Home महामुंबई ठाणे अभय कलगुटकर यांची ‘ती’ सभा विनापरवानगी!

अभय कलगुटकर यांची ‘ती’ सभा विनापरवानगी!

0

आमदार सुरेश लाड उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना शेतक-यांच्या ज्या बैठकीत जाऊन मारहाण केली, ती बैठक कुठल्याही वरिष्ठ अधिका-याच्या परवानगीशिवाय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

नेरळ- आमदार सुरेश लाड उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांना शेतक-यांच्या ज्या बैठकीत जाऊन मारहाण केली, ती बैठक कुठल्याही वरिष्ठ अधिका-याच्या परवानगीशिवाय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. या सभेला परवानगी मिळावी, असे जुन्या तारखेचे पत्र घेऊन रिलायन्सचे अधिकारी सोमवारी कर्जत तहसील कार्यालयात आले होते.

जुन्या तारखेने आवक रजिस्टरमध्ये पत्राची नोंद करण्याची त्यांनी मागणी होती. मात्र ही बाब शेतक-यांना समजताच त्यांनी या अधिका-यांना थेट पोलीस ठाण्यात नेले. तिथे त्यांनीही झाल्या प्रकाराची कबुली दिली असून त्यामुळे कलगुटकर हे विनापरवानगी सभा घेऊन कुणाशी असलेली बांधिलकी जपत होते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

रिलायन्सच्या गॅस पाईपलाईनला जागा द्यायची नाही, अशी आमदार सुरेश लाड आणि शेतक-यांची भूमिका असताना या प्रकल्पासाठी शासनाने नेमलेले पालघरचे उपजिल्हाधिकारी अभय कलगुटकर यांनी ११ ऑगस्ट रोजी कर्जत तहसील कार्यालयात शेतक-यांची बैठक घेतली.

तिथे आमदार सुरेश लाड यांनी शेतक-यांची भूमिका मांडत कलगुटकर यांना मारहाण केली. याप्रकरणी लाड यांच्यावर १७ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होऊन २४ ऑगस्ट रोजी त्यांना अटक आणि सुटका झाली होती.

दरम्यान, या सगळय़ानंतर सोमवारी २९ ऑगस्ट रोजी रिलायन्स कंपनीचे अधिकारी शिरीष पोटे (५९) हे ठाणे येथील कार्यालयातून २०१६/१३५८ जावक क्रमांकाचे पत्र घेऊन कर्जत तहसील कार्यालयात आले. दुपारी १ वाजता त्यांनी तहसील कार्यालयाच्या नोंदणी विभागात ११ आणि १२ ऑगस्टच्या शेतक-यांच्या सभेसाठी कर्जत तहसील कार्यालयाने परवानगी द्यावी, अशा अशयाचे पत्र त्यांनी दिले.

मात्र त्यावर ८ ऑगस्ट तारीख असल्याने तेथील कर्मचा-याने ते घेण्यास नकार दिला. ही माहिती आमदार सुरेश लाड यांचे पुतणे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांना समजताच त्यांनी सोमनाथ ठोंबरे व शेतक-यांसह कर्जत तहसील कार्यालयात येऊन रिलायन्सचे अधिकारी शिरीष पोटे आणि त्यांच्यासोबत असलेले मोरे यांना कर्जत पोलीस ठाण्यात नेले. तिथे पोटे यांनी मागील तारखेचे पत्र आणल्याची कबुली दिली.

त्यामुळे ज्या बैठकीत हा प्रकार झाला, ती बैठकच विनापरवानगी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कलगुटकर हे सरकारची नोकरी करतात? की रिलायन्सची? असा संतप्त सवाल शेतक-यांमधून केला जात आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version