Home ऐसपैस हिंदू-ख्रिश्चन ऐक्याचं प्रतीक मोतमाऊली

हिंदू-ख्रिश्चन ऐक्याचं प्रतीक मोतमाऊली

0

मुंबई परिसरातील अनेक चर्च मुंबईच्या इतिहासाचे साक्षीदार आणि गतवैभव जपताना दिसतात. या चर्चना बदलत्या काळाशी जुळवता आलं नाही. अगदी कुलाब्यापासून कोणतंही चर्च घ्या. त्यातून इतिहासाच्या खाणाखुणा आपल्याला खुणवतातच. मात्र याला अपवाद ठरलं आहे ते म्हणजे वांद्रे पश्चिमेचं माऊंट मेरी चर्च. येशूचा जन्मोत्सव म्हणून साजरा करण्यात येणारा ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस सण अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यानिमित्ताने या ‘माऊंट मेरी देवळाची’ ही महती.
वांद्रे पश्चिमेला समुद्रकिना-यालगत ही माऊंट मेरी बॅसिलिका आहे. माऊंट म्हणजे मत किंवा डोंगर. म्हणून ती येशूची आई, तिचं नाव मेरी. हे जरी त्या शब्दांचं हुबेहूब भाषांतर असलं तरी ती ‘मोत माऊली’ किंवा ‘मोठी माऊली’ या नावानेही ओळखली जाते. एक काळ असा होता की, माऊंट मेरी चर्चच्या कळसाची निमुळती टोकदार शिखरं माहीमपासून दादर आणि वरळीपर्यंतच्या समुद्रकिना-यापर्यंत उठून दिसत असत. अनेक जण दादर ते वांद्रयांपर्यंत समुद्रातून चालत माऊंट मेरीला जात. मधल्या काळात वस्ती वाढत गेली.

वांद्रयाच्या खाडीत भराव घालून वांद्रे रेक्लेमेशन तयार झालं. माऊंट मेरीच्या कळसापेक्षा उंच इमारती उभ्या राहिल्या आणि बघता बघता ती दिसेनाशी झाली. आता या ठिकाणी जाण्यासाठी वांद्रे स्थानकाबाहेरून बस किंवा रिक्षाचा पर्याय आहे. बँडस्टँडवरून नागमोडी वळणाच्या रस्त्यावरून अगदी चालतही जाता येतं. हा रस्ता कधी सुरू होतो आणि कधी संपतो हेच कळत नाही. मात्र वांद्रे स्थानकावरून २११ क्रमांकाची बस आपल्याला थेट पायथ्यापाशी पोहोचवते. तिथे उतरलं समोरच एक रस्ता लागतो. तिथे शिरलं की समोरच आपल्याला ‘माऊंट मेरी देऊळ’ अशी पाटी दिसते. तिथूनच पाय-या सुरू होतात. काही पाय-या चढल्यावर त्या इमारतीचा भाग दृष्टिक्षेपात यायला लागतो. पाय-यांच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे. पण आता दाट लोकवस्ती असूनही माऊंट मेरीची शान जराही कमी झालेली नाही. शंभर वर्षापूर्वीचं आपलं वैभव जसंच्या तसं टिकवून मेरीचं चर्च आजही दिमाखात उभं आहे.

गॉथिक स्थापत्यशैलीचा नमुना असलेली ही बॅसिलिका १९०४मध्ये बांधण्यात आली. पांढ-या आणि गडद राखाडी रंगाचा उपयोग मोठ्या कलात्मकतेने केला आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत या बॅसिलिकाचे दोन मनोरे दूरवर किंवा माहीमहून दिसत असत. हे मनोरे तीन मजली असून ते खूप रुंद असल्यामुळे बेढब दिसले असते. पण गॉथिक पद्धतीच्या खिडक्या आणि इतर वैशिष्टयांचा उपयोग इतक्या अचूक पद्धतीने केलेला आहे की, ते मनोरे अत्यंत प्रमाणबद्ध वाटतात. आत प्रवेश करताच समोरची मेरीची विलोभनीय मूर्ती आपलं लक्ष वेधून घेते. निळी पांढरी रंगसंगती, कोरलेली कलाकुसर आणि आकर्षक फुलांची केलेली सजावट आपल्याला क्षणभर तिथेच खिळवून ठेवते. श्रद्धाळू भाविक मोठ्या श्रद्धेने मेणबत्ती आणि फुलांचे हार विकत घेतात. आजूबाजूच्या भिंतींवर येशू ख्रिस्ताची महती सांगणारी चित्रं रंगवलेली दिसतात.

अवर लेडी ऑफ फातिमाच्या सन्मानार्थ आणि ग्रँड मरियन काँग्रेस यांच्या स्मरणार्थ बॅसिलिकाच्या प्रांगणात एक लहानसं मनोहारी चॅपल बांधण्यात आलं. चर्चच्या बाहेर, समोरच मेरीची मोठी मूर्ती आहे. तिच्यासमोर भाविक मोठ्या श्रद्धेने मेणबत्ती लावतात. कोणाचा हात दुखत असेल तर मेणाचा हात, पायाचं दुखणं असेल तर मेणाचा पाय, कोणी मेणाचं घर तर कोणी बाळ असं देतात. बाजूला तिथूनच समुद्राचं मनोहारी दृश्य दिसतं.

