Home महामुंबई भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधातील पुरावे पुन्हा तपासणार

भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधातील पुरावे पुन्हा तपासणार

0

भ्रष्टाचाराबाबत मंत्र्यांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नव्याने जे पुरावे दिले आहेत, ते पुन्हा तपासून पाहिले जातील आणि त्यात तथ्य आढळले तर कारवाई केली जाईल.

मुंबई- भ्रष्टाचाराबाबत मंत्र्यांच्या विरोधात विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नव्याने जे पुरावे दिले आहेत, ते पुन्हा तपासून पाहिले जातील आणि त्यात तथ्य आढळले तर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर चौथ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज पुन्हा सुरू झाले.

भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात दिलेल्या पुराव्याच्या आधारावर विशेष आयोग स्थापन करून चौकशी करावी, यासाठी आक्रमक विरोधी पक्षांनी विधान परिषदेचे कामकाज मागील तीन दिवसांपासून बंद पाडले होते. गुरुवारी सभागृहाचे नियमित कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि नारायण राणे यांनी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.

धनंजय मुंडे म्हणाले की, विधान परिषदेत मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर चर्चा झाली. त्याबाबतचे पुरावेही सभागृहात देण्यात आले आहेत. इथे उत्तरामध्ये मंत्र्यांनीच स्वत: आपण स्वच्छ असल्याचे सांगितले आहे. आमचे म्हणणे एवढेच आहे की, तुमचे मंत्री एवढे स्वच्छ असतील तर त्यांची चौकशी करावी, एवढीच मागणी आहे.

मुख्यमंत्री सभागृहात आहेत. त्याबाबत त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी मुंडे यांनी केली. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, दोन दिवस चर्चा झाली. त्याच्या उत्तरात मंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु आता नवीन काही पुरावे दिले असतील तर त्याची तपासणी केली जाईल आणि त्यात काही तथ्य असेल तर संबंधित मंत्र्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

त्यावर ही चौकशी कोण करणार, किती काळात पूर्ण होणार हेही मुख्यमंत्र्यांनी योग्य वेळी सभागृहात सांगावे, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. त्यानंतर चौथ्या दिवशी सभागृहाचे कामकाज नियमित सुरू झाले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version