Home महामुंबई १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये!

१५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबरमध्ये!

0

नवीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका डिसेंबर २०१५च्या आत घेण्यात येतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

मुंबई- राज्यातील दोन महापालिका, १५ हजार ग्रामपंचायती आणि तालुकास्तरावर निर्माण झालेल्या नवीन नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका डिसेंबर २०१५च्या आत घेण्यात येतील, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. ग्रामपंचायतींचा यापुढचा पहिला टप्पा ४ ऑगस्ट २०१५ असून; त्यात ९ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

राज्यातील ९ हजार ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून; शनिवारपासून ११ जिल्ह्यंतील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी नामनिर्देश पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देश पत्र ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

ग्रामपंचायतींच्या निवडणुकांबरोबरच मिनी विधानसभा समजल्या जाणा-या कल्याण-डोंबिवली महापालिका आणि कोल्हापूर महापालिकेची निवडणूकही डिसेंबरपूर्वी घेण्यात येणार आहे. साधारण ऑक्टोबर महिन्यात वरील दोन्ही महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. याशिवाय ज्या तालुक्याच्या ठिकाणी ग्रामपंचायती होत्या; तेथे नगरपंचायती करण्यात आल्या असून; त्यांच्या निवडणुकाही येत्या डिसेंबरपूर्वी घेण्यात येणार आहेत.

निवडणुकीत अधिकाधिक पारदर्शकता आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण संगणकीकरण आणि आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग रचना आणि प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचा अवलंब करण्यास येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीतील आपले नाव मोबाईलवर शोधता यावे, यासाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.

मतदानाच्या दिवशी संपूर्ण प्रक्रियेचे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करता यावे, यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाचं नवीन संकेतस्थळदेखील विकसित केले जाणार आहे. या माध्यमातून मतदार, विविध राजकीय पक्ष, उमेदवार आणि संबंधित सरकारी यंत्रणांना आयोगाच्या कार्यालयाशी सातत्याने संपर्कात राहता येईल. आयोगाचे आदेश, सूचना, परिपत्रके त्वरित आणि सहज उपलब्ध होऊ शकतील.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version