बदलत्या काळानुसार इथले रीतीरिवाज बदलत गेले, परंतु श्रद्धाळूंची संख्या वाढत गेली. दरवर्षी आठ सप्टेंबरला माऊंट मेरीची जत्रा भरते. या उत्सवाच्या वेळी भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात. हा उत्सव गेली तीनशे वर्ष साजरा होत आहे. पूर्वी ही केवळ स्थानिक लोकांची जत्रा होती. चर्चला रोषणाई करून प्रार्थना म्हटल्या जायच्या. नव्याने लग्न झालेली जोडपी आणि त्या वर्षी जन्माला आलेली बालकं मेरीचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. अशा अनेक जत्रा मुंबईतल्या कित्येक चर्च किंवा मशिदीत भरतात. पण माऊंट मेरीइतकी त्याची दखल कोणी घेत नाही. याचं कारण जसजसं शहर वांद्रयाच्या पलीकडे वाढायला लागलं तसतसं जत्रेचं स्वरूप बदलत गेलं. आता ती ‘वांद्रयाचा फेस्ट’ झाली आहे. या जत्रेत हल्ली चेंगराचेंगरी होईपर्यंत गर्दी असते. केवळ देवीच्या दर्शनासाठी नव्हे तर दोन तास करमणूक व्हावी म्हणून कित्येक तरुण-तरुणी या ठिकाणी येतात. यामुळे माऊंट मेरी टुरिस्ट स्पॉट म्हणून झळकू लागली आहे. समोरच सांताक्लॉज, बायबल असलेल्या की-चेन, प्रार्थना लिहिलेल्या अंगठ्या, रंगीबेरंगी बेल्स, मेणबत्त्या, सांताची कॅप, येशूचा क्रॉस आणि त्यासंबंधित असलेल्या अनेक वस्तूंची कित्येक दुकानं आहेत. 

माऊंट मेरीला किमान शंभर वर्षचा इतिहास आहे. त्याबाबत कित्येक आख्यायिका सांगितल्या जातात. दोन पाद्री १५६६च्या सुमारास या टेकडीवर आले. दोन वर्षानी त्या जागी एक लहान चॅपल बांधलं गेलं. त्या घटनेनंतर वांद्रयात ख्रिश्चन बांधव यायला सुरुवात झाली. खेडं असूनही माहीम खाडीच्या मुखाशी असल्यामुळे वांद्रयाला राजकीयदृष्टया खूप महत्त्व होतं. किनारपट्टीचं रक्षण करण्याच्या दृष्टीने या टेकडीवर १६४०मध्ये एक किल्ला बांधण्यात आला आणि पोर्तुगीज सैन्याच्या सोयीसाठी तिथल्या चॅपलचा विस्तार करण्यात आला. १६७८मध्ये त्या चॅपलचा पुन्हा विस्तार केला. त्याला ‘कॅपेला दि नोस्सा सेन्होरा दि मोतें’ असं म्हणू लागले. १७३७ ते ३९ दरम्यान साष्टी बेट मराठयांच्या वर्चस्वाखाली आलं, तेव्हा माऊंट मेरीच्या मूर्तीला हानी होईल, या भीतीने ती मूर्ती माहीमच्या ‘सेंट मायकेल चर्च’मध्ये ठेवण्यात आली. मराठयांची जरब कमी झाल्यावर ती मूर्ती परत आणून तिची नवीन चॅपलमध्ये १७६१ला पुनर्स्थापना करण्यात आली.

दुसरी आख्यायिका अशी सांगितली जाते की, शंभर- दीडशे वर्षापूर्वी या ठिकाणी ख्रिस्ती धर्मगुरू होते. ते इथल्या समुद्रकिनारी येऊन बसत असत. तेव्हा त्यांच्या स्वप्नात मेरीने दृष्टांत दिला. पण त्यांना काही तिथे तिची मूर्ती सापडली नाही. तेव्हा ते माहीमच्या समुद्रकिनारी गेले. तिथे त्यांना ही मेरीची मूर्ती सापडली आणि त्यांनी तिची स्थापना केली.

माऊंट मेरीशी संबंधित आणखी एक आख्यायिकाही आहे. दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सर जमशेदजी जीजीभॉय यांना तीन मुलं झाली. ती वयाच्या सातव्या वर्षापुढे जगली नाहीत. तेव्हा त्यांनी माऊंट मेरीला नवस केला. जर त्यांचं मूल जगलं तर ते माहीम आणि वांद्रे यांना जोडणारा पायरस्ता बांधतील. त्यामुळे माऊंट मेरीच्या भाविकांचे चिखलातून ये-जा करण्याचे किंवा बोटीतून ये-जा करण्याचे कष्ट वाचणार होते. पुढे त्यांना मुलगी झाली आणि ती सातव्या वर्षानंतरही जगली. सर जमशेदजींनी आपल्या नवसानुसार बांध तर बांधलाच, शिवाय टेकडीच्या पायथ्यापासून बॅसिलिकापर्यंत जाण्याकरता पाय-याही बांधल्या. ती मुलगी म्हणजे लेडी फिरोजाभाई, जिचं पुढे ७२ व्या वर्षी निधन झालं.

हिंदू ख्रिश्चन ऐक्याची जी काही निवडक प्रतीकं मुंबईत उरली आहेत, त्यातलं माऊंट मेरी हे एक आहे, असं म्हटलं जातं. कारण हे ख्रिश्चनांचं प्रार्थनास्थळ असलं तरी कित्येक हिंदूही या ‘मतमाऊली’ला भेट देतात. सात दिवस फेस्टची गर्दी आणि रविवार टाळून गेलं तरच या चर्चच्या परिसराचं मनोहारी दर्शन घेता येते, यात शंका नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version