Home रिलॅक्स ‘सामाजिक समता हे खरे स्वातंत्र्य’

‘सामाजिक समता हे खरे स्वातंत्र्य’

0

याठिकाणी मला भाषण करावे लागेल, याची काही कल्पना नव्हती. अशी कल्पना असती तर माझे विचार संकलित करून  मांडणे सोयीचे झाले असते.

याठिकाणी मला भाषण करावे लागेल, याची काही कल्पना नव्हती. अशी कल्पना असती तर माझे विचार संकलित करून  मांडणे सोयीचे झाले असते. एकंदरीत मला असे दिसते की, तुम्हाला राजकारण फार प्यारे आहे. कोणत्याही गोष्टीपेक्षा राजकारणाची तुम्हाला अधिक आवड दिसते. माझे तसे नाही. मला धर्म जास्त प्यारा आहे आणि त्यासाठीच मी माझी शक्ती वेचणार आहे.

तुम्हाला काही खास अधिकार मिळवून देण्यासाठी मी आजवर खूप प्रयत्न केले. ते अधिकार मिळवून देण्यासाठी मी गांधींशी झगडा केला, काँग्रेसशी सामना दिला. त्या वेळी प्रथमत: त्या वेळच्या मुंबई असेंब्लीत १५/१६ आमचे लोक निवडून आले. असेंब्लीत सरकारविरोधी पक्ष म्हणून आम्ही काम केले. ते एवढे वाखाणण्यासारखे होते की, असेंब्लीमधील आदर्श विरोधी म्हणून त्या वेळचे मुख्यमंत्री श्री. खेर यांना गौरवोद्गार काढावे लागले. त्या काळानंतर लढाई आली. लढाईच्या काळात काही विशेष करता आले नाही.

राखीव जागा उपयोगशून्य 

आपला देश स्वतंत्र झाल्यावर राज्यघटना घडविली जातेवेळी आपल्या राखीव अधिकाराचा विचार झाला. काँग्रेसवाल्यांना राखीव जागांकरिता स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हता. तेव्हा जे वारे वाहत होते ते संयुक्त मतदारसंघाचे होते. याचाही प्रयोग करून पाहावा, असे पुष्कळांना वाटले. चोराची लंगोटीदेखील सोडू नये म्हणतात. त्याप्रमाणे राखीव जागा सोडून न देता त्यांचा संयुक्त मतदारसंघाने प्रयोग करावा, असे वाटले. पण आता असा अनुभव येऊन चुकला आहे की, काँग्रेसच्या तिकिटावर राखीव जागेवर जी माणसे येतात, ती आपली तोंडे बंद करून बसतात. अशा तऱ्हेने संयुक्त मतदारसंघामुळे जर घाणेरडे लोक निवडून येत असतील तर निवडणुकांचा व जागांचा उपयोग तरी काय? त्यांचा काही उपयोग होत नाही हे अनुभवाने आता सिद्घ झाले आहे.

समाजाचे ऐक्य महत्त्वाचे

राखीव जागा नकोत म्हणून फेडरेशनने ठराव केला आहे. त्या ठरावास मी चिकटून राहू इच्छितो. त्या ठरावापासून ढळण्याची माझी इच्छा नाही. राखीव जागा १० वर्षासाठी आहेत. त्या जागा आता राहणार नाहीत. आपल्या समाजाचे ऐक्य ही कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्त्वाची आहे. या राखीव जागा गौण आहेत. आपल्या आजपर्यंतच्या फेडरेशनच्या चळवळीने स्वाभिमान अवश्य निर्माण केला. ही गोष्ट फेडरेशनला भूषणावह आहे. त्यामुळे संघटना झाली. तथापि त्यामुळे एक प्रकारची तटबंदीही निर्माण झाली.

