Home विदेश 13 हजार फुटांवरून पडूनही स्कायडायव्हर बचावला

13 हजार फुटांवरून पडूनही स्कायडायव्हर बचावला

0

नशिबाने साथ दिली तर माणूस डोंगरही फोडून रस्ताही बनवतो आणि नशिबाच्या जोरावर मृत्यूलाही चकवतो.

नशिबाने साथ दिली तर माणूस डोंगरही फोडून रस्ताही बनवतो आणि नशिबाच्या जोरावर मृत्यूलाही चकवतो. असेच काहीसे घडले लिअ‍ॅम ड्यून याच्याबरोबर. स्कायडायव्हिंगची आवड असलेल्या 35 वर्षीय लिअ‍ॅम याने 13 हजार फुटावरून थरारक अनुभव घेण्यासाठी आकाशात झेप घेतली खरी. पण, पाठीवरील मुख्य पॅराशूट न उघडल्यामुळे आकाशातून जमिनीवर येईपर्यंत त्याची मृत्यूशी झुंजच सुरू होती. स्कायडायव्हिंग सुरू असलेल्या हवाईतळावरील डबक्यात पडल्याने त्याचा जीव वाचला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला.

दोन मुलांचा पिता असलेला लिअ‍ॅम ड्यून याला उंचीचे आणि स्कायडायव्हिंगचे प्रचंड वेड. इंग्लंडमधील लान्सशायरमध्ये राहणा-या लिअ‍ॅम याने दोन आठवड्यांपूर्वी न्यूझीलंड येथील मोटोकोमध्ये भरलेल्या स्कायडायव्हिंग महोत्सवात भाग घेतला होता. याआधी त्याने चार हजार वेळा स्कायडायव्हिंग केले होते. अत्यंत अनुभवी असलेल्या लिअ‍ॅम यांच्यासाठी हवाई कसरतींचा हा खेळ काही नवखा नव्हता. मात्र, 13 हजार फुटांवरून आकाशात झेपावलेल्या लिअ‍ॅम याचे मुख्य पॅराशूट काही केल्या उघडत नव्हते. त्यातच तो स्वत:भोवती गोलगोल गिरक्या घेत प्रचंड वेगाने खाली येऊ लागला आणि त्याचे धाबे दणाणले. आता काही केल्या आपण वाचत नाही, हे त्याला कळून चुकले. मात्र, त्याही परिस्थितीत दुसरे राखीव पॅराशूट उघडण्याचा त्याने शर्थीचा प्रयत्न केला. जमिनीपासून केवळ 228 मीटरवर असताना लिअ‍ॅमचे हे राखीव पॅराशूट उघडले. परंतु, प्रचंड वेगाने जमिनीवर येणा-या लिअ‍ॅम याला काही केल्या तोल सांभाळता आला नाही. पॅराशूटवर नियंत्रण ठेवता आले नाही. हवाईतळावरीलच एका पाण्याच्या डबक्यात तो पाठीवर कोसळला. त्याच्या पाठीच्या कण्याला जबरदस्त मार लागला. पाठीची सर्व हाडे मोडली. कोसळल्यानंतर त्याची डावी बाजू पूर्ण बधिर झाली. मुख्य म्हणजे त्याचा जीव वाचला. ‘द न्यूझीलंड पॅराशूट इंडस्ट्री असोसिएशन’ या दुर्घटनेचा तपास करत आहे.

लिअ‍ॅम सध्या न्यूझीलंडमधील टौपो रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या पाठीच्या कण्यात शस्त्रक्रिया करून धातूच्या पट्टय़ा टाकल्या जाणार आहेत. इतर सामान्य माणसासारखा तो चालू शकेल, असा डॉक्टरांना विश्वास आहे. मात्र, एवढे घडूनही त्याचे स्कायडायव्हिंगवरील प्रेम जराही कमी झालेले नाही. ‘स्कायडायव्हिंग हा वेड लावणारा खेळ आहे. माझ्याबरोबर झालेली दुर्घटना ही दुर्मीळ घटना आहे आणि त्यातून मी आश्चर्यकारक बचावणे, हीसुद्धा दुर्मिळात दुर्मीळ घटना आहे’, असे तो मानतो. आता बोला!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version