Home एक्सक्लूसीव्ह भ्रष्टाचारी आरोग्य संचालकांचा कारभार आता आयुक्तांकडे

भ्रष्टाचारी आरोग्य संचालकांचा कारभार आता आयुक्तांकडे

0

काही वर्षापासून संचालक स्तरावर झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे भोव-यात सापडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा कारभार आता सनदी अधिका-यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. 

मुंबई- काही वर्षापासून संचालक स्तरावर झालेल्या कोटय़वधी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे भोव-यात सापडलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा कारभार आता सनदी अधिका-यांच्या हाती सोपवण्यात आला आहे.

यापूर्वी संचालक स्तरावर आलेल्या अधिका-यांच्या भ्रष्टाचार आणि गैरकारभारापासून या विभागाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो आयुर्वेद) राज्यपालांकडे धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर सरकारने आरोग्य विभागाचा कारभार राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे सोपवला आहे. त्यासाठी त्यांना आयुक्तपदाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत.

‘सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालकपदी सनदी अधिकारी नेमा’ या मथळ्याखाली ‘प्रहार’ने या विभागातील भ्रष्टाचार आणि गैरप्रकाराला रोखण्यासाठीचे वृत्त १२ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. त्या पार्श्वभूमीवर सरकारने संचालक स्तरावर अनेक मोठय़ा प्रमाणात बदल करून संपूर्ण विभागाच्या कारभाराचे विकेंद्रीकरण केले असून एका संचालकाचा कारभार हा चार संचालकांमध्ये विभागण्याचा निर्णयही नुकताच घेतला आहे. तर या संचालकांवर कायम नियंत्रण ठेवण्यासाठी आयुक्त डॉ. प्रदीप व्यास यांच्याकडे मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली असल्याने मागील काही दिवसांत या विभागातील गैरकारभार करणा-या अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार चार संचालकांमध्ये प्रशिक्षण, औषधे, रुग्णालय कार्यभार आणि माहिती व अहवाल व्यवस्थापन अशा प्रकारे कामाची विभागणी करण्यात आली आहे. मात्र यात २९४ कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी ज्यांचे नाव गोवले होते, त्यातील एका अधिका-याला पुन्हा संचालकपदी घेण्यात आल्याने त्याविरोधात अनेक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली असून या विभागातील वैद्यकीय अधिका-यांमध्ये असलेल्या गटबाजी आणि राजकारणावर आयुक्त डॉ. व्यास हे कशा प्रकारे अंकुश आणतील, याकडे अनेक संघटनांच्या प्रतिनिधींचे लक्ष लागले असल्याचे मॅग्मोचे राज्य निमंत्रक डॉ. अमृत गोरूले यांनी सांगितले. तर भ्रष्टाचार करणा-या संबंधित अधिका-यांचे सरकारने निलंबन करून त्यांची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही मॅग्मोकडून करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाच्या संचालकपदी भ्रष्टाचाराचा आरोप असलेले आणि त्यात गुंतलेले अधिकारी या विभागाचे संचालक होण्यासाठी तयारीत असून त्यासाठी राज्यपालांनी आता अशा अधिका-यांच्या हाती या विभागाचा कारभार न सोपवता थेट सनदी अधिका-यांच्या हाती सोपवावा व त्यासाठीची नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी मॅग्मोने राज्यपाल सी. विद्यासागर यांच्यासह मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांकडेही केली होती.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version