Home टॉप स्टोरी समेट नाहीच!

समेट नाहीच!

0

समाजवादी पार्टीचे अखिलेश समर्थक नेते रामगोपाल यादव यांनी मंगळवारी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठले. अखिलेश यांना पक्षातील ९० टक्के कार्यकर्त्यांचे समर्थन असल्याचे सांगितले .

नवी दिल्ली- समाजवादी पार्टीच्या ९० टक्के कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि पदाधिका-यांचे अखिलेश यादव यांना समर्थन असून त्यामुळे सायकल हे समाजवादी पार्टीचे निवडणूक चिन्ह अखिलेश यादव यांनाच मिळावे, अशी मागणी अखिलेश समर्थक आणि समाजवादीचे प्रदेश सरचिटणीस रामगोपाल यादव यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

तर दुसरीकडे पक्ष अजूनही मुलायम सिंह यांचाच असल्याचे सांगत मुलायय सिंह गटाच्या नेत्यांनीही दिल्लीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे कधीही घोषणा होण्याच्या मार्गावर असलेल्या उत्तर प्रदेश विघानसभा निवडणुकांमध्ये ‘सायकल’वर स्वार कोण होते? याकडे आता सा-या देशाचे लक्ष लागले आहे.

मागील काही दिवसांपासून प्रचंड अंतर्गत कलहामुळे उभी फूट पडलेल्या समाजवादी पक्षात अखिलेश यादव यांना मोठा पाठिंबा मिळत असून अखिलेश यांनी वेगळी वाट धरल्यानंतर त्यांना पक्षाच्या २२९ पैकी २२० आमदारांनी समर्थन दिले होते. त्यानंतर राष्ट्रीय अधिवेशनात हजारो कार्यकर्त्यांनी एकमताने त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदीही निवड केली होती.

त्यानंतर त्यांनी ‘सायकल’वर दावा केल्याने थेट समाजवादीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यांनी सोमवारी दिल्लीत धाव घेत निवडणूक आयोगात जाऊन सायकल आपलीच असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे मंगळवारी अखिलेश समर्थक रामगोपाल यादव यांनीही निवडणूक आयोगात जाऊन अखिलेश यांना पक्षातील ९० टक्के लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे समर्थन असल्याचे सांगितले आणि पुन्हा सायकलवर दावा केला. त्यामुळे आता सायकल कुणाला मिळते, या निर्णयावर उत्तर प्रदेशातील पुढील अनेक गणिते अवलंबून असणार आहेत.

अखिलेश-मुलायम यांची भेट

मुलायम सिंह हे मंगळवारी दिल्लीहून परतल्यानंतर अखिलेश यादव यांनी त्यांची भेट घेतली. सुमारे २ तास त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी मुलायम यांनी पक्ष एकसंध ठेवण्यासाठी अखिलेश यांची समजूत काढल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र यावर काहीही तोडगा निघू शकला नाही.

ही बैठक संपल्यानंतर अखिलेश समर्थक असलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ‘आता खूप उशीर झाला आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. त्यामुळे अजूनही पक्षातील दुफळी संपुष्टात आलेली नसल्याचे स्पष्ट झाले. भेटीपूर्वी अखिलेश आणि मुलायम यांच्यात फोनवरूनही चर्चा झाल्याचे समजते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version