Home महामुंबई मेट्रोचा दंड टाळण्यासाठी त्याने ३० फुटावरून उडी मारली

मेट्रोचा दंड टाळण्यासाठी त्याने ३० फुटावरून उडी मारली

0

मेट्रो रेल्वेच्या दंडापासून वाचण्यासाठी एका तरुणाने थेट ३० फूट उंचीवरून खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई- मेट्रो रेल्वेच्या दंडापासून वाचण्यासाठी एका तरुणाने थेट ३० फूट उंचीवरून खाली उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढ्या उंचीवरून उडी मारल्यानंतर तो तरुण बचावला असून जखमी झाला आहे. घाटकोपर स्थानकात ही घटना घडली आहे.

राजकुमार (१८) असे या तरुणाचे नाव आहे. तो मुळचा ओडिसामधील असून तो टाईल्स लावण्याचे काम करतो.

राजकुमार साकी नाका येथे मेट्रोमध्ये चढून घाटकोपरला आला. त्यावेळी स्टेशनबाहेर येण्यासाठी त्याने मशीनमध्ये टोकन टाकले. मात्र ऑटोमॅटीक फेयर कलेक्शनचे गेट न उघडल्याने त्याने यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून सुरक्षारक्षकांनी त्याच्यादिशेने धाव घेतली आणि त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

त्यानंतर तो मेट्रोच्या तिकिटाच्या भागात आला. त्याठिकाणी त्याला रेल्वे कर्मचा-यांनी त्याला दंड भरण्यास सांगितले. राजकुमारला कस्टमर केअर विभागात नेत असताना चकवा देऊन त्याने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने तीन मजली स्थानक इमारतीतून थेट बाहेर रस्त्यावर उडी मारली. रसत्यावरील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

घाटकोपर पोलिसांच्या मदतीने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून राजकुमारने उडी मारल्याने त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.

त्याच्याकडे टोकन असूनही मेट्रो स्टेशनमधील गेट का उघडले गेले नाही असे रेल्वे अधिका-यांना विचारण्यात आले. तेव्हा टोकन घेतल्यापासून एक तासाच्या आत मेट्रोचा प्रवास करावा लागतो. अन्यथा ते टोकन बाद होते. राजकुमारने स्टेशनवर बराच वेळ घालवल्याने त्याचे टोकन बाद झाले आणि तो घाटकोपरला गेट उघडू शकला नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version