Home महाराष्ट्र मद्यपि वाहनचालकांकडून रायगडात २५ लाखांचा दंड वसूल

मद्यपि वाहनचालकांकडून रायगडात २५ लाखांचा दंड वसूल

0

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात मद्यपान करून वाहन चालवणा-यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

अलिबाग- रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात मद्यपान करून वाहन चालवणा-यांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस शाखेमार्फत जानेवारी ते सप्टेंबर २०१७ या नऊ महिन्यांत मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या १६९१ चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २५ लाख, ३२ हजार, ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालविणा-या विरोधात रायगड जिल्हा पोलीस वाहतूक शाखेमार्फत कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. जिल्ह्यात वाहतूक पोलिसांनी ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह केसेसमध्ये केलेल्या कारवाईत जानेवारी ते जुलै या महिन्यात १८ लाख, ६९ हजार, ५०० रुपये, ऑगस्ट महिन्यात २ लाख, ७० हजार, ५०० रुपये तसेच माहे सप्टेंबरमध्ये ३ लाख, ९२ हजार, ५०० रुपये असा एकूण २५ लाख, ३२ हजार, ५०० रुपये दंड मद्यप्राशन करून वाहन चालवणा-या चालकांकडून वसूल करण्यात आला आहे.
वाहतूक पोलीस रात्री मद्यपि वाहन चालकांवर कारवाई करतात.

जल्ह्यात साधारण रोज १० ते १२ जणांवर कारवाई करण्यात येते. मद्य पिऊन वाहन चालवत येणा-या चालकाला तपासणीसाठी थांबविले जाते. मद्यप्राशन केले असल्याने मद्यपिचालकाला पोलीस ठाण्यात आणून त्याची ब्रेथ अल्कोहोल अ‍ॅनेलेसरने तपासणी केली जाते. या तपासणीत ३० पेक्षा जास्त अल्कोहोलचे प्रमाण आले तर मद्यपिवर कारवाई केली जाते. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय त्यांना दंड भरून न्यायालय सोडून देते. न्यायालयाने मद्यपि आरोपींना जास्तीत जास्त दंड आकरणी केल्यास शासनालाच त्याचा फायदा मिळणार आहे. त्याचबरोबर मद्य पिऊन वाहन चालविण्याचे प्रमाणही कमी होईल, असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे म्हणाले.
वाहनचालकांवर नजर चायनीजवाल्यांवर मेहेरनजर

एकीकडे मद्यपि चालकावर पोलिसांची करडी नजर असते. परंतु राजरोसपणे अवैधपणे मद्यविक्री करणा-या चायनीजवाल्यांवर मात्र पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची मेहरनजर आहे. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. चायनीजच्या दुकानातून मद्य पिऊन येणा-या मद्यपिचालकाला तपासणीसाठी थांबवून त्याच्यावर कारवाई करतात व न्यायालयामार्फत दंडाचा भरुदडही मद्यपिला सोसावा लागतो. चायनीजच्या व्यवसायाच्या ठिकाणी अवैध मद्य विक्री होते हे पोलिसांना व उत्पादन शुल्क विभागाला माहीत असतानाही त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. तेथे ग्राहकाला मात्र पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version