Home टॉप स्टोरी दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच!

दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच!

0

दाऊद हा पाकिस्तानात तळ ठोकून असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुर्शरफ यांनी दिली आहे.

इस्लामाबाद- भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’च्या हिटलिस्टवर असलेला मोस्ट वाँटेड कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी म्हणून ७ नोव्हेंबर २००३ मध्ये त्याच्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यानंतर तो पाकिस्तानमध्येच वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे. आता तर दाऊद हा पाकिस्तानात तळ ठोकून असल्याची अप्रत्यक्ष कबुलीच पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुर्शरफ यांनी दिली आहे. पाकिस्तानमधील एका वाहिनीवर मुलाखतीदरम्यान त्यांनी हे संकेत दिले आहेत.

दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई साखळी बाँबस्फोट हल्ल्यातील प्रमुख आरोपी आहे. १२ मार्च १९९३ रोजी १३ ठीकाणी झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटात २५७ जण ठार तर ७१३ जण जखमी झाले होते. गेल्या २० वर्षांपासून तो बेपत्ता आहे. त्याला पकडण्यासाठी भारताने यापुर्वीच रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे.

दाऊद पाकिस्तानात असल्याचा आरोप भारत नेहमी करत आला आहे. मात्र पाकिस्तानने वारंवार हा आरोप खोडून काढला आहे. असे असताना आता तो जरी पाकिस्तानात असला तरी आम्ही भारताला मदत कशी करू? असे सांगत मुर्शरफ यांनी दाऊद वरील कारवाईवरुन यू-टर्न घेतला आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असला तरी त्याचा शोध घेण्यासाठी पाकिस्तान कधीच भारताला मदत करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. लादेन बाबतही अशाच अफवा पसरविल्या जात होत्या. नंतर मात्र त्या ख-या ठरल्याचा टोला त्यांनी भारताला लगावला आहे.

मुलाखतीत बोलताना परवेझ मुशर्रफ यांनी दाऊद इब्राहिमला पाठिंबा देताना, ‘भारतात मुस्लिमांची हत्या होते, आणि दाऊद त्यावर प्रतिक्रिया देतो’, असेही म्हटले आहे. ‘भारत गेल्या कित्येक वर्षांपासून पाकिस्तानला बदनाम करत आहे. आता आम्ही लगेच चांगले वागून भारताला मदत करण्याचा काय संबंध? दाऊद कुठे आहे मला माहित नाही. तो येथेच कुठेतरी असू शकतो’, असे परवेझ मुशर्रफ म्हणाले.

दरम्यान, भारताने अनेकदा दाऊद पाकिस्तानात वास्तव्य करत असल्याचा पुरावा दिला आहे. मात्र भारताने पुरावे देऊनही पाकिस्तानने वारंवार त्याचा आमच्या देशात ठावठिकाणा नसल्याचा दावा केला आहे. दाऊद कराचीत राहत असल्याचा दावा भारताने केला असून, तसे पुरावेही सादर केले आहेत.

दाऊद नेमका कुठे राहतो?

दाऊदने सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात आश्रय घेतला असून तो चार विविध पत्त्यांवर तेथे राहतो. जानेवारी २७ रोजी लंडनच्या कोषागार विभागाने ही यादी अद्ययावत केली असून त्यात ही माहिती उघड झाली आहे. कराचीतील रहिवाशांचे चार विविध पत्ते देणारा दाऊद नेमका राहतो तरी कुठे? अशी बुचकळ्यात पाडणारी परिस्थिती आहे. लंडनच्या कोषागार विभागाच्या यादीत तो दाऊद इब्राहिम कासकर या नावाने खोली क्रमांक ३७, डिफेन्स रोड, हाऊसिंग अ‍ॅथॉरिटी, कराची, पाकिस्तान. तर दुसरा पत्ता खोली क्रमांक २९, मरगाला रोड, एफ ६-२ स्ट्रीट नंबर २२, कराची, पाकिस्तान. नूरबाद, पाकिस्तान, कराची, (त्याशिवाय पाकिस्तान पलातियाल बंगला, हिल परिसर) आणि व्हाईट हाऊस, सौदी मशिदीजवळ, किल्फटन, कराची, पाकिस्तान. असे गोंधळवून टाकणारे पत्ते त्याने दिले आहेत. तसेच पाकिस्तानमध्ये तो २१ नावांनिशी राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी लंडनमधील महसूल विभागाने दाऊदची आर्थिक नाकेबंदी करताना त्याच्या लंडनमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले होते. लंडनमधील कोषागार विभागानेही दाऊदची आर्थिक नाकेबंदी करत त्याच्या लंडनमधील आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणले आहेत. दाऊदचे भारतीय नागरिकत्व रद्द केल्यानंतर त्याने पाकिस्तान व भारताचे नागरिकत्व असल्याचे अनेक बनावट पासपोर्ट तयार करून मोठय़ा प्रमाणात गैरवापर केल्याचेही यात म्हटले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version