Home टॉप स्टोरी भाजपचे ३९ आमदार, ११ खासदार नापास

भाजपचे ३९ आमदार, ११ खासदार नापास

0

लोकसभा आणि विधानसभा दोन वर्षावर येऊन ठेपलेल्या असतानाच राज्यातील आमदार आणि खासदार यांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुंबई- लोकसभा आणि विधानसभा दोन वर्षावर येऊन ठेपलेल्या असतानाच राज्यातील आमदार आणि खासदार यांच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या परीक्षेत भाजपच्या १२२ पैकी ३९ आमदार आणि २३ खासदारांपैकी ११ खासदार नापास ठरले आहेत. त्यांची कामगिरी समाधानकारक नसल्याने २०१९ च्या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे.

देशामध्ये आलेल्या मोदी लाटेवर महाराष्ट्रात २३ खासदार निवडून आले. परंतु या खासदारांपैकी जवळपास निम्म्या खासदारांची कामगिरीदेखील फारशी समाधानकारक नसल्याची आकडेवारी भाजपच्या सर्वेक्षणातून पुढे आली असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आणि खासदारांना कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला आहे. शनिवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी राज्यातल्या आमदार-खासदारांची बैठक घेतली. त्यात कामगिरी सुधारा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली असल्याचे समजते.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा राजकीय वतुर्ळात आहे. प्रत्येक मंत्र्याचा ‘केआरए’ पाहून, कामगिरीची शहानिशा करूनच मुख्यमंत्री बढती-बदली-पदावनतीबाबत निर्णय घेणार असल्याचे समजते आहे. त्याची सुरूवात म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना एक प्रश्नावली पाठवली आहे. व त्यावर उत्तरे मागविली आहेत. मंत्र्यांनी पाठविलेली उत्तरे तपासून नवरात्रीनंतर मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्तार करू शकतात, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे ३१ ऑक्टोबरला देवेंद्र सरकारला तीन वषर्ं पूर्ण होत आहेत. त्यावेळी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठीही या कार्य अहवालाचा उपयोग होऊ शकतो.

तीन वर्षांच्या कालावधीत मंत्री म्हणून काय विशेष काम केले? गेल्या सरकारच्या तुलनेत तुम्ही केलेले काम श्रेष्ठ कसे ठरते? तुमच्या कामामुळे जनतेच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला? ही संपूर्ण माहिती तुलनात्मक आकडेवारीसोबत द्या. अपूर्ण आणि चुकीची माहिती स्वीकार केली जाणार नाही. १५ सप्टेंबरनंतर येणारी माहिती स्वीकारली जाणार नाही आणि तुम्ही काहीही काम केलेले नाही, असे मानण्यात येईल, असे काहीसे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि मंत्र्यांना विचारले असल्याचे समजते आहे.

[EPSB]

[/EPSB]

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version