Home टॉप स्टोरी गुजरातमध्ये भाजपविरुद्ध कॉँग्रेसची महाआघाडी

गुजरातमध्ये भाजपविरुद्ध कॉँग्रेसची महाआघाडी

0

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे असून, काँग्रेसने सत्ताधा-यांविरोधात बिहारच्या धर्तीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नवी दिल्ली- गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे असून, काँग्रेसने सत्ताधा-यांविरोधात बिहारच्या धर्तीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल, संयुक्त जनता दलाचे बंडखोर आमदार छोटू वासवा, दलित समाजाचे नेते जिग्नेश मेवानी यांना आघाडीत सामील करून घेण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात होणारी निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे, तर सरकारविरोधी लाटेचा फायदा घेऊन भाजपचा पराभव करण्याचे मनसुबे काँग्रेसने रचले आहेत. बिहारच्या धर्तीवर गुजरातमध्येही भाजपविरोधात महाआघाडी स्थापन करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. काँग्रेसने संयुक्त जनता दलाचे बंडखोर  आमदार छोटू वासवा यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. राज्यसभा निवडणुकीत छोटू वासवा यांनी भाजपऐवजी काँग्रेसचे अहमद पटेल यांना मतदान केले होते.

वासवा हे जदयूचा गुजरातमधील चेहरा असून, आदिवासी समाजाचे नेते म्हणून ते ओळखले जातात. वासवा हे शरद यादव गटातील असून, लवकरच ते महाआघाडीबाबत काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतील असे समजते. संयुक्त जनता दलाच्या आमदारांसह पाटीदार समाजाचे नेतृत्त्व करणा-या हार्दिक पटेल यांचाही महाआघाडीत समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय दलित चळवळीतील नेते जिग्नेश मेवानी, ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकूर यांचीदेखील काँग्रेससोबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गुजरातमध्येही महाआघाडी झाल्यास भाजपसाठी ही निवडणूक सोपी नसेल असे जाणकारांचे मत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुजरात दौरे वाढले असून, राहुल गांधीही गुजरातकडे लक्ष देत आहेत. दिवाळीनंतर राहुल गांधी यांच्या गुजरात दौ-यातील तिस-या टप्प्याला सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींच्या सभांना गुजरातमध्ये अनपेक्षित प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावला आहे.

[EPSB]

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version