Home टॉप स्टोरी एकनाथ खडसेंची तासभर चौकशी

एकनाथ खडसेंची तासभर चौकशी

0

भ्रष्टाचाराचे एका मागोमाग एक आरोप आणि चौकशांमुळे बेजार झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी सायंकाळी नाशिकमधल्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजेरी लावली.

नाशिक- भ्रष्टाचाराचे एका मागोमाग एक आरोप आणि चौकशांमुळे बेजार झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी सायंकाळी नाशिकमधल्या लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात हजेरी लावली. गोपनीय तक्रारीच्या चौकशीचा भाग म्हणून खडसेंना बोलावण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, त्यांची एक तास चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकनाथ खडसे सव्वा तास लाचलुचपत विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या केबिनमध्ये होते. यावेळी लाचलुचपत विभागाच्या कनिष्ठ अधिका-यांनाही प्रवेश देण्यात आलेला नव्हता. खडसेंवर पुणे, जळगावसह अनेक ठिकाणच्या भ्रष्टाचाराचे आरोप सातत्याने केले गेले आहेत. यातल्या एखाद्या चौकशीसाठी खडसेंना बोलावण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सायंकाळी पाच वाजता खडसे लाचलुचपत विभागाच्या कार्यालयातून बाहेर पडले. यावेळी चित्रीकरणासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींजवळही खडसेंनी आपली नाराजी उपरोधिक शब्दांत व्यक्त केली. माझे मोठे आणि चांगले फोटो घ्या, असे सांगत खडसे माध्यमांशी न बोलताच निघून गेले.

खडसेंच्या या गोपनीय चौकशीचे कारण नेमके काय यावरून चर्चांना उधाण आले होते. सत्तापद गेल की पक्ष कार्यकर्ते नेते कशी पाठ फिरवतात, हे यावेळी पाहायला मिळाले. कधीकाळी खडसे नाशिकमध्ये आले तर त्यांच्या मागेपुढे फिरणारा एकही नाशिकमधला नेता, कार्यकर्ता यावेळी खडसेंसोबत नव्हता हे विशेष. खडसेंसोबत दिसलो तर पालकमंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांची नाराजी नको यामुळे अनेकांनी खडसेंना पाठ दाखवल्याचे बोलले जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version