Home देश अखिलेश यादवांकडून ९ समर्थकांची ‘घरवापसी’

अखिलेश यादवांकडून ९ समर्थकांची ‘घरवापसी’

0

निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे ‘सायकल’ मिळाल्यानंतर अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काका शिवपाल यादव यांच्याविरोधात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे.

लखनऊ- निवडणूक आयोगाकडून अधिकृतपणे ‘सायकल’ मिळाल्यानंतर अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा काका शिवपाल यादव यांच्याविरोधात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. शिवपाल यांनी पक्षातून निलंबित केलेल्या ९ समर्थकांना अखिलेश यांनी पुन्हा एकदा पक्षात घेतले असून त्यांना पूर्वीच्या पदांवर नियुक्त केले आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असून यानंतर मध्यंतरीच्या काळात थोडया थंडावलेल्या काका-पुतण्याच्या जुगबंदीला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. अखिलेश यादव यांनी आपल्याला पक्षातील बहुतांशी सदस्य, लोकप्रतिनिधी यांचा पाठिंबा असल्याचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर केले होते.

त्यांच्या तुलनेत मुलायमसिंह यादव आणि शिवपाल यादव यांच्या गटाला असणारा पाठिंबा अगदीच अल्प असून त्यामुळे निवडणूक आयोगाने अखिलेश यांना सायकलचे चिन्ह दिले होते. त्यानंतर अखिलेश समर्थकांनी त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी केलेली निवडही ग्राह्य धरली जात असून आता या पदाचा त्यांनी वापर सुरू केला आहे.

अखिलेश यादव यांचे समर्थक असलेले आनंद भदौरिया, सुनील सिंह साजन, संजय लाथर, उदयवीर सिंह आणि अरविंद यादव हे विधान परिषद सदस्य, तसेच मुलायमसिंह युथ ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव दुबे, प्रदेश अध्यक्ष मोहम्मद ऐबद, समाजवादी युवजन सभेचे प्रदेशाध्यक्ष ब्रजेश यादव, समाजवादी छात्र सभेचे प्रदेशाध्यक्ष दिग्विजय सिंह या ९ जणांना समाजवादीचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल सिंह यादव यांनी सप्टेंबर महिन्यात पक्षातून निलंबित केले होते.

यापैकी ब्रजेश यादव आणि दिग्विजय सिंह यांनी अखिलेश यांना नुकतेच पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर पक्षाविरोधात निदर्शने केली होती. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले होते. तर उदयवीर सिंह यांनी थेट मुलायमसिंह यांच्यावर ते बाहेरून आलेल्यांच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप केला होता.

अरविंद यादव हे अखिलेश यांचे चुलत भाऊ असून त्यांच्यावर शिवपाल यांनी जमीन बळकावल्याचा आरोप केला होता. या सर्वाना पुन्हा पक्षात घेत असल्याचे पत्रक अखिलेश यांनी बुधवारी रात्री काढले असून त्यांना पूर्वीची पदे बहाल केली आहेत. समाजवादीच्या महिला सभेच्या प्रदेशाध्यक्ष पदावरही अखिलेश यांनी गीता सिंह यांची नियुक्ती केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version