Home महामुंबई म. रे. वरील अनेक पूल धोकादायक

म. रे. वरील अनेक पूल धोकादायक

0

परळ आणि एलफिन्स्टन या रेल्वे स्थानकांना जोडणा-या पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आता मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांवरील पुलांच्या अवस्थेचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई- परळ आणि एलफिन्स्टन या रेल्वे स्थानकांना जोडणा-या पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आता मध्य रेल्वेच्या इतर स्थानकांवरील पुलांच्या अवस्थेचा आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परळ आणि एलफिन्स्टनला जोडणा-या पुलाच्या रुंदीकरणाचा प्रश्न प्रवाशांसह संघटनांनीही रेल्वे प्रशासनासमोर मांडला होता. पण ही बाब गांभीर्याने घेतली नाही. त्यामुळेच चेंगराचेंगरीची घटना घडून प्रवाशांना जीव गमवावा लागला, असा आरोप प्रवासी करत आहेत. अनेक रेल्वेस्थानकांवर अरुंद पादचारी पूल आहेत. त्यावर सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची गर्दी होते.

त्या पुलांची अवस्था आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. आता तरी रेल्वे प्रशासनाचे डोळे उघडणार का, असा संतप्त सवाल प्रवासी करत आहेत. दादर स्थानकातील मुख्य पुलावर कायम वर्दळ असते. एकाच वेळी अनेक फलाटांवर लोकलगाडय़ा आल्यानंतर या पुलावर प्रवाशांची मोठी गर्दी होते. दादर स्थानकात सध्या अनेक पूल बांधण्यात येत आहेत. पूल एकमेकांना जोडले जात आहेत. पण सीएसएमटीच्या दिशेला असलेल्या पुलावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पुलांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असे अनेक प्रवाशांनी सांगितले. भायखळा स्थानकातही प्रवाशांची गर्दी वाढत आहे. भविष्यातील परिस्थितीचा विचार केल्यास तिथेही रुंद पूल बांधण्याची आवश्यकता आहे, असेही अनेक प्रवाशांनी सांगितले. 

परळसह चिंचपोकळी, करी रोड, शीव, कुर्ला आदी स्थानकांवरही मोठी गर्दी असते. अनेकदा अप आणि डाऊन मार्गावरील लोकलगाडय़ा एकाच वेळेस आल्यावर येथील पुलांवर प्रवाशांची गर्दी होते. याबाबत प्रवासी संघटनांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पुलांची रुंदी आणि संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी केली जाते. पण गांभीर्य नसलेल्या प्रशासनाकडून प्रवासी आणि संघटनांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते, असा काही प्रवाशांचा आरोप आहे.

[EPSB]

मुंबईतील एलफिन्स्टन-परळ स्थानकाला जोडणा-या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version