Home कोलाज भुकेल्याला अन्न, विद्यार्थ्यांला शिक्षण!

भुकेल्याला अन्न, विद्यार्थ्यांला शिक्षण!

0

एकीकडे अन्नावाचून भूकबळी जात आहेत, तर दुसरीकडे अन्नाची नासाडी होत आहे. अन्नाची नासाडी थांबवून ते भुकेल्या पोटात घातले, तरी ही भुकेची समस्या कमी होईल, यातूनच ‘अन्नपूर्णा ट्रस्ट’चा जन्म झाला. एक वेळची भूक शमविण्यासाठी सुरू केलेला प्रवास आता सक्षम शिक्षण देऊन भूक निर्मूलनाच्या दिशेने सुरू आहे. त्याला अधिक गती मिळाल्यास अनेकांच्या भुकेचा प्रश्न संपू शकेल.

परळी शहर पोलीस ठाण्यासमोरून गाडी डावीकडे वळली. वैद्यनाथ मंदिरात दर्शन घेऊन समाधानी चेह-याने परतणारे भाविक दिसत होते. तर, काही भाविक हातात हार-प्रसाद घेऊन मंदिराच्या दिशेने जात होते. हे सर्व दृश्य पाहून आठवणींचा उमाळा आणखीनच उत्कट झाला. याच रस्त्यावरून ३८ वर्षापूर्वी दररोज सूर्योदयापूर्वी वैद्यनाथाच्या पूजेचे ताट घेऊन अखंड श्रावण महिनाभर जात होतो. काकाजी अर्थात मोहनलालजी बियाणी हे संपूर्ण श्रावण महिना वैद्यनाथाला अभिषेक करीत असत आणि त्या पूजेचे ताट घेऊन मी त्यांच्यासोबत जात असायचो. काकाजींची महापूजा सुरू असताना, मी एका कोप-यात ‘शिवलीला अमृत’ या गं्रथाचा अकरा अध्याय वाचत बसलेला असायचो. पूजा संपली की, पुन्हा त्याच रस्त्याने परतीचा प्रवास सुरू व्हायचा. घरी आल्यानंतर काकाजींच्या सोबत सकाळचा नाश्ता व्हायचा. काकाजींच्या पत्रकारितेतील, सामाजिक, धार्मिक आणि सहकार क्षेत्रातील कार्याला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त उजाळा देऊन बाहेर पडल्यानंतर हे दृश्य समोर आल्याने त्यांनी वैयक्तिक आयुष्यात दिलेल्या प्रेमळ आठवणी दाटून आल्या.

बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात एक तपोनिधी म्हणून ज्यांची ओळख होती, ते ‘मराठवाडा साथी’ या दैनिकाचे संस्थापक संपादक मोहनलाल बियाणी यांचा प्रथम स्मृतिदिन गेल्या आठवडय़ात झाला. त्यांचे चिरंजीव चंदूलाल, सतीश आणि जगदीश यांनी त्यानिमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. त्यातील पहिलेच पुष्प गुंफण्याची संधी मला मिळाली. १९८१ साली शालेय शिक्षण सुरू असताना बियाणी यांच्या प्रेसमध्ये काम करीत होतो. खरं तर काम करायला म्हणून त्यांच्या प्रेसमध्ये गेलो आणि पंधरा-वीस दिवसांत त्यांच्या कुटुंबाचा भाग झालो. त्या एका वर्षात कुटुंबाशी नाते अगदी घट्ट झाले. इतक्या वर्षानंतरही ते तितकेच मजबूत राहिले आहे. ‘शेतक-यांचे प्रश्न आणि ग्रामीण पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यानात विचार मांडत असतानाच ‘मराठवाडा साथी’च्या माध्यमातून काकाजींनी शेती आणि सामाजिक प्रश्नांचा कसा पाठपुरावा केला, याची उदाहरणे देता आली. महाराष्ट्रभर कीर्तन, व्याख्यान, काव्यवाचनासाठी जाणे होत असले तरी या कार्यक्रमाला कौटुंबिक नात्याची झालर असल्याने कार्यक्रम खूपच रंगत गेला. या कार्यक्रमाला जाण्याचे ठरले, तेव्हाच ‘माझी तीर्थयात्रा’ या सदराबद्दल पत्रकार प्रशांत जोशी यांना सांगितले होते आणि सदराला अनुरूप एखादी संस्था असेल तर मला दाखवा, असे म्हणालो होतो. कार्यक्रम संपल्यानंतर चंदूलाल बियाणी माझ्यासह सर्व पाहुण्यांना घेऊन ‘अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या अन्नछत्रामध्ये घेऊन गेले. खरे तर यापूर्वीही ‘मराठवाडा साथी’च्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहिलो आहे. तेव्हा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था असायची. आज मात्र चंदूशेठ या ‘अन्न छत्रा’त घेऊन आले होते. अन्नछत्रासमोर गाडी उभी राहिली तेव्हा ते म्हणाले, ‘ही आजची तुमची तीर्थयात्रा’ बघा कशी वाटते.

अन्नछत्रामध्ये प्रवेश करताच, अत्यंत स्वच्छ आणि नीटनेटका प्रतीक्षा हॉल दिसला. लोक अत्यंत शिस्तीत बसलेले होते.

