Home संपादकीय अग्रलेख भाजपा नेत्यांची पोपटपंची

भाजपा नेत्यांची पोपटपंची

0

धर्मावर आधारित ज्या राजकीय पक्षाची निर्मिती झाली तो भाजपा नेहमीच आजवर अनेक भविष्यवाणीला ढाल बनवित सामान्यांना आणि ब्राह्मणेतरांना उल्लू बनवित आला आहे.

धर्माचे जोडे राजकारणाच्या उंबरठ्याबाहेर ठेवायचे, तरच लोकशाहीत राजकारण सक्षमतेने करता येते, याचा विसर सत्ताधा-यांना पडलेला नेहमीच दिसतो आहे. भाजपामधील बहुतांश नेते हे संघाच्या कट्टर हिंदुत्ववादी मुशीत तयार झाले आहेत. आता तर उत्तर प्रदेशात एका महंताने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथेच्या दुस-याच दिवशी धर्म प्रसारकांचे काम आणि संघाचा अजेंडा राबवित उत्तर प्रदेशातील मिशनरींवर भाजपाची दादागिरी सुरू झाली आहे. सोमवारी सकाळी पोलिसांच्या सहकार्याने भाजपा कार्यकर्त्यांनी कुशीनगर येथील हिमालय मिशनरीच्या १५ सदस्य असणा-या एका चर्चवर हल्ला करीत या चर्चला टाळे ठोकले, तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाचे पवित्रीकरण सुरू केले आहे.

अलाहाबाद आणि गोरखपूर येथील ७ धर्मगुरूंच्या हस्ते विधिवत पूजाअर्चा केल्यानंतरच योगी या निवासात वास्तव्यास जाणार आहेत. या पूजेत योगी स्वत: ११ लिटर दूध, तुपाचा रुद्राभिषेक करणार आहेत. या घटनेने योगी हिंदू धर्माचा प्रसार करणार आहेत हे तर स्पष्ट होतेच आहे. प्रश्न हाच आहे की गोमुत्राने पवित्र केलेल्या या शासकीय निवासस्थानात दलित, मुस्लीम, मागासवर्गीय, बहुजन समाज, ख्रिस्ती धर्मियांच्या नागरिकांना सन्मानाची वागणूक आणि त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळणार का? काही दिवसांपूर्वी भाजपाचे नेते किरेन रिजिजू यांनी मोदी म्हणजे ‘मसीहा’ आहेत, अशा अर्थाची पोस्ट फेसबुकला शेअर केली होती. त्याआधीही महाराष्ट्रातील अनेकांनी मोदींना ‘देवदूत’ मानून त्यांची पूजाही केली आहे. तसेही भारतातील राजकारण हे नेहमीच व्यक्तिनिष्ठ राहिले आहे. पक्षापेक्षाही व्यक्तीचा करिष्मा इथे दखलपात्र ठरतो आहे. म्हणूनच तर मोदींना आपले पद बाजूला ठेऊन उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा या ठिकाणी प्रचार काळात मुक्काम करावा लागला होता. शिवाय भाजपाला नाही तर मोदीला मते द्या, असा प्रचार करणे भाग पडले होते.

