Home संपादकीय अग्रलेख ज्ञानमंदिरातील छळछावण्या

ज्ञानमंदिरातील छळछावण्या

0

देशाचे भाग्यविधाते म्हणून भावी पिढी घडविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षक ज्ञानदानाचे कार्य मनोभावे करीत असत आणि विद्यार्थीही त्या शिक्षकाप्रति आदर राखून ज्ञानार्जन करीत असत.

ध्येयाला धंद्याची जोड मिळाली की, मिळकतीची आसक्ती वाढते आणि नफेखोरीच्या दिशेने प्रवास सुरू होतो. ध्येय मागे पडते आणि धंदा सुरू होतो. शाळा म्हणजेच पूर्वी ज्ञानमंदिरे होती. देशाचे भाग्यविधाते म्हणून भावी पिढी घडविण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून शिक्षक ज्ञानदानाचे कार्य मनोभावे करीत असत आणि विद्यार्थीही त्या शिक्षकाप्रति आदर राखून ज्ञानार्जन करीत असत. शिक्षक म्हणजे ज्ञानमंदिरातील देव आणि विद्यार्थी म्हणजे भक्त असे नाते असायचे. भक्त कधी देवाची टिंगल करीत नसे आणि देवही त्याच्यावर रुष्ट होत नसे. नकळतपणे भक्त चुकलाच तर देवही त्याला माफ करीत असे. या दोघांमध्ये सेवेकरीही असत. त्यांना दोघांचाही सारखा आदर असे.

शिक्षणही गुरुकुल आणि व्यावसायिक अशा दोन पद्धतीने मिळत असे. गुरुकुल पद्धतीत पालक आपल्या पाल्याला गुरूच्या स्वाधीन करत असत. दिवसाचे चोवीस तास किंवा शिक्षण पूर्ण होईपर्यंत विद्यार्थी गुरूच्या आश्रमी राहत असे. गुरू शिक्षण देईल तसा विद्यार्थी घडत असे. शेवटी गुरूंनी घेतलेल्या परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाला की, त्याला गुरूंचा आश्रम सोडायची परवानगी मिळत असे. या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांने कसे वागावे याचे ज्ञान मिळत असे. मात्र माणसात जसजशी प्रगती झाली तसतसा शिक्षणाचाही दर्जा बदलत चालला. गुरुकुल शिक्षण पद्धती मागे पडली आणि व्यावसायिक शिक्षण पद्धती सुरू झाली. या व्यावसायिक शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञान सुरू झाले. बिनभिंतीच्या शांळातून मुलांचा भितींनी कोंडलेल्या अंधा-या शाळेत ज्ञान घेण्याचा प्रवास सुरू झाला. या व्यावसायिक शिक्षणात सचोटी होती. म्हणजे शिक्षणाला लागेल तेवढाच खर्च पालकांकडून घेतला जात असे आणि त्याहून जास्त लागणारा खर्च अनुदान रूपात सरकारकडून घेण्यात येत असे. येथेपर्यंत ठीक होते. पगार मिळत असला तरीही शिक्षक त्या व्यवसायाकडे नोकरी म्हणून पाहत नसे. मिळेल त्या पगारात समाधानी राहून विद्यार्थी घडवण्यात तो मग्न राहत असे. ते त्याचे ध्येय होते. विद्यार्थी उच्च पदावर पोहोचल्याचे त्याला समाधान मिळत असे.

