Home महाराष्ट्र कोकण मेवा सिंधुदुर्ग पर्यटकांनी हाउसफुल्ल!

सिंधुदुर्ग पर्यटकांनी हाउसफुल्ल!

0

नववर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच सिंधुदुर्गातील मालवण, देवबाग, तारकर्ली येथील हॉटेलं हाऊसफुल्ल होत आहेत.

मालवण – गुलाबी थंडी, हिरवाईने नटलेले डोंगर, टुमदार घरांची गावं, किल्ले, लाल माती आणि त्याच्या जोडीला समुद्राची गाज.. अशा या प्रसन्न वातावरणात कुटुंबाबरोबर निवांत क्षण घालवणे किंवा नववर्षाचे स्वागत करण्याची मजा काही औरच. ही मजा लुटण्यासाठी आतापासूनच सिंधुदुर्गातील मालवण, देवबाग, तारकर्ली येथील हॉटेलं हाऊसफुल्ल होत आहेत.

कोकणातील पर्यटन हंगामाला दिवाळीपासून ख-या अर्थाने सुरुवात होते. सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन, चिवला बीच, तारकर्ली, देवबाग बीच, समुद्र सफर याचबरोबर स्नॉर्केलिंग व स्कुबा डायिव्हग येथे येणा-या पर्यटकांचे खास आकर्षण ठरत आहे. सध्या मालवण शहरासह तारकर्ली, देवबाग येथील पर्यटनस्थळे व पर्यटन सुविधांना पर्यटकांची विशेष पसंती आहे.

आतापर्यंत गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांतील पर्यटक गोव्याला पसंती देत होते. परंतु ख्रिसमस आणि नवीन वर्षात तेथे होणारी गर्दी आणि खर्च पाहता गेल्या दोन-तीन वर्षापासून तेथील पर्यटकांनी मालवणला पसंती दिली असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच पर्यटन महामंडळाच्या वेबसाइटवर तारकर्लीसाठीचे जानेवारीच्या पहिल्या आठवडयापर्यंत अ‍ॅडव्हान्स बुकिंग फुल्ल झाले आहे.

येथील खासगी रिसॉर्टमध्येही ब-यापैकी अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले आहे. पर्यटकांची या कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकणातील अन्य पर्यटनस्थळांची ओळख, खाद्य संस्कृती यांची माहिती देणारे ‘पर्यटन महोत्सव’ सध्या अनेक ठिकाणी सुरू आहेत.
पर्यटकांच्या गर्दीत काही प्रमाणात विदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.

प्रत्येक वर्षी सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई या भागांतील पर्यटक मोठय़ा प्रमाणात हमखास येथे येतात. मात्र, या वर्षी मराठवाडा, विदर्भ येथील पर्यटकांनीही मोठय़ा संख्येने मालवणात हजेरी लावली आहे. कोकणात जाणा-या अनेक रेल्वेगाडय़ांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मिळालेले थांबे आणि ख्रिसमससाठी सुरू करण्यात आलेल्या विशेष रेल्वे यामुळेही येथे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

मालवणी जेवणाला पसंती
हजारोंनी येणारे पर्यटक निवासासाठी मालवणलाच पसंती देतात. त्यामुळे मालवण, देवबाग, तारकर्ली या ठिकाणी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेली रेसिडेन्सी तसेच खानावळी, हॉटेल दुपारी व रात्री पर्यटकांच्या हजेरीने गजबजून जात आहेत. पर्यटकांकडून मालवणी जेवणालाच अधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते. सध्याच्या पर्यटन हंगामामुळे मालवणात माशांचे दरही चांगलेच वधारले आहेत.

कोकणचा मेवा

‘प्रहार’ आणि कोकणचा गेल्या पाच वर्षाचा जिव्हाळा. ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे हे तर कोकणचे भाग्यविधाते. मुंबईत वसलेल्या असंख्य कोकणवासीयांना आपल्या प्रिय कोकणभूमीची नाळ कधीच तोडता येत नाही. हे ‘कोकण कनेक्शन’ लक्षात ठेवूनच, रोजच्या बातम्यांसोबत आता एक खास पान मुंबई/ठाणे ‘प्रहार’मध्ये उद्या सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे. हे पान आहे ‘कोकणचा मेवा’! रंजक माहिती, अभ्यासपूर्ण लेख, छायाचित्रांचा खजिना ‘प्रहार’च्या वाचकांना यानिमित्ताने खुला होईल. सोमवार ते गुरुवार मुंबई/ठाणे प्रहार या पुरवणीच्या पान तीनवर या पानाचा आस्वाद घेता येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version