Home देश हनीप्रीत दिल्लीतच, अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज

हनीप्रीत दिल्लीतच, अटकपूर्व जामिनासाठी केला अर्ज

0

राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

नवी दिल्ली- साध्वी बलात्कार प्रकरणी २० वर्षाचा तुरुंगवास भोगत असलेल्या बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीतने दिल्ली उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. तिने हनीप्रीत तनेजा या नावाने अर्ज केला आहे.

हनीप्रीतच्या याचिकेवर आज सुनावणी करणार आहे. हनीप्रीत मागील एक महिन्यापासून फरार आहे. हरियाणा पोलिसांनी तिच्या शोधासाठी अनेक ठिकाणी छापेमारी केली. परंतु अद्यापही पोलिसांना तिचा सुगावा लागला नाही.

हनीप्रीत हिला पकडण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले. रेड अॅलर्ट जारी केला, तिला फरार घोषित करण्यासाठी तयारीही सुरू केली. इतकेच नव्हे तर तिला पकडण्यासाठी नेपाळपर्यंत पोलीस जाऊन आले. परंतू हनीप्रीत मात्र दिल्लीतच बुरखा धारण करून फिरत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एका सीसीटीव्ही फुटेजमधून ही माहिती मिळाल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. हरयाणा पोलिसांनी तिच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र हनीप्रीतने भूमिगत राहूनच आता अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे.

मीडियामध्ये माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात आहेत. त्यामुळे कोर्टाचे दरवाजे ठोठावण्यावाचून माझ्याजवळ कोणताही पर्याय नाही. माझ्या जीवाला धोका आहे. मी बालपणापासूनच डे-याशी जोडली गेले आहे. राम रहीमची मुलगी असणे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हरियाणा पोलिसांनी माझे नाव वॉण्टेड लिस्टमध्ये टाकले आहे, असे हनीप्रीतने तिच्या अटकपूर्व जामीन अर्जात म्हटले आहे. माझ्याविरोधात कोणतीही केस नाही. जबरदस्ती मला गुन्ह्यात गोवले जात आहे, असा दावाही तिने केला आहे.

तसेच मी एकटी आहे आणि मला गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मला तपासात सहभागी व्हायचे आहे. मी कोर्टाच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाणार नाही. मला तीन आठवड्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी कोर्टाकडे विनंती करते, असे हनीप्रीतने अर्जात म्हटले आहे.

हनीप्रीत दिल्लीच्या ग्रेटर कैलाश पार्ट-२ मधील एका घरात लपून बसल्याची टीप हरयाणा पोलिसांना लागली होती. त्यामुळे पोलिसांनी या घरात छापा मारला पण हनीप्रीत आढळून आली नाही. दरम्यान, हनीप्रीत दिल्लीतच आहे आणि सोमवारी ती आपल्याला लाजपत नगर येथील कार्यालयात भेटायला आली होती, असा दावा तिचे वकील प्रदीप आर्य यांनी केला. काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर तिने सह्या केल्या, असेही त्यांनी सांगितले. पण ती दिल्लीत कुठे आहे?, हे माहीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आर्य यांना ती दोन तास भेटल्याचेही सांगण्यात येते. दरम्यान, दिल्लीच्या ग्रेटर कैलाशमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असून त्यात हनीप्रीत काळ्या रंगाचे कपडे घालून आणि चेह-याला स्कार्फ बांधून या वकिलाच्या कार्यालयात जाताना दिसत आहे.

दरम्यान, राम रहीमच्या वकिलाने उच्च न्यायालयात सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. सीबीआय कोर्टाने राम रहीमला दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवून २० वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

हनीप्रीत ही आपली मानलेली मुलगी असल्याचे बाबा राम रहीम सर्वांना सांगायचा. मात्र हनीप्रीतचे बाबा राम रहीमशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप तिच्या घटस्फोटित नव-याने केला होता. वकिलांमार्फत हनीप्रीतने अनैतिक संबंधांचे आरोप फेटाळून लावले. माझ्यावरील आरोप चुकीचे आहेत. बापलेकीच्या नात्याला चुकीच्या पद्धतीने जगासमोर आणण्यात आले आहे, असा दावा तिने केला आहे.

[EPSB]

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version