दुसरे लोक आम्हाला मत देत नाहीत व आपण लोक त्यांना मत देत नाही, ही एक प्रकारची तटबंदीच होय. दुर्दैवाने आपली लोकसंख्या कमी आहे. आपण केवळ अल्पसंख्याक आहोत. अशा परिस्थितीत फेडरेशन आहे त्या स्थितीत ठेवणे कठीण आहे. यासाठी इतर समाजांतील आमचे दु:ख जाणणारे कोण आहेत, हे पाहिले पाहिजे. अशा सर्वाना आपण एकत्रित करून त्यांच्यासह जाण्याची आपली सिद्धता पाहिजे. अशा लोकांना एकत्रित करण्याचा मी प्रयत्न करीत आहे. तो प्रयत्न यशस्वी झाल्यास आपल्याला नवीन पक्ष स्थापावा लागेल व त्या पक्षात आपल्याशिवाय इतरांनाही दार मोकळे राहील. तुमच्यातच नव्हे तर या देशात एक विचित्र विकृती दिसून येते. ती ही की आज झाड लावले की, त्यास दुस-या दिवशी फळ खावयास आले पाहिजे, असे लोकांना वाटते. राजकारणात अशी अपेक्षा धरणे चूक आहे.

इंग्लंडमधील राजकारण घ्या. तेथील ब्रिटिश मजूर पक्षाचा इतिहास काय सांगतो, १९०० साली त्यांचे फक्त दोन लोक पार्लमेंटमध्ये निवडून आले. १९०६ साली त्यांना सुमारे १४ जागा मिळाल्या. १९२४ पर्यंत त्यांना विशेष यश नव्हते. त्या साली मात्र त्यांचे जवळजवळ १२५ लोक निवडून तो खरा विरोधी पक्ष बनला. अशा तऱ्हेने राजकारण हा दमाचा व धीराचा खेळ आहे. ज्यांना दम, धीर नाही त्यांना राजकारण करता यावयाचे नाही.

आता इतर समाजाच्या सर्व लोकांबरोबर काम करावयास तुम्ही शिकले पाहिजे. तुमच्यात तुम्ही फूट ठेवून चालणार नाही. माझ्या दबदब्यामुळे अजून काही वेडेवाकडे घडत नाही. पण मी तुम्हासाठी कोठपर्यंत राहणार?

आता उमेदवार निवडण्याचे काम लोकांनीच केले पाहिजे. लोकांमध्ये तुम्ही काम केले पाहिजे. त्यांच्या अडीअडचणींना तुमच्या ताकदीप्रमाणे वाचा फोडली पाहिजे. त्यांच्या सुख-दु:खाशी समरस होण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.

मी भंडा-यातील निवडणुकांमध्ये पडलो, त्याचे मला कधी वाईट वाटले नाही. तरी त्या निवडणुकीत मला बरीच मते पडली. आपली मते सोडली तर इतर समाजानेदेखील मला मते दिलेली आहेत. ही गोष्ट माझ्या समाधानाची आहे. मी पडलो की निवडून आलो, हा प्रश्न मी विचारात घेत नाही. तुम्हीही अशाच प्रकारे कर्तबगार होण्याचा प्रयत्न करून, इतर समाजासदेखील तुम्ही मते द्यावीत, असे वाटले पाहिजे. माझी खात्री आहे की, या गोष्टीचा विचार करून तुम्ही तुमचे राजकीय जीवन व कार्यक्रम चालवाल. यापेक्षा आता अधिक काही मी सांगत नाही.

राजकीय स्वातंत्र्य, सामाजिक समता, लोकशाही या त्रिसूत्रीचा जयघोष करत असतानाच जर सामाजिक ऐक्य होऊ शकले नाही तर समाजात यादवीच होईल, असा इशारा महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील भाषणात १९५६ साली दिला होता. तब्बल ५० वर्षानंतर बाबासाहेबांचे भाषण आज शब्दश: लागू होईल, अशी स्थिती अजून आहे. म्हणून हे भाषण मुद्दाम पुनर्मुद्रित केले आहे.
(बाबासाहेब आंबेडकर यांची भाषणे या पुस्तकातून : १५/१०/५६)

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version