Home ताज्या घडामोडी माजीमंत्री पिचडांच्या गावात दोन गटांत राडा; पोलिसांवर दगडफेक; दोन पोलीस जखमी

माजीमंत्री पिचडांच्या गावात दोन गटांत राडा; पोलिसांवर दगडफेक; दोन पोलीस जखमी

0

सत्तार शेख : प्रहार वेब टीम

अहमदनगर : माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या राजुर गावात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत फटाके वाजवण्यावरून दोन गटांत राडा झाला. यावेळी दोन्ही गटांकडून झालेल्या तुफान दगडफेकीत पोलीस कॉ. दिलीप ढगळे व पोलीस नाईक मुंडे हे दोन पोलीस जखमी झाले. त्यांच्यावर राजुर ग्रामीण रूग्णालयात उपचार करण्यात आले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. या राड्याप्रकरणी ६० जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी सात जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळत आहे.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत रात्री साडेअकराच्या सुमारास अकोले तालुक्यातील राजूरमधील गुरुदत्त मित्र मंडळ आणि छत्रपती तरुण मित्र मंडळ या दोन मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये फटाके वाजविण्यावरून प्रथम वाद झाला. या वादाचे रूपांतर बाचाबाचीत झाले. त्यानंतर प्रकरण वाढल्याने दोन गटांत तुंबळ मारामारी सुरू झाली.

दरम्यान हा वाद मिटवण्यासाठी काही नागरिकांनी व पोलिसांनी हस्तक्षेप केला. तेव्हा त्यांच्यावरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार करून जमावाला पांगविले. घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी भागवत डोईफोडे, डीवायएसपी अशोक थोरात, अकोलेचे तहसिलदार मुकेश कांबळे, पीआय प्रमोद वाघ यांनी १०० पेक्षा जास्त पोलिस बळासह राजुरला तात्काळ धाव घेतली होती. त्यानंतर प्रशासनाकडून मध्यरात्री दीड वाजता गणेश विसर्जन करण्यात आले. मध्यरात्री राजुर पोलिसांनी ६० जणांविरोधात गुन्हे दाखल करत अटक सत्र सुरू केले आहे.

राजुर मधील घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी मिरवणुकीच्या व्हिडीओ चित्रीकरणाची मदत घेतली जात असल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते. या घटनेचा पुढील तपास पीएसआय नितीन बेंद्रे हे करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version