Home महामुंबई शिवसेनेच्या ‘डिड यू नो?’ला राष्ट्रवादीचे ‘यू शूड नो’ने प्रतिउत्तर

शिवसेनेच्या ‘डिड यू नो?’ला राष्ट्रवादीचे ‘यू शूड नो’ने प्रतिउत्तर

0

मुंबईकरांची सध्याची स्थिती हे सत्ताधा-यांचे अपयश आहे. त्याकरता मुंबईत विकासात्मक बदलाची गरज निर्माण झाली आहे. 

मुंबई- मुंबईकरांची सध्याची स्थिती हे सत्ताधा-यांचे अपयश आहे. त्याकरता मुंबईत विकासात्मक बदलाची गरज निर्माण झाली आहे. हा विकास फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच करू शकते, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केली. शिवसेनेच्या ‘डिड यू नो?’ या टॅगलाईनला आमचे ‘‘यू शूड नो’ हे उत्तर असेल, असेही त्या म्हणाल्या.

ठाण्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. मुंबईतही आघाडी व्हावी, अशी आमची भूमिका आहे. गोव्यातही आघाडीसाठी प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केले जात असून; समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढवण्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा कल असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराला सुरुवात करताना परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या सभागृहात महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.

आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपावर निशाणा साधला. निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, त्यांना पारदर्शक कारभार हवा. शहरात हजारो कोटींच्या रस्ते घोटाळ्यामागे मुंबई महापालिकेतील माफियाराज असल्याचा आरोप भाजपाचे मुंबई अध्यक्ष शिवसेनेवर करतात. पण राज्याची सत्ता गेली अडीच वर्षे तुमच्याकडे असताना या आरोपांची चौकशी का नाही केली? असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुरता समाचार घेतला.

आपल्या कामाचा प्रचार करताना शिवसेना म्हणते, ‘डिड यू नो’, पण प्रत्यक्षात शहरात काय स्थिती आहे, हे सांगण्यासाठी आम्ही ‘यू शूड नो’ ही मोहीम आखली आहे. कारण मार्केटिंग आणि प्रत्यक्षात खूपच फरक आहे. तो मतदारांसमोर आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचाराची सर्व माध्यमे वापरणार आहे. सध्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात हजारो कोटींच्या प्रकल्पांचे स्वप्न मुंबईकरांना दाखवले जात आहे; पण त्या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी सरकारकडे पैसा कुठे आहे? आम्हीही नुसत्या प्रकल्पांच्या घोषणा करून फलक लावले असते; पण आम्ही जनतेशी खोटे बोलत नाही.

रस्ते घोटाळा, टॅब घोटाळा, कचरा घोटाळा, हे आता खूप झाले असून आता मुंबईत परिवर्तनाची खरी गरज आहे. मुंबईत आजही पाण्याचा प्रश्न खूपच गंभीर असून कच-याच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी सरकार मात्र बुलेट ट्रेनचे स्वप्न मुंबईकरांना दाखवत आहे.

मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही तर लोकलच्या उत्तम सेवेची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भाजपा हा त्यांच्या मित्रपक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करतो; मात्र दुसरीकडे त्यांच्याबरोबर सत्तेत राहून परत पारदर्शकतेचीही भाषा करतो. राज्यात गुन्हेगारी शून्य व्हावी, असे मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणतात. दुसरीकडे भाजपात गुंडांना वाजतगाजत प्रवेश दिला जातो. हेच भाजपाचे ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहे का? असेही त्या म्हणाल्या.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version