी न करता भातशेती करण्याचे हे बहुगुणी तंत्र सगुणा बाग, नेरळ, रायगड येथे विकसित केले आहे. या सगुणा भात लागवड तंत्रात भात शेतीची संबंधित उखळणी, चिखलणी व लावणी न करता कायमस्वरूपी गादी वाफ्यावर टोकणी करून उत्तम भात पिकवण्याचे नवे तंत्र आहे.

या पद्धतीत भात पिकानंतर त्याच गादी वाफ्यावर थंडीमध्ये वाल, चवळी, भेंडी, कांदा, कोबी इ. व त्यानंतर उन्हाळयात पाण्याची सुविधा असल्यास वैशाखी मूग, भुईमूग, भेंडी, सूर्यफूल अशी फेरपालट पिके येऊ शकतात. या सगुणा भात लागवड तंत्रामुळे भातशेतीतील वेळ, खत, श्रम यात बचत होते आणि जास्त उत्पन्न मिळते. सध्या मजुरांच्या कमतरतेमुळे भातशेती पडीक होत चालली आहे. त्यासाठी सगुणा पद्धत रामबाण उपाय आहे.

शासनाच्या कृषी विभागामार्फत या सगुणा भात तंत्राची एस. आर. टी. ची प्रात्यक्षिके राज्यात केली जात आहेत. आपल्या या कृषी पशु-पक्षी मेळाव्याच्या निमित्ताने भातशेतीतील हे तंत्र आपल्याला अवगत करता येईल. जागतिक पातळीवर या तंत्रज्ञानाचे कौतुक होत आहे. त्याची माहिती त्याच्या जनकाकडून आपल्याला मिळणार आहे. तेव्हा हाही कार्यक्रम न चुकवण्यासारखाच आणि तोसुद्धा रविवारी दुपारी, सोमवारी प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी जैन ‘इरिगेशनचे’ कृषी विद्यावेत्ता श्री. सुजय पाटील हे उस लागवडीचे तंत्र आणि जलसिंचन या विषयी मार्गदर्शन करणार आहेत.

श्री. पाटील हे गेली पंधरा वष्रे देश- विदेशात उस लागवडीत कार्यरत आहेत. त्यांच्या या अनुभवानेच पश्चिम महाराष्ट्रातील उस शेतकरी एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेत आहेत. आपल्याकडेही ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. मात्र सरासरी २० ते २५ टन आपले उत्पादन आहे. ते वाढविण्याच्या दृष्टीने पाटीलसाहेबांच्या मार्गदर्शनाचा फायदा होईल.

पाटीलसाहेबांचे शेतक-यांच्या शेतावरील अनुभव आपल्या ऊस उत्पादक शेतक-यांसाठी कानमंत्र ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांनी शेकडो एकरवर ब-याच शेतक-यांच्या शेतावर सामूहिक सिंचन सुविधा निर्माण केलेल्या आहेत. त्यांच्याही सक्सेस स्टोरी आपल्याला कळणार आहेत. लागवडीचे मर्म आणि पाण्याचे नियोजन जाणून घेण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. तिस-या वर्षी होणा-या या प्रदर्शनामुळे शेतक-यांची नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी येवकच व्हया!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version