Home क्रीडा बोकडासाठी प्रभादेवीत घुमणार कबड्डी!

बोकडासाठी प्रभादेवीत घुमणार कबड्डी!

0

प्रभादेवीच्या आगरी सेवा संघाने आपल्या आगळ्यावेगळ्या बक्षीसांच्या कबड्डी स्पर्धेत यंदाही विजेत्या संघाला माजलेला बोकड ठेवला आहे. 

मुंबई- का रं बाल्या, बोकर जितायचाय? कब्बरी खेलावी लागल. कब्बरी जितलास तर बोकराबरबर जितारा पन मिलल आन हरलास तर गावती कोंब-या मिलतील. प्रभादेवीच्या आगरी सेवा संघाने आपल्या आगळ्यावेगळ्या बक्षीसांच्या कबड्डी स्पर्धेत यंदाही विजेत्या संघाला माजलेला बोकड ठेवला आहे. त्यामुळे येत्या १८ ते २२ डिसेंबरदरम्यान प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी क्रीडानगरीत बोकडासाठी द्वितीय श्रेणीतील तगडे २० संघ एकमेकांशी झुंजतील.

थर्टी फर्स्टचा बेत जोरदार करण्यासाठी सर्वच संघ जोरदार तयारी करीत आहेत. कुणाला मटण बिर्याणीचा फडशा पाडायचाय तर काहींना शिग कबाबची चव चाखायचीय… काहींना कोंबडी वड्यावर तुटून पडायचेय… पार्टीचा मूड डोळ्यापुढे ठेऊनच सर्व संघ आगरी सेवा संघांच्या कबड्डीसाठी सज्ज होत आहेत. जर तुम्हाला कबड्डीची आगळी झुंज पाहायची असेल तर प्रभादेवी गाठावीच लागेल. या स्पर्धेत आयोजकांनी विजेत्यांसाठी २५ किलोचा बोकड आणला आहे.

या स्पर्धेचं खास पुरस्कार म्हणजे एक भलं मोठं जिताडही (रायगडचा फेमस मासा) विजेत्या संघाला दिलं जाणार आहे. उपविजेत्या संघाला १० गावठी कोंबड्याचा झक्कास नजराणा दिला जाणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे यांनी दिली.

गेली ८० वर्षे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आगरी सेवा संघाने यावर्षीही कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेच्या पुरस्कारांचे आपले नावीन्य यंदाही त्यांनी कायम राखले आहे. त्यांनी विजेत्या आणि उपविजेत्यांना रोख रकमांच्या पुरस्कारासह बोकड आणि कोंबड्या जाहीर केल्या आहेतच. सोबत दिवसाचा मानकरी ठरणारा खेळाडू दरदिवशी गावठी कोंबड्याचा मान मिळवेल. असाच पुरस्कार सर्वोत्तम पकड, चढाई आणि खेळाडूला दिला जाईल. तसेच प्रत्येक सामन्याला प्रत्येक खेळाडूला खाण्यासाठी उकडलेली अंडी दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी द्वितीय श्रेणीतील संघांमध्ये प्रचंड चढाओढ पाहायला मिळाली.

या स्पर्धेत गतउपविजेत्या संस्कृती क्रीडा मंडळासह प्रॉमिस, एकविरा, गणेशकृपा, जागृती, ओम साईनाथ, विहंग, विकास अशी तुल्यबळ संघ जेतेपदाच्या बोकडासाठी आपले कौशल्य पणाला लावतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version