Home टॉप स्टोरी १३ जुलै बॉम्बस्फोटांतही दाऊदचा सहभाग?

१३ जुलै बॉम्बस्फोटांतही दाऊदचा सहभाग?

0

मुंबईत १३ जुलै २०११ रोजी दादर, जव्हेरी बाजार आणि ऑपेरा हाउस येथे झालेल्या तिहेरी स्फोटांप्रकरणी तपास करणा-या दहशतवादविरोधी पथकाला(एटीएस) दाऊद इब्राहिमची लिंक पुढे आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

मुंबई – मुंबईत १३ जुलै २०११ रोजी दादर, जव्हेरी बाजार आणि ऑपेरा हाउस येथे झालेल्या तिहेरी स्फोटांप्रकरणी तपास करणा-या दहशतवादविरोधी पथकाला(एटीएस) दाऊद इब्राहिमची लिंक पुढे आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिहेरी स्फोटांमध्ये पुण्यातील एका इब्राहिम नावाच्या व्यक्तीचा सहभाग उघड झाला आहे. इब्राहिम हा पुण्यातील एका बडय़ा व्यावसायिकाशी संबंधित असून या व्यावसायिकाने काही वर्षापूर्वी पाकिस्तानवारीत कराचीत दाऊदशी कथित भेट घेतली होती. त्यामुळे तपास यंत्रणांनीही भुवया उंचावल्या असून इब्राहिमचा कसोशीने शोध सुरू आहे. त्याच्या अटकेनंतरच या प्रकरणावर अधिक प्रकाश पडू शकेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

पुण्यात जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करणा-या इब्राहिमने २००८ मधील गुजरात बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट व २०११ मधील मुंबईतील तिहेरी स्फोटांमध्ये इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेला हवाला मार्फत मोठी रक्कम पुरवल्याची बाब तपासात पुढे आली. या प्रकरणी हवाला ऑपरेटर मुझफ्फर कोलाहचे नाव पुढे आले होते.

त्याच्याशीही इब्राहिम संबंधित असून स्फोटांच्या वेळी आलेली काही रक्कम इब्राहिमलाही मिळाल्याचे तपासात समजले आहे. मुंबई स्फोटातील आरोपी असलेला इंडियन मुजाहिदीनचा म्होरका यासीन भटकळ यानेही त्याच्या चौकशीत इब्राहिमला ओळखत असल्याचे मान्य केले. त्याला पकडण्यासाठी एटीएससह सर्व राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा पुण्यात गेल्या होत्या.

मात्र, अद्याप त्याला पकडण्यात कोणालाही यश आलेले नाही. वर्षभराच्या तपासानंतर या प्रकरणातील प्रमुख दुवा एटीएसच्या हाती लागला असून हवाला ऑपरेटर मुजफ्फर कोलाह याचेही नाव पुढे आले. इब्राहिमचे नाव समोर आल्यानंतर कोलाह व या व्यवसायिकाचे संबंधही नाकारता येत नाहीत. त्यामुळे, इब्राहिम हाती लागणे तपासयंत्रणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version