Home देश दिल्लीत १३ कोटींचे घबाड

दिल्लीत १३ कोटींचे घबाड

0

केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बेहिशेबी माया जमवलेल्या अनेकांची मोठी कोंडी झाली आहे. 

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर बेहिशेबी माया जमवलेल्या अनेकांची मोठी कोंडी झाली आहे. अनेकांची घबाडे हळूहळू बाहेर येऊ लागली असून प्राप्तिकर विभागानेही अनेक ठिकाणी धाडी टाकून शेकडो कोटी रुपयांची माया सरकारच्या तिजोरीत जमा केली आहे. यानंतर आता राजधानी दिल्लीत एका लॉ फर्ममध्ये १३.५० कोटी रुपयांचे घबाड सापडले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे यापैकी जवळपास २.६१ कोटी रुपये हे नव्या २ हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहेत, तर ३ कोटी रुपये हे १०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे या नोटा बदलून घेण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दक्षिण दिल्लीतील जीके

१ भागातील ‘टी अ‍ॅण्ड टी’ नामक लॉ फर्मवर नवी दिल्लीच्या स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी रात्री ही धाड टाकली. रोहित टंडन असे या फर्मच्या मालकाचे नाव असून तो वकील आहे. ‘आम्ही पोहोचलो त्यावेळी तेथील सर्व खोल्यांना कुलूप होते आणि देखभाल करणारा एकमेव कर्मचारी उपस्थित होता.

आम्ही कार्यालयाची तपासणी केल्यानंतर एका कपाटात १३.५० कोटी रुपये आढळले’, असे दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त रवींद्र यादव यांनी सांगितले. या रकमेपैकी ७ कोटी रुपये हे जुन्या १ हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होते.

३ कोटी रुपये १०० रुपयांच्या नोटा, २.६१ कोटी रुपये नव्या २ हजार रुपयांच्या नोटा, तर उर्वरित रक्कम ही ५० आणि ५०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रोहित टंडन याने नुकतेच आपल्याकडे १२५ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे जाहीर केले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याच्या इतर मालमत्तांचाही आता शोध सुरू आहे.

ऑफिस नव्हे, कॅश गोडाऊन!

अशा प्रकारची अनेक कार्यालये दिल्ली आणि परिसरात थाटण्यात आली असून त्याचा उपयोग प्रामुख्याने कॅश गोडाऊन म्हणूनच होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. शनिवारच्या कारवाईबाबत आम्ही प्राप्तिकर विभागाला माहिती दिली असून भविष्यात अशाच प्रकारे आणखी काही ठिकाणी धाडी घालण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version