Home महामुंबई ठाणे रायगडात डेंग्यूचा ताप वाढला!

रायगडात डेंग्यूचा ताप वाढला!

0

रायगड जिल्ह्यात सध्या तापाची साथ आहे. जिल्ह्यात असलेली ही साथ डेंग्यूची नसली तरी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळत आहेत.

अलिबाग- रायगड जिल्ह्यात सध्या तापाची साथ आहे. जिल्ह्यात असलेली ही साथ डेंग्यूची नसली तरी डेंग्यू तापाचे रुग्ण आढळत आहेत. अलिबाग तालुक्यातील हाशिवरे गावात एकाला डेंग्यूची लागण झाली आहे. या रुग्णावर आलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात डेंग्यूचे १८ रुग्ण आढळले आहेत. ही शासकीय रुग्णालयातील आकडेवारी आहे. शिवाय खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात डेंग्यूचे १८ रुग्ण आढळून आले आहेत. यात तळा येथील ७, महाड येथील ६, अलिबाग येथील २, खोपोली येथील १, रोहा येथील १ तर माणगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

अलिबाग तालुक्यातील हाशिवरे परिसरात डेंग्यू सदृश्य साथ असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. या ठिकाणी डेंग्यूची लक्षणे असणारे ५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यातील एकाला डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू विषाणूंमुळे होतो. एडिस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित होतो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे.

संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर पाच ते सहा दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. हा रोग दोन प्रकारे होतो. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्व्रात्मक ताप (डीएचएफ). डेंग्यू रक्तस्रवात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार आहे. त्यामुळे या आजाराला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

डेंग्यूची लक्षणे

लहान मुलांमध्ये मुख्यत: सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठय़ा माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप सोबत डोके, डोळे दुखणे, अंगदुखी,अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो. अंगदुखी तीव्र स्वरूपात असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात. एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना जी डोळ्यांच्या हालचालीसोबत अधिक होते. स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना, चव आणि भूक नष्ट होणे, छाती आणि वरील अवयवांवर गोवरासारखा पुरळ येणे. मळमळणे आणि उलटय़ा, त्वचेवर व्रण उठणे अशी लक्षणे आहेत.

मलेरियाच्या रुग्णसंखेत मोठी घट

आरोग्य विभागाकडून सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नामुळे रायगड जिल्ह्यात मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या वर्षी मलेरियाचे २९२ रुग्ण आढळून आले होते. जिल्ह्यात मागील आठ महिन्यांत मलेरियाचे १३३ रुग्ण आढळून आले आहेत. यात पनवेलमधील ९१ जणांचा समावेश आहे.

हाशिवरे परिसरात आरोग्य विभागाने तपासणी सुरू केली आहे. घराघरात जाऊन तापाची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी केली जात आहे. लोकांनी आठवडय़ातून एक कोरडा दिवस पाळवा.
डॉ. वैशाली पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version