आत प्रवेश करताच, ‘अन्न हे परब्रह्म असून त्याचा एकही कण वाया जाणार नाही याची काळजी घ्या.’ असा फलक दिसला. भोजन कक्षात प्रवेश केल्यानंतर व्यवस्था अत्यंत टापटीप होती. स्वच्छता आणि स्वयंशिस्त पाहायला मिळत होती. एक पंगत उठली की, दुस-या संपूर्ण पंगतीला पूर्ण पदार्थ पोहोचेपर्यंत कुणीही जेवणाला सुरुवात करीत नव्हते. जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी इथल्या व्यवस्थापकाने अत्यंत मृदुभाषेत निवेदन केले. अन्नछत्र सुरू करण्यामागचा उद्देश, अन्नाचे महत्त्व, ते तयार करण्यासाठी शेतकरी करीत असलेले कष्ट, अन्नावाचून एकंदर जगात जाणारे भूकबळी याची सर्व माहिती सांगितली आणि अन्नाचा एक कणही वाया जाणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. या सर्व वातावरणात गेल्यानंतर एकंदरच अन्नाबद्दलची जागृकता आपोआपच आपल्या मनात निर्माण झाली.

अन्नछत्रातील शिस्त आणि तिथल्या रुचकर भोजनाचा अनुभव घेतल्यानंतर या ट्रस्टचे अध्यक्ष अनिल लाहोटी यांच्याशी चर्चा केली. या अन्नछत्राची संकल्पना कशी पुढे आली, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, परळी वैद्यनाथ हे बारा ज्योतिर्लिगापैकी एक तीर्थक्षेत्र आहे. संपूर्ण भारतातून येथे भाविक दर्शनाला येतात. त्यातील अनेकजण खूपच साधारण परिस्थितीतील असतात. अनेकदा रात्री दर्शन झाल्यानंतर उपाशी पोटी काही भाविक पाय-यांवर झोपलेले आम्हाला दिसायचे. हे दृश्य पाहून माझे ज्येष्ठ बंधू ओमप्रकाश हे खूप अस्वस्थ झाले. आपल्या गावात आणि भगवान वैद्यनाथाच्या दरबारात असे कुणी उपाशी झोपणे योग्य नाही. आपण काहीतरी व्यवस्था केली पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. परळी शहरातील व्यापारी, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक बोलाविली आणि त्यातून या अन्नछत्राचा जन्म झाला. त्यानंतर केवळ भाविकांनाच नव्हे, तर शहरातील कुणीही उपाशी पोटी राहू नये म्हणून सकाळी १०.०० ते दुपारी १.०० आणि सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत जेवढे लोक येतील, त्यांना भोजनाची व्यवस्था केली जाते, अशी माहिती अनिल लाहोटी यांनी दिली.

सामाजिक जाणिवा जिवंत असणारे लोक एकत्र येतात त्यातून माणूसपण जागृत होते. ट्रस्टच्या अशाच बैठकीत एक विचार आला की, आपल्यापर्यंत पोहोचणा-या लोकांची आपण भूक भागवितो, पण काही वयोवृद्धांना आधार नसल्यामुळे जगण्याचा प्रश्न निर्माण झालेला असतो. ज्यांना मूल नाही, ज्यांची आहेत ती त्यांना सोडून शहरात गेली आहेत, आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष देत नाहीत किंवा देऊ शकत नाहीत. त्यांचाही काहीतरी विचार केला पाहिजे. ही समस्या शहरी आणि निमशहरी भागात जास्त आहे. हे लक्षात आल्यानंतर अशा निराधार वृद्ध स्त्री-पुरुषांचा शोध घेतला गेला. त्यांना महिनाभर जे अन्नधान्य लागते ते संपूर्ण त्यांना प्रत्येक महिन्याला पुरविले जाते. परळी, आंबाजोगाई, बीड अशा काही शहरांत हा उपक्रम सध्या सुरू आहे.

एकंदरच गरिबीचे मूळ शिक्षणात आहे. ग्रामीण भागात शिक्षणाची अनास्था ही जास्त असते. अनेकदा परिस्थितीमुळेही मुलांना शिक्षण देता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन अन्नपूर्णा ट्रस्टने ग्रामीण पालकांमध्ये शिक्षणामध्ये जाणीव जागृती केली जाते. ट्रस्टचे सदस्य राकेश चांडक हे ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन शिक्षणाचे आणि अन्न सुरक्षेचे महत्त्व सांगणारी व्याख्याने देतात. या व्याख्यानादरम्यान ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता कमी आहे, अशांचा शोध घेऊन त्यांना शालेय साहित्य पुरविले जाते. त्यातून खूपच परिस्थिती गरिबीची आहे आणि विद्यार्थी मात्र, शिक्षणात हुशार आहे, अशा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक योजनाही सुरू केली आहे. विशेषत: एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन झाले आहे. तरुणपणातच पती गेल्यामुळे अशा स्त्रिया अनेकदा दुसरा विवाह करतात, तेव्हा पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांच्या जगण्याचा प्रश्न येतो, अशा मुलांच्याही शिक्षणासाठी अन्नपूर्णा ट्रस्ट मदत करते. म्हणूनच मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी परळी ग्रामीण रुग्णालयात नवरात्रोत्सवात जितक्या मुली जन्माला येतील, तितक्या मुलींसाठी कन्यादान योजनाही सुरू केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version