Home महामुंबई सुरक्षा चाचणीच्या फे-यांतून माथेरान शटल सेवा सुटणार?

सुरक्षा चाचणीच्या फे-यांतून माथेरान शटल सेवा सुटणार?

0

मागील काही महिने चाचणीच्या फे-यांत अडकलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या नॅरोगेज मार्गावरील अमनलॉज-माथेरान शटल सेवेला पुन्हा एकदा हिरवा कंदील मिळाला आहे. 

माथेरान –  मागील काही महिने चाचणीच्या फे-यांत अडकलेल्या नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या नॅरोगेज मार्गावरील अमनलॉज-माथेरान शटल सेवेला पुन्हा एकदा हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे या मार्गावर शटल सेवा सुरू करण्याच्या रेल्वेच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.

अमनलॉज-माथेरान शटल सेवा सुरू करावी, अशी मागणी मागील १५ वर्षे माथेरानकर करत आहेत. त्यानुसार राज्य सरकारने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून मध्य रेल्वेला निधी उपलब्ध करून दिल्याने शटल सेवेच्या कामाला वेग आला होता. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी त्या दृष्टीने माथेरानला येऊन शटल सेवा सुरू करण्याबाबत पाहणीही केली होती. मुंबई विभागीय व्यवस्थापक राहुल जैन यांच्यासह भेटी देऊन सुरक्षा आयुक्तांकडून प्रथम ३ ऑगस्ट, नंतर ९ ऑगस्टला चाचणी घेण्यात आली होती.

मात्र २२ सप्टेंबरला घेण्यात आलेल्या सुरक्षा चाचणीत पुन्हा एकदा या सेवेला हिरवा कंदील मिळाला आहे. मागे-पुढे मिनी ट्रेनचे डिझेल इंजिन आणि मधे आठ डब्बे असलेल्या या शटल गाडीची रेल्वे बोर्डाचे मुख्य सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी स्वत: अमनलॉज स्थानकात चाचणी घेतली. यादरम्यान, अमनलॉज स्थानकात उभारण्यात आलेल्या तिकीटघर आणि उपस्थानक प्रबंधक कार्यालयाची पाहणीही करण्यात आली.

या वेळी विविध सूचना करतानाच, अमनलॉज-माथेरान शटल सेवा सुरू करण्यास आमच्या विभागाकडून हिरवा कंदील आहे. याबाबतचा अहवाल मुंबईत पोहोचल्यानंतर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर केला जाईल, त्यानंतर शटल सेवा कधी सुरू करायची, याचा निर्णय घेण्याची संपूर्ण जबाबदारी महाव्यवस्थापकांची राहील, असे बक्षी यांनी स्पष्ट केले. या चाचणीदरम्यान, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, नगराध्यक्ष अजय सावंत, उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version