Home महामुंबई ठाणे ७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामग्री जप्त

७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामग्री जप्त

0

कल्याण येथील रेतीबंदर परिसरात मंगळवार दुपारनंतर महसूल विभागाने घातलेल्या संयुक्त धाडीचे काम दुस-या दिवशीही सुरूच होते. 

कल्याण- कल्याण येथील रेतीबंदर परिसरात मंगळवार दुपारनंतर महसूल विभागाने घातलेल्या संयुक्त धाडीचे काम दुस-या दिवशीही सुरूच होते. बुधवारीदेखील जप्त केलेल्या यंत्रसामुग्री आणि रेतीसाठय़ाची मोजदाद करण्याचे काम सुरू असून तब्बल ७२ कोटींपेक्षा जास्त यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली आहे. यातील काही सामुग्री परत वापरात येऊ नये म्हणून नष्ट करण्यात आली.

अवैध रेती उत्खननाच्या तक्रारींची दखल घेऊन मंगळवारी दुपारी स्वत: जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त ई. रविंद्रन, पोलीस उपायुक्त संजय शिंदे, यांनी आपल्या पथकांनिशी कल्याण रेतीबंदर येथे संयुक्तपणे धडक मारली होती.

या कारवाईत महसूल विभाग, पोलीस, कल्याण डोंबिवली पालिका पथक, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या अधिकारी आणि कर्मचा-यांनी या धाडीत सक्रीय सहभाग घेतला होता. या धाडीत अवैधरित्या साठवलेला तब्बल ९० लाख रुपये किमतीचा ५८५१ ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला. तर रेती उत्खननासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री जप्त करण्यात आली.

दरम्यान या कारवाईत १६ ट्रक्स (६० लाख), छोटा हत्ती ६ (९ लाख), छोटे टेम्पो २ (३ लाख), जीप २ (६ लाख), क्रेन्स ३४ (१२ कोटी ९५ लाख), बार्ज २९ ( ३८ कोटी ८० लाख), बोटी १३ ( ६५ लाख), सक्शन पंप्स ९६ ( ८ कोटी ७३ लाख), बूमट ३३ (१ कोटी ३२ लाख), बकेट ३९ (२७ लाख ३० हजार), जाळी २ ( १० हजार), मोटार पंप्स १८ ( ३६ लाख), जनरेटर १ (२ लाख), ड्रेझर ६ (७ कोटी ५० लाख), सिलिंडर १७ (८५ हजार) अशी सामग्री जप्त करण्यात आली आहे.

यावेळी १९ प्लॉटवर ३५ रेतीचे ढीग १३२ हौदांवर कारवाई करत हौद तोडण्यात आले आहेत. सर्व संबंधितांवर एमपीडीएअंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले असून बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस पंचनामे आणि गुन्हे नोंद करण्याचे काम सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version