Home राजकीय भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय; धनंजय मुंडेंच्या मध्यस्थीने आष्टीच्या सतिश शिंदेंचे उपोषण...

भाजपच्या लोकप्रतिनिधींकडून स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय; धनंजय मुंडेंच्या मध्यस्थीने आष्टीच्या सतिश शिंदेंचे उपोषण मागे

0

बीड : आष्टी येथील भाजपाचे प्रमुख पदाधिकारी सतिश शिंदे यांचे उपोषण अखेर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. सत्तेच्या बळावर सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधीच स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करत असल्याचे अजब चित्र बीड जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे. या अन्यायाविरूध्द आपण संघर्ष करू असे आश्वासन मुंडे यांनी यावेळी दिले.

आष्टी येथील सतिश शिंदे हे चालवित असलेली तालीम मागील आठवड्यात तेथीलच सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने जमिनदोस्त केली. इतकेच नव्हे तर शिंदे यांना बंदुकीचा धाक दाखवुन जिवे मारण्याचा प्रयत्न ही करण्यात आला. या अन्यायाविरूध्द दाद मागणार्‍या शिंदे यांची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नव्हती. या अन्यायाविरोधात शिंदे यांनी आष्टी येथे उपोषण सुरू केले होते. मात्र ते उपोषणही पोलिसांनी लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली दडपुन टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच्या निषेधार्थ मागील तीन दिवसांपासुन शिंदे यांनी जिल्हा रूग्णालयातच आपले उपोषण सुरू केले होते.

बुधवारी रात्री धनंजय मुंडे यांनी शिंदे यांची रूग्णालयात भेट घेतली. तुमच्यावर झालेल्या अन्यायप्रकरणी आपण स्वतः दाद मागु, संघर्ष करू असे आश्वासन देऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. आपल्याच पक्षातील लोकप्रतिनिधींकडुन झालेल्या अन्यायामुळे व्यथित झालेल्या शिंदे यांना धनंजय मुंडे यांच्या या भेटीमुळे दिलासा आणि आधार मिळाला व त्यांनी हे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

याच साठी भाजपात आलो का? – सतीश शिंदे

स्व. खा. गोपीनाथराव मुंडे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मी भाजपात आलो. मात्र काल भाजपात आलेले लोक आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्रास देत असतील तर याचसाठी आम्ही भाजपात आलो का? अशा भावना व्यक्त करताना सतिश शिंदे यांच्या डोळ्यात पाणी आले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version