Home ताज्या घडामोडी बिल्डरनेच घात केला, ‘ओसी’ नसताना अंधारात ठेवले

बिल्डरनेच घात केला, ‘ओसी’ नसताना अंधारात ठेवले

0

‘क्रिस्टल’मधील रहिवाशांची ‘घरघर’! ल्लनातेवाईक आणि भाडय़ाच्या निवा-यासाठी वणवण

मुंबई – परळच्या ‘क्रिस्टल’ टॉवरला लागलेल्या आगीत चार जणांना नाहक जीव गमवावा लागल्यानंतर बेघर झालेल्या रहिवाशांची ‘घरघर’ सुरू झाली आहे. या इमारतीला ‘ओसी’ नसल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने वीज-पाणी कापल्यानंतर रहिवासी कुणी नातेवाइकांकडे तर कुणी भाडय़ाच्या निवा-यासाठी वणवण करीत आहेत. बिल्डरने ओसी असल्याचे सांगून आपल्याला फसवल्यामुळेच आपला घात झाल्याचे रहिवासी सांगत आहेत.

क्रिस्टलला आग लागल्यानंतर ही संपूर्ण १७ मजली इमारत रिकामी करण्यात आली आहे. मात्र अचानक घर रिकामे करावे लागल्याने ऐन वेळी राहायला जागा कुठे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. यातच संसाराचे संपूर्ण सामना दुस-या ठिकाणी नेण्याची कसरत करावी लागत आहे. रहिवासी गुरुवारी सकाळपासून आपल्या संसाराचे सामान घेऊन नव्या जागेच्या शोधात निघाले आहेत. इतकी वर्ष वास्तव्य केलेले घर अचानक सोडावे लागल्याचे दु:ख राहिवास्यांकडून व्यक्त होत होते.

अशी झाली फसवणूक
क्रिस्टल टॉवरमध्ये एकूण ४८ कुटुंबे राहत होती. २००५ मध्ये पुनर्विकास सुरू झाल्यानंतर २०१५ मध्ये रहिवासी या ठिकाणी राहायला आले. यावेळी बिल्डरने राहिवास्यांना इमारतीला ओसी असल्याचे सांगत इतर अनिवार्य बाबींची पूर्तता केली असल्याचे सांगितले. त्यामुळेच आपण या ठिकाणी राहायला आल्याचे रहिवासी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्दे यांनी सांगितले.

रहिवाशीच करणार सफाई
इमारतीला आग लागल्यानंतर संपूर्ण इमारतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र याठिकाणी अद्याप पालिका किंवा बिल्डरकडून कोणत्याही प्रकारची स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण इमारतीची स्वच्छता प्रतिकुटुंब १० हजार रुपये काढून करण्याचा निर्णय रहिवाशांच्या बैठकीत घेण्यात आल्याचे रहिवासी अनिल काळे यांनी सांगितले.

निकृष्ट दर्जाच्या वायरिंगमुळे आग ?
क्रिस्टल टॉवरमध्ये इलेक्ट्रिक वायरिंगसाठी वापरण्यात आलेल्या वायरचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय प्रत्येक इमारतीत असणारे दोन एसी, गिझर, कॉम्प्युटर अशा अनेक वस्तूंमुळेच लोड वाढल्याने शॉर्टसक्रीट झाले असावे असेही बोलले जात आहे.

चौदाव्या मजल्यावर आमचा फ्लॅट आहे. मात्र आता घर रिकामे करावे लागणार असल्यामुळे सांताक्रूझ येथे नातेवाइकांकडे तात्पुरते राहण्यास जात आहे. या ठिकाणची सर्व व्यवस्था कधीपर्यंत होईल याबाबत कुणीच काही सांगत नाही. त्यामुळे सगळं पुन्हा ठीक होईपर्यंत राहण्यासाठी शोधाशोधच करावी लागणार आहे.
– अनिरुद्ध जैन, रहिवासी

आम्ही या ठिकाणचे १९४२ पासूनचे रहिवासी आहोत. पुनर्विकासानंतर आम्ही याच ठिकाणी राहत आहोत. त्यामुळे ही जागा सोडणे शक्यच नाही. मात्र आता घडलेल्या घटनेमुळे सांताक्रूझ येथे नातेवाइकांकडे तात्पुरते राहण्यासाठी जात आहोत.
– लायनर डिसोजा, रहिवासी

काही झाले तरी इथेच राहणार
स्वत:च्या मेहनतीने घेतलेले हे घर आहे. शिवाय या वयात दुसरे घर घेण्याची आपली आता ऐपतही नाही. त्यामुळे दुसरीकडे जागा शोधण्याचा प्रश्नच नाही. काही झाले तरी इथेच राहणार.
– राजिंदर कपूर (७३), रहिवासी

बिल्डर अब्दुल सुपारीवालाला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई – परळ येथील हिंदमाता परिसरातील क्रिस्टल टॉवर या इमारतीमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी अटक झालेला बिल्डर अब्दुल रझाक ईस्माइल सुपारीवाला याला गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुपारीवालाला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. क्रिस्टल टॉवर या इमारतीच्या १२व्या मजल्यावर बुधवारी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात इमारतीच्या प्रत्येक मजल्यावरील वीजपुरवठा करणा-या केबलचे डक्ट बंदिस्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे आग पसरत गेल्याचे समोर आले. तसेच या इमारतीला निवासी दाखला मिळालेला नसतानाही रहिवासी वास्तव्य करत होते. त्यामुळे विकासक, वास्तुविशारद आणि रहिवाशांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. अग्निशमन दलातर्फे तक्रार दाखल होताच पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी अब्दुल रझाक सुपारीवालाला अटक केली होती. गुरुवारी दुपारी सुपारीवालाला भोईवाडा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अब्दुलला २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version