आपल्या शिक्षकी पेशाचे सार्थक झाल्याने तो धन्य होत असे. मात्र जसजसे जागतिक बदलाचे वारे वाहू लागले तसे शिक्षण क्षेत्रही बदलू लागले. शिक्षण क्षेत्र हा धंदा झाला. त्या क्षेत्रातून ध्येयवादी मंडळी बाजूला फेकली गेली आणि राजकारणी मंडळींनी शिरकाव केला. राजकारणाप्रमाणे शिक्षण क्षेत्रालाही धंद्याचे स्वरूप आले. एकेकाच्या अनेक शिक्षणसंस्था निर्माण होऊ लागल्या. बिल्डर ज्याप्रमाणे लोकांचा पैसा घेऊन अनेक इमारती उभारतो, त्याप्रमाणे धंदेवाईक पद्धतीने शिक्षण संस्था चालविणारी मंडळी पालकांच्या पैशातूनच अनेक ठिकाणी शाळा चालवू लागली. शाळेत विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने शिक्षण मिळते हा भाग बाजूला पडला, पण संस्था चालविणारा मात्र ‘शिक्षणसम्राट’ पदवी मिरवू लागला. ‘काय भुललासी वरलिया रंगा’ याप्रमाणे पालकही त्याच्या दिखावूपणाला भुलू लागले.

आपल्या मुलाला आधुनिक पद्धतीचे शिक्षण मिळते म्हणून शाळा मागेल तितकी फी देऊन त्याला ‘मोठ्ठय़ा’ शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी अहमहमिका करू लागले. त्यातूनच बाजारी शिक्षण सुरू झाले. बाजारात कोण कोणाचा नसतो. साराच ‘कोलाहल’ असतो. तसे आता शाळांचे वातावरण झाले आहे. विद्येचे मंदिर समजल्या जाणा-या शाळांतच मुलांवर जीवघेणे प्रकार घडत आहेत. पूर्वी चुकलेल्या विद्यार्थ्यांला ‘छडी लागे छमछम’ची शिक्षा मिळत असे. पण आता शिक्षेचेही अमानुष प्रकार घडत आहेत. गणवेश परिधान न केल्यामुळे विद्यार्थिनीला विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहात उभे करणे, मुलींचे केस कापणे, मुलांचे टक्कल करणे अशा शिक्षा देण्यात येत आहेत. त्यामुळे एक तर मुले खजिल होतात आणि जीवनच संपविण्याचा मार्ग अवलंबतात. शिक्षक किंवा कर्मचारी विद्यार्थिनीवर बलात्कार करतात त्या ठिकाणाला ज्ञानमंदिर कसे म्हणावे? असे प्रकार होत असल्याने शाळांना ज्ञानमंदिर म्हणावे की छळछावणी? आपला पाल्य चांगला उच्चशिक्षित व्हावा म्हणून पालक शाळांना पाहिजे तशा फी भरत आहेत, त्यांच्यावर अफाट खर्च करत आहेत आणि त्या बदल्यात त्याच्या मुलांच्या संरक्षणाचे काय, हा प्रश्न शिल्लकच राहतो. रॉयन इंटरनॅशनल स्कूलमध्ये झालेली प्रद्युम्न ठाकूर या मुलाची निर्घृण हत्या हे त्याचे एक उदाहरण आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची तपासाची चक्रे फिरू लागली आहेत.

प्रद्युम्नच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्कूल बसच्या कंडक्टरला अटक केली आहे. परंतु भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आपल्या देशात पोलिसांची तपास यंत्रणाही निष्पक्ष राहिलेली नाही. त्यामुळेच प्रद्युम्नच्या आई-वडिलांनी पोलिसांच्या तपासावर संशय उपस्थित करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. संतप्त पालकांनीही आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. हे प्रकरण गाजत असतानाच हैदराबादच्या तप्पचाबुतरा येथील एका शाळेत मुख्यध्यापकाने लहान विद्यार्थ्यांला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्हीही घटनांमुळे शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पालकांनीही आता मोठेपणाचा ‘सोस’ सोडून आपल्या परिसरातल्या शाळेतच मुलांना दाखल करणे उत्तम. त्यांना शिक्षित केल्यानंतर ती आपोआपच उच्चशिक्षित होतात. अपेक्षांचे ओझे लादून त्यांना कसायांच्या ताब्यात देऊ नये.

[EPSB]

गुरुग्रामच्या रायन इंटरनॅशनल शाळेतल्या प्रद्युम्न ठाकूर या ७ वर्षीय मुलाच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह हरयाणा सरकार, सीबीआय आणि सीबीएसईला नोटीस जारी केली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version