Home महाराष्ट्र कोकण सेना नेत्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही

सेना नेत्यांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही

0

वेळप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार – माजी खा. निलेश राणे

रत्नागिरी – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांला झालेल्या मारहाणीनंतर रत्नागिरी शहर पोलिसांकडून सुरू झालेल्या एकतर्फी कारवाईनंतर पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत, जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही, असा इशारा दिला आहे. वेळप्रसंगी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊ, अशी स्पष्ट भूमिका माजी खा. निलेश राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत मांडली.

रत्नागिरीत झालेल्या एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान शिवसेनेकडून स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांला मारहाण झाली. या मारहाणीनंतर रत्नागिरी शहर पोलिसांकडून एकांगी कारवाई सुरू झाल्याने स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या स्वाभिमानचे कार्यकर्ते अमित देसाई यांची रुग्णालयात जाऊन निलेश राणे यांनी विचारपूस केली आणि त्यानंतर रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांची भेट घेऊन शिवसेनेच्या संबंधित नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अमित देसाई यांच्या घरी जाऊन किरण सामंत, बाबू म्हाप यांच्याकडून धमकावण्यात आल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जावी आणि तशी तक्रार नोंदवण्यात यावी, अशी मागणी निलेश राणे यांनी केली; परंतु या भेटीनंतर अनेक तास उलटूनही रत्नागिरी शहर पोलिसांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने निलेश राणे यांनी स्पष्ट शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करत जोपर्यंत शिवसेनेच्या नेत्यांविरोधातील तक्रार दाखल करून घेऊन गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही, असा इशारा निलेश राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या भूमिकेचाही खरपूस समाचार घेतला.

ते म्हणाले की, पोलीस गृहराज्यमंत्र्यांच्या दबावाखाली कारवाई करत आहेत. बुधवारी शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली. ही मागणी करून अनेक तास उलटूनही अद्याप कारवाई होत नाही. मात्र, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कोणतीही चौकशी न करता कारवाई केली जाते, हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निलेश राणे यांनी उपस्थित केला.

पोलीस स्थानकात जाणे ही दहशत आहे का?, सिव्हील हॉस्पिटलमध्ये जाणे ही दहशत आहे का? असे प्रश्न करत निलेश राणे म्हणाले की, आमदार राजन साळवी पोलीस स्थानकात बसले, तर तो दबाव नाही का? गुहराज्यमंत्र्यांकडून फोन येतात हा दबाव नाही का? आमची तक्रार घेण्यास तयार नाहीत, हा दबाव नाही का? अशा प्रश्नांचा भडिमार निलेश राणे यांनी केला.

यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेताना निलेश राणे म्हणाले की, विनायक राऊत यांच्या आरोपांची आपण दखल घेत नाही. ते भजनीबुवा आहेत. त्यांना कायदा, प्रशासन माहीत नाही. दिल्लीत ते कशापद्धतीने बोलतात ते आपण पाहिले आहे. खासदार म्हणून ते कोकणसाठी शोभत नाहीत, अशी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी यावेळी केली.

नि:पक्षपातीपणे चौकशी करणार
रत्नागिरी पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने, गुरुवारी स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पोलिसांकडून होत असलेल्या एकतर्फी कारवाई योग्य नसल्याचे सांगून सर्वासाठी समान कायदा असावा, असे निलेश राणे यांनी नमूद केले. ज्याप्रमाणे स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई केली गेली त्याचप्रमाणे शिवसेनेच्या लोकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात तसे पोलिसांकडून घडताना दिसत नसल्याचे निलेश राणे यांनी सांगितले. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांनी या प्रकाराची नि:पक्षपातीपणे चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. कोणावरही एकतर्फी कारवाई केली जाणार नाही, असे सांगताना रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत योग्य ती शहानिशा केली जाईल, असे स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version