Home टॉप स्टोरी बाबाचा बलात्कार कोड होता ‘पिताजी की माफी’

बाबाचा बलात्कार कोड होता ‘पिताजी की माफी’

0

चंदिगड- डेरा सच्चा सौदा पंथाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याच्यावर बलात्काराचा आरोप निश्चित झाल्यानंतर आता त्याची अनेक काळी कृत्य उघडकीस येत आहेत. ‘पिताजी की माफी’ हा बाबाचा बलात्कारासाठीचा कोडवर्ड होता, अशी माहिती समोर आली आहे.

बाबा ज्या आश्रमात राहायचा त्याला गुफा म्हटले जात असे. त्याची ही काळी कृत्य या गुफेत चालायची. त्याच्या दिमतीला केवळ महिला अनुयायीच असायच्या. जिच्यावर बाबाची नजर पडायची तिला ‘माफी’ मिळवण्यासाठी गुहेत जावं लागत असे. ज्या दोन पीडित महिलांनी रामरहीम याच्याविरोधात जबाब नोंदवला त्यांनी बाबाच्या काळ्या कृत्यांचे बिंग फोडले.

विशेष सीबीआय न्यायालयात न्यायाधीशांसमोर या महिलांनी पूर्ण घटनाक्रम सांगितला. स्वत:ला ‘देव’ म्हणवणारा हा ‘शक्तीशाली बाबा’ या दोघींवर आणि अन्य महिलांवर आपल्या गुहेत बलात्कार करत असे. आश्रमातला बाबाचा निवास ज्या ठिकाणी असे त्याला ‘गुफा’ म्हटले जाई. बाबाचे चेले बलात्कारासाठी ‘माफी’ हा शब्द वापरायचे. जिथे बाबा राहायचा तिथे केवळ महिला अनुयायी तैनात असायच्या.

यमुनानगरमध्ये राहणा-या एका पीडितेने २८ फेब्रुवारी २००९ मध्ये आपली जबाब नोंदवला. तिच्या भावामुळे तिला जुलै १९९९ मध्ये डे-यात राहायला यावे लागले. नंतर आपल्या बहिणीसाठी न्याय मागण्याच्या संघर्षात त्याचीही हत्या करण्यात आली.

बाबा राम रहीम बलात्कारप्रकरणी १५ वर्षानंतर दोषी

‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग याला बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले असून अटक करण्यात आली आहे. पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने हा निर्णय दिला. न्यायाधीश जगदीप सिंह यांच्या न्यायालयात बाबा राम रहीम याच्यावरील आरोप सिद्ध करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

गुरुमीत राम रहीम याच्यावर बलात्कार, खुन व खुनाच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्याने आपल्या ४०० पुरुष अनुयायांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे. आश्रमातील साध्वीसंदर्भात अनुयायांना लैंगिक आकर्षण वाटू नये, यासाठी तसे केले होते, असे सांगण्यात येते. पंजाब व हरयाणा या दोन्ही राज्यांत डेरा सच्चा सौदाचे लाखो अनुयायी आहेत.

वादग्रस्त आणि बहुरंगी राम रहीम सिंग

लाखो अनुयायी ज्यांना देवाचा अवतार मानतात ते डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग हे वादग्रस्त आणि तितकेच बहुरंगी व्यक्तिमत्त्व आहे. चंडीगडपासून २६० किलोमीटरवर असलेल्या सिरसा या ठिकाणी या पंथाचे मुख्यालय असून, त्यांचे अनुयायी प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, राजस्थानमध्ये आहेत.

राम रहीम हे एक हजार एकरच्या मुख्यालयात चमचमत्या वेशभूषेत येऊन सत्संग भरवतात. एखाद्या गावासारखा त्यांचा डेरा असून त्यात शाळा, कॉलेज, चित्रपटगृह अशा सर्व सुविधा आहेत. चित्रपटगीतेही ते सादर करतात. ‘हायवे लव चार्जर’, ‘नेटवर्क तेरे लव दा’, थँक्यू फॉर दॅट’, ‘इन्सान – वन हू लिव्हज फॉर आदर्स’, ‘अॅटम बॉम्ब’, ‘क्या खूब’, ‘चार्ज मी’ अशी शीर्षके असलेले त्यांचे अल्बम हजारोंच्या संख्येने विकले जातात.

राजस्थानातील गंगानगर जिल्ह्यात श्री गुरूसर मोदिया गावात गुरुमीत याचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची आवड होती. सातव्या वर्षी त्यांना तेव्हाचे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख शाह सतनामसिंग यांनी हेरले आणि रामरहीम असे त्यांचे नामकरण केले.

गुरमित रामरहीम

एप्रिल २००२ – पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाला एक निनावी पत्र आले. त्यामध्ये सिरसा येथील ‘डेरा सच्चा सौदा’ मठामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची महिलेकडून तक्रार.

मे २००२ – पत्राच्या अनुषंगाने तपास करण्याचे हायकोर्टाचे सिरसा जिल्हा आणि सत्र न्यायालयाला आदेश.

सप्टेंबर २००२ – जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित.

डिसेंबर २००२ – सिरसा येथील ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख असलेल्या गुरुमित रामरहीम याच्याविरुद्ध सीबीआयने बलात्काराचा गुन्हा नोंदविला.

जुलै २००७ – गुरुमित रामरहीम विरुद्ध अंबाला येथील कोर्टात आरोपपत्र दाखल. दोन साध्वींचे १९९९ आणि २००१मध्ये लैंगिक शोषण करून अत्याचार केल्याचा त्यामध्ये उल्लेख.

सप्टेंबर २००८ – गुरुमित विरुद्ध विशेष सीबीआय न्यायालयाकडून आरोप निश्चित. रामरहीमवर बलात्कार (३७६) आणि धमकाविणे (५०६) ही कलमे लावण्यात आली.

२००९-२०१० – दोन्ही तक्रारदार महिलांनी कोर्टासमोर आपले म्हणणे मांडले.

एप्रिल २०११ – अंबाला येथून पंचकुला येथे विशेष सीबीआय न्यायालय हलविण्यात आले. गुरुमितची केसही पंचकुला येथे हलविण्यात आली.

जुलै २०१७ – विशेष सीबीआय कोर्टाने रोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

१७ ऑगस्ट २०१७ – आरोपी आणि बचावपक्षांनी आपापली बाजू मांडली. विशेष सीबीआय न्यायाधीश जगदीप सिंग यांनी २५ ऑगस्ट रोजी खटल्याचा निकाल जाहीर करणार असल्याचे जाहीर केले. गुरुमितला स्वतःला उपस्थित राहण्याचे आदेश.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version