Home टॉप स्टोरी मायावती यांचा राजीनाम्याचा इशारा

मायावती यांचा राजीनाम्याचा इशारा

0

नवी दिल्ली- बसपाच्या अध्यक्षा मायावती यांना राज्यसभेत बोलू न दिल्यामुळे मी खासदारकीचा राजीनामा देईन, अशी धमकी मायावती यांनी दिली आहे.

बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी राज्यसभेत सहारनपूरचा मुद्दा उपस्थित केला. मात्र त्यांना बोलण्यापासून रोखल्यामुळे आक्रमक भूमिका घेत त्यांनी राजीनामा देत असल्याची धमकी दिली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी शेतकरी आंदोलन, कथित गोरक्षकांचा हिंसाचार, अशांत जम्मू-काश्मीर, चीनची घुसखोरी आदींसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून सरकारला घेरले.

यावेळी मायावती यांनी सहारनपूरचा मुद्दा राज्यसभेत मांडला. सहारनपूरमधील दलित हत्याकांडामागे भाजपाचा हात असून हा भाजपाचाच कट आहे. भाजपाने या सर्व प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मायावती यांनी राज्यसभेत केला.

यावेळी सभापतींनी मायावती यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तसेच मायावती यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाकडून होत होती. त्यामुळे मायावती फारच आक्रमक झाल्या.

‘मी ज्या समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहे, त्या समाजाचे प्रश्न मी राज्यसभेत मांडू शकणार नसेल तर मला राज्यसभेत राहण्याचा अधिकार नाही. मी खासदारकीचा राजीनामा देते, असा इशारा त्यांनी दिला. मात्र भाजपाने माफीची मागणी लावून धरल्याने मायावती सभागृहाच्या बाहेर निघून गेल्या.

त्यानंतर काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी दलितांवरील अत्याचार, गोरक्षकांकडून हिंसाचार आणि शेतकरी समस्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. सरकारला जर याच घटनांसाठी बहुमत दिले असेल तर आम्ही या सरकारसोबत नाही, असे आझाद म्हणाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version