Home देश दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकेवरील तातडीची सुनावणी फेटाळली

दिल्ली उच्च न्यायालयाने याचिकेवरील तातडीची सुनावणी फेटाळली

0

बीएसएफच्या जवानाने आपल्याला निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा व्हीडिओ टाकल्यानंतर देशभरात संताप व्यक्त झाला होता.

नवी दिल्ली- बीएसएफच्या जवानाने आपल्याला निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याचा व्हीडिओ टाकल्यानंतर देशभरात संताप व्यक्त झाला होता. याच मुद्दयावरून पुरणचंद आर्या या माजी केंद्र सरकारी कर्मचा-याने दिल्ली उच्च न्यायालयात तातडीची याचिका दाखल केली होती.

मात्र संबंधित विभागांचे उच्चपदस्थ या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन चौकशी करत असून त्यामुळे यात तातडीने सुनावणी करण्यासारखे काही नसल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. यानंतर आता मंगळवारी या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

बीएसएफचे जवान तेजबहाद्दूर यादव यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर व्हीडिओ टाकत सीमेवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना निकृष्ट प्रतीचे जेवण दिले जात असल्याचा आरोप केला होता. यावरुन मोठा गदारोळ झाल्यानंतर पंतप्रधान कार्यालयानेही या प्रकरणाची दखल घेत गृहविभागाकडून अहवाल मागवला होता. तर लष्करप्रमुखांनी मात्र अशाप्रकारे सार्वजनिकरीत्या तक्रारी करणे योग्य नसल्याचे मत नोंदवत सैनिकांचे कान टोचले होते.

यानंतर पुरणचंद आर्या या माजी केंद्र सरकारी कर्मचा-याने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करत गृह विभागाने या आरोपांवर काय कार्यवाही केली, याची माहिती देण्याची मागणी केली होती. त्याची सुनावणी मुख्य न्यायाधीश जी. रोहीणी यांच्यासमोर होणार होती, मात्र खंडपीठ न बसल्याने ही सुनावणी तातडीची म्हणून दुस-या बेंचकडे देण्यात आली.

मात्र न्यायालयाने या प्रकरणाची उच्च पातळीवर दखल घेण्यात आली असून त्याची चौकशीही सुरू आहे, त्यामुळे तातडीचे असे काहीच नसल्याचे सांगत याचिकाकर्त्यांना मंगळवारची तारीख दिली. त्यामुळे मंगळवारी न्यायालय काय भूमिका घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version