Home टॉप स्टोरी नागपूरात १२ तासात ४ खून

नागपूरात १२ तासात ४ खून

0
संग्रहीत छायाचित्र

राज्यात गुन्हेगारी घटली असून सजा होण्याचे प्रमाण वाढलेले आहे, अशा थापा मुख्यमंत्री विधानमंडळात मारत असतानाच अवघ्या बारा तासात नागपूरात ४ खून पाडण्यात आले.

संग्रहीत छायाचित्र

नागपूर- राज्यात गुन्हेगारी घटली असून सजा होण्याचे प्रमाण वाढलेले आहे, अशा थापा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानमंडळात मारत असतानाच अवघ्या बारा तासात नागपूरात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या गावात ४ खून पाडण्यात आले, त्यामुळे गुन्हे कमी झाले आहेत ही मुख्यमंत्र्यांची थापेबाजी उघडी पडली असून, मुख्यमंत्री, त्यांचे गृहखाते आणि सरकार तोंडावर चांगलेच आपटले आहे.

‘गुन्हे कमी झालेत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात सांगत असताना नागपुरात लोकांचे खून पडत होते. हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने तमाम सरकार आणि पोलीस बळ नागपुरात मुक्कामाला असताना गुंड बिनधास्त रक्ताची होळी खेळत होते. शुक्रवारी २४ तासात उपराजधानीत ४ खून झाल्याने नागपूर हे क्राइम कॅपिटल असण्यावर शिक्कामोर्तब झाले. दोन गुंडांचा ‘गेम’ झाल्याने नागपुरात टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता आहे. शुक्रवारी दिवसभरात खुनाच्या बातम्या सारख्या आल्याने संत्रानगरी हादरली आहे. रात्री मरारटोली भागात नीलेश ऊर्फ बग्गा बाबा नावाच्या एका कुख्यात गुंडाला चौघांनी घेरून भोसकून संपवले. या खुनामुळे टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ सचिन सोमकुवर नावाच्या गुंडाची हत्या झाली होती. बग्गा हा या सचिनचा जवळचा होता.

आणखी एका घटनेत नरसाळा भागात पंकज तिवारी याला भररस्त्यात गाठून धारदार शस्त्राने भोसकण्यात आले. त्याने जागीच दम सोडला. तिसरी घटना मध्यरात्री वाठोडा भागात घडली. हरीश बावणे नावाच्या गुन्हेगारास सहा हल्लेखोरांनी घेरून भोसकले. या खूनसत्रात एका महिलेलाही जीव गमवावा लागला. कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केला. गुरूदेव सिंह मोहर याला पोलिसांनी अटक केली आहे. अधिवेशनानिमित्ताने जास्तीचे दोन हजार पोलीस शहरात फिरत असताना खून पडत असल्याने पोलिसांचा वचक संपल्याचे उघड झाले आहे.

[EPSB]

नागपूर देशाची गुन्हेगारी राजधानी

नागपूर शहरातील गुन्हेगारी विकोपाला पोहचली असून येथील गुन्हेगारीचा वेग पाहता येत्या काही दिवसांत ही गुन्हेगारीची देशाची राजधानी ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत लगावला.

[/EPSB]

विधानसभेत मुख्यमंत्री सांगतात, ‘गुन्हेगारी घटली’

गेल्या काही वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रातील गुन्हेगारीत घट झाली असून शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे, असा दावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केला. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था या विषयावर विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षांच्या वतीने अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. त्यावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात मोठय़ा प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे, महाराष्ट्र देशात गुन्हेगारीत पहिल्या तीन क्रमात आला आहे, महिला अत्याचारांच्या घटनांत पहिल्या क्रमांकावर आला आहे, अशी टीका विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली आहे, पण त्यात तथ्य नाही. कारण विरोधकांनी जी आकडेवारी दिली आहे, ती एकंदर दिली आहे. आपल्या राज्याची लोकसंख्या जास्त असल्यामुळे आकडा मोठा वाटतो. पण क्राईम रेट काढत असताना तो प्रती लाख असा काढला जातो. त्यानुसार पाहिले तर आपण गुन्हेगारीत नवव्या क्रमांकावर आहोत. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा आदी राज्ये आपल्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे आहेत, असेही आपल्या म्हणण्याला पुष्टी देताना मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले इतर राज्यांच्या तुलनेत महिलांवरील अत्याचारांमध्ये आपण १५व्या क्रमांकावर आहोत, बलात्काराच्या गुन्ह्यांत १५व्या क्रमांकावर आहोत, फसवणुकीमध्ये १४व्या क्रमांकावर आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करीत असतानाच गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण गेल्या दोन वर्षात वाढले आहे, असे सांगत पूर्वी शिक्षेची टक्केवारी केवळ ९ इतकी होती. आता ती टक्केवारी ५६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version