Home टॉप स्टोरी सर्पदंशामुळे झोप उडालेले आंध्र सरकार करणार ‘सर्प यज्ञ’!

सर्पदंशामुळे झोप उडालेले आंध्र सरकार करणार ‘सर्प यज्ञ’!

0

अंधश्रद्धा निर्मुलनासाठी कठोर कायदे अमलात आणले जात असताना आता सरकारच ‘होम-हवन यज्ञ’ करण्यात व्यस्त आहे.

हैदराबाद- अंधश्रद्धा निर्मुलनासाठी कायदा करण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे विशेष मोहीम राबवण्यात येते. सरकारी जाहिरातींवरही कोट्यवधींचा खर्च करण्यात येतो. असे असताना आता सर्पदंशामुळे झोप उडालेले आंध्र प्रदेशचे सरकारच ‘होम-हवन यज्ञ’ करणार असल्याचे वृत्र आहे.

आंध्र प्रदेशातल्या कृष्णा जिल्ह्यातील दीवीसीमा भागात १०० हून अधिक गावक-यांना साप चावल्याने लोकांची झोप उडाली आहे. आतापर्यंत दोन जणांचा सर्पदंशाने मृत्यू झाला आहे. तर जुलै महिन्यापासून सुमारे १०० गावक-यांना साप चावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्पदंशामुळे गावक-यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कधी साप येईल आणि चावा घेईल या भितीने गावागावातील लोक रात्रंरात्र जागून काढत आहेत. सापांना शोधण्यात संबंधित यंत्रणा अपयशी ठरले आहे. राज्य सरकारही सर्पदंशाच्या वाढत्या घटनांनी हैराण झाले आहे.

सर्पदंशाने हैराण झालेल्या राज्य सरकारने आता यावर उतारा म्हणून ‘सर्प शांती यज्ञ’ करण्याचे ठरवले आहे. बुधवारी २९ ऑगस्टला मोपीदेवी येथील श्री सुब्रमण्येश्वर स्वामी मंदिरात हे ‘सरकारी’ यज्ञ होणार आहे. या यज्ञाचे आयोजन सरकारच्या वतीने केले आहे. हा यज्ञ १५ पुरोहित करणार आहेत. यावेळी सर्पसूक्ताचा जप करणार असल्याची माहीती सुब्रमण्येश्वर स्वामी मंदिराचे कार्यकारी अधिकारी एम. शारदा यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने प्रत्येक गावात दोन सर्प पकडणा-यांना तैनात ठेवले आहे. दोन दिवसांत त्यांनी सहा साप पकडले आहेत. विषप्रतिबंधक तसेच सर्पदंशावरील औषधे दिल्यानंतर तसेच सर्पदंशांबाबतची व्यापक जनजागृती केल्यानंतर आता लोकांच्या मानसिक काळजीपोटी हा यज्ञ केला जाणार असल्याचे कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि न्यायदंडाधिकारी बी. लक्ष्मीकांतम यांनी सांगितले. स्थानिक आणि एंडोमेंट विभागाच्या संयुक्त विद्यमाने सर्प यज्ञ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version