भाजपाच्या सर्वच नेत्यांना भविष्यवाणी वर्तवायला आवडते. यात महाराष्ट्रातील खा. किरीट सोमय्या आघाडीवर आहेत. अनेकदा तर कोणत्या केसमध्ये काय होणार हे त्यांनी आधीच जाहीर केलेले असते. हा भाग वेगळा की काही व्यक्तिगत व्यथा त्यांच्या ज्योतिष विद्येला भेदणा-या ठरल्या. मुंबई पालिकेच्या प्रचारात ज्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवले गेले, त्या सोमय्या यांनी बरेच दिवस काहीच वक्तव्य कसे काय केले नाही, असा सुन्नपणा वाटत असतानाच ते बोलले. तेही थेट लोकसभेत आणि थेट फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्राडॅमसने भारताला नव्या उंचीवर घेऊन जाणा-या ज्या व्यक्तीबद्दल नोंद केली होती. पूर्व भागात असा एक नेता होईल, जो भारताला एका नव्या उंचीवर नेईल. असे वक्तव्य अनेक शतकापूर्वी केले होते. त्या वक्तव्याबद्दल सोमय्या बोलले. किरीटजींनी नॉस्ट्राडॅमसच्या भविष्य वाणीतील दूत, ती व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचे वक्तव्य संसदेत केले. लोकसभेत पूरक मागण्यांवर बोलताना त्यांनी नॉस्ट्राडॅमसने वर्तवलेल्या भविष्यवाणीचा उल्लेख केला. पूर्व भागात असा एक नेता होईल, जो भारताला एका नव्या उंचीवर नेईल. तो नेता म्हणजे पंतप्रधान मोदी, असे सोमय्या यांनी म्हटले. प्रत्येकाला आपला नेता प्यारा असतो, पण स्वत:ची मते मांडताना आपण एक जबाबदार राजकीय नेते आहोत याचा विसर भाजपाच्या नेत्यांना सातत्याने का होतो बरे? तसेही मोदींनी सत्तेवर येण्यापूर्वी आणि आल्यानंतरही पक्षापेक्षा स्वत:चा चेहरा अधिक चमकवला आहे. स्वत:वर प्रेम करणा-या मोदींना एकाही जाहिरातीचा मोह आवरता आलेला नाही. काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांनी लक्ष्मीदर्शनाचा सल्ला मतदारांना दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपाच्या विजयानंतर अल्पावधीतच कोटय़वधीची उधळण करीत मुलाचे लग्न करणा-या दानवेंनी लक्ष्मीचे दर्शन अगदी मनापासून घेतल्याचे सर्वांनी अनुभवले आहे. एकीकडे राज्यातील अनेक समस्यांवर योग्य निराकरण करताना, शेतक-यांची कर्जमाफी करताना, सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जाते. केंद्राकडे राज्याला देण्याकरिता पैशाचे नियोजन नाही, मग अशा प्रकारच्या पूजाअर्चाकरिता होणारा खर्च कोठून केला जातो. उत्तर प्रदेशातील अडाणी जनतेची अंधश्रद्धाळू मानसिकता लक्षात घेऊन सुरू असणारा हा विजयाचा आणि धर्माचा उन्माद नव्हे काय? अशा प्रकारच्या मानसिकतेला आणि व्यक्तिपूजेला खतपाणी घालण्याचेच काम किरीट सोमैया आणि रिजिजूंसारखी नेतेमंडळी करीत आहेत.

एकीकडे अंधश्रद्धा, बुवाबाजी याला आळा घालण्यासाठी जादूटोणा विरोधी विधेयक संमत करून त्या अंतर्गत कायदा करण्यात आला. या कायद्याला मान्यता देणे म्हणजे रुढी, परंपरांचा अतिरेक, धर्माचे अडंबर, बुवाबाजी, धर्म दरबार भरविणा-यांविरुद्ध उचललेले पुरोगामी पाऊल होते. याकरिता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांनी वैचारिक आणि कृतिशील उठाव करीत चळवळी जिवंत ठेवल्या. या कुप्रथांपासून सामान्यातल्या सामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. असे असताना एका मठाचे महंत असणारे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील शासकीय निवासस्थानाचे मुख्य गेट स्वस्तिक आणि ओमच्या चिन्हांनी गोमुत्र शिंपडून होमहवनाने पवित्र करीत सर्व सरकारी नियम, कायदे पायदळी तुडवत आले आहेत.

दुसरीकडे या सर्वांचे नेते असणारे मोदी हे देवदूत आहेत, देशाच्या उन्नतीकरीता जन्माला आले आहेत, अशी वक्तव्ये भाजपा नेत्यांनी वारंवार करीत याला खतपाणीच घातले आहे. याचाच कित्ता गिरवत मोदींचा जयजयकार करीत सोमय्याही सरसावले आहेत. यावरून भाजपा नेत्यांची पोपटपंची ऐकता न्यू इंडिया हिंदुराष्ट्राकडे खेचले जात नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. या सर्वच गोष्टींना वाघाचा आव आणून डरकाळी फोडणारे आणि शेपूट घालणारी सेना आणि सावध पवित्रा घेत विरोध करणारे, ऐनवेळी नरमाईची भूमिका घेणारे विरोधक या सर्वाला जबाबदार आहेत. हा प्रवास लोकशाहीला पायदळी तुडविणारा आणि भारताची मुस्कटदाबी करून न्यू इंडिया घडविणारा आहे. जो एकसंघ समाजाला तुकडय़ात विभागणारा ठरू शकतो, याची जाणीव या नेत्यांना आणि धर्मावर आधारित राजकारण करणा-या नेत्यांना कधी होणार हा एक प्रश्